– हृषिकेश देशपांडे
मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना केली. ८४ सदस्यीय कार्यकारिणीत बंडखोर तसेच पक्षांतर्गत विरोधकांना यामध्ये स्थान देत संतुलन साधले आहे. यात सदस्यांचे सरासरी वय ६१ इतके आहे. माजी पंतप्रधान ९० वर्षीय मनमोहन सिंग हे सर्वात ज्येष्ठ तर एनएसयूआय या पक्षाच्या विद्यार्थी शाखेचे प्रमुख ३१ वर्षीय नीरज कुमार हे सर्वात तरुण सदस्य आहेत. मात्र कार्यकारिणीतील निम्मे सदस्य हे पन्नाशीच्या आतील असतील असे गेल्या वर्षी मे महिन्यात उदयपूर येथे झालेल्या अधिवेशनात ठरवण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात खरगे यांना अपयश आले.
आश्वासन पाळले..
या वर्षी फेब्रुवारीत रायपूर येथील अधिवेशनात आश्वासन दिल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक व महिलांना ६६ टक्के प्रतिनिधित्व आहे. १२ सदस्य हे अनुसूचित जातीमधील असून, चार अनुसूचित जमातीमधील आहेत. १६ ओबीसी तर ९ अल्पसंख्याक व १५ महिला आहेत. पन्नाशीच्या आसपास २१ सदस्य आहेत. यात प्रियंका वढेरा, सचिन पायलट, दिपेंदर हुडा, मीनाक्षी नटराजन, प्रणिती शिंदे, सुप्रिया श्रीनेत, अलका लांबा यांचा समावेश आहे. कायमस्वरूपी जे ३९ सदस्य आहेत. त्यांचे सरासरी वय ६६ आहे. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, केरळचे ए.के.अँटनी तसेच अंबिका सोनी यांचा अनुभवाचा लाभ पक्षाला मिळणार आहे. लोकसभेतील पक्षाचे उपनेते ४० वर्षीय गौरव गोगोई तसेच ३६ वर्षीय कन्हैया कुमार या युवा नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. कन्हैया यांच्याकडे एनएसयूआयचे प्रभारीपद आहे. विद्यार्थी चळवळीत काम केल्याने पक्षाने ही जबाबदारी टाकली आहे.
नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
खरगे यांनी कार्यकारिणीत केरळमधील खासदार शशी थरूर यांना कार्यकारिणीवर नियमित सदस्य म्हणून स्थान दिले आहे. विशेष म्हणजे थरूर यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत खरगे यांना आव्हान दिले होते. केरळमधील काही नेत्यांनी आक्षेप घेऊनही थरून यांना स्थान मिळाले हे महत्त्वाचे. राजस्थानमध्ये सचिन पायलट विरोधात मुख्यमंत्री अशोक गहलोत असा संघर्ष आहे. मात्र पायलट यांचा समावेश करत, पक्षनेतृत्वाने गेहलोत यांना इशारा दिला आहे. कार्यकारिणीत ३९ नियमित सदस्य, ३२ कायमस्वरूपी निमंत्रित तर १३ विशेष निमंत्रित सदस्य आहेत. विशेष निमंत्रितांमध्ये प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, राज्यातील आमदार प्रणिती शिंदे, पक्षाच्या माध्यम विभागाची जबाबदारी हाताळणारे पवन खेरा तसेच अलका लांबा यांचा समावेश आहे. कायम निमंत्रितांमध्ये बंडखोर म्हणून ओळखले जाणारे जी २३ गटातील वीराप्पा मोईली तसेच हिमाचलमधील नेत्या प्रतिभा सिंह यांचा समावेश आहे. प्रतिभा यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा दर्शवला होता. हिमाचलमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्या होत्या. मात्र पक्षाने सुखविंदर सुख्खू यांच्याकडे धुरा दिली. प्रतिभा यांना कार्यकारिणीत स्थान देऊन त्या नाराज होणार नाहीत याची दक्षता पक्षाने घेतली आहे. पंजाबमधील अभ्यासू खासदार मनीष तिवारी यांचाही समावेश केला. तेदेखील या गटात होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना संधी देत, नवज्योतसिंग सिद्धू यांना डावलले आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रजनी पाटील, आमदार यशोमती ठाकूर, सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे तसेच मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांना स्थान मिळाले आहे. यातील बहुतेक जण निष्ठावंत आहेत. पक्षाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना कार्यकारिणीत स्थान नसले तरी, महत्त्वाच्या मुद्द्यावरील बैठकीत त्यांना आमंत्रित केले जाते. काँग्रेसची सध्या चार राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे. अशोक गेहलोत तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांना स्थान मिळाले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे दोघेही राज्यातील लोकप्रिय नेते आहेत. पश्चिम बंगालमधून लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी तसेच माजी आमदार दीपा दासमुन्शी यांना स्थान मिळाले आहे. हे दोघेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे टीकाकार मानले जातात. यातून पक्षाने बंगालवर लक्ष केंद्रित केल्याचे मानले जात आहे.
प्रमोद कृष्णम नाराज…
अध्यात्मिक नेते तसेच पक्षाची माध्यमात भूमिका मांडणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांना कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लखनऊमधून राजनाथ सिंह यांच्याविरोधात कृष्णन हे लोकसभा निवडणूक लढले आहेत. माझ्या वेशभूषेवरून काही जणांनी मला दूर ठेवले असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी करण्याची आयती संधी भाजपला मिळाली. अर्थात कृष्णन यांना जनाधार नाही, मात्र त्यांच्या आरोपांनी खळबळ उडून काही प्रमाणात वातावरण निर्मिती होऊ शकते.
हेही वाचा : ओबीसी मतांसाठी काँग्रेसची रणनीती; मध्य प्रदेशात जातनिहाय जनगणनेचे आश्वासन
निवडणुकीत कस
आगामी पाच राज्ये तसेच लोकसभा निवडणुकीतून या सदस्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन काही प्रमाणात होईल. पुढील चार महिन्यांत पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यात मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगण तसेच मिझोरमचा समावेश आहे. येथील सदस्यांना कार्यकारिणीत झुकते माप देण्यात आले आहे. निकालात याचे प्रतिबिंब कसे उमटणार, हे महत्त्वाचे. एकूणच ८१ वर्षीय मल्लिकार्जुन खरगे यांनी अनुभव, निष्ठा तसेच जातीचे संतुलन साधत कार्यकारिणी निवडली आहे. ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांची नाराजी राहणारच. मात्र निवडीनंतर विरोधी सूर फारसे उमटले नाहीत. आता विरोधी आघाडीतून लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा काँग्रेससाठी घेण्यात नेतृत्वाचा कस लागणार आहे.
