३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शत्रूची विमाने, हल्ला करणारे हेलिकॉप्टर, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्र शोधून ती नष्ट करू शकणारी स्वदेशी अनंत शस्त्र ही फिरती हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात करण्याच्या दिशेने भारतीय लष्कराने पाऊल टाकले आहे. सिंदूर मोहिमेत हवाई संरक्षण प्रणालीचे यश समोर आले होते. देशात बहुस्तरीय हवाई संरक्षण कवच अर्थात सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा झाली आहे. हवाई हल्ल्यांपासून संरक्षणाची फळी मजबूत करण्याचा श्रीगणेशा सीमावर्ती भागातून होणार आहे.
काय घडतेय?
सिंदूर मोहिमेनंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेने हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात करण्यासाठी भारतीय लष्कराने अनंत शस्त्र या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच ते सहा रेजिमेंट तयार करण्याचे नियोजन केले आहे. आधुनिक युद्धात हवाई हल्ल्यांपासून मजबूत संरक्षण आणि शत्रुवर प्रतिहल्ल्याची सज्जता महत्त्वाची ठरते. सिंदूर मोहिमेत पाकिस्तानी ड्रोन हल्ले रोखण्यात लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे ३० हजार कोटींच्या खर्चाच्या या प्रकल्पाने हवाई संरक्षणात प्रभावी बदल घडतील. सैन्याला वेगवान, स्मार्ट आणि फिरते संरक्षण कवच मिळणार आहे.
प्रणाली काय आहे?
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेली अनंत शस्त्र ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ती आधी जमिनीवरून हवेत मारा करणारी जलद प्रतिसाद प्रणाली (क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाइल) म्हणून ओळखली जात होती. अनंत शस्त्र अत्यंत गतिमान आणि जलद प्रतिक्रिया देणारी प्रणाली आहे. मार्गक्रमणादरम्यान लक्ष्य शोध आणि त्यांचा मागोवा घेण्याची तिची क्षमता आहे. कमी अंतरावर ती लक्ष्यभेद करू शकते. सुमारे ३० किलोमीटर पल्ल्यासह ही प्रणाली ‘एमआरएसएएम’ आणि आकाशसारख्या सध्याच्या प्रणालींना कमी ते मध्यम पल्ल्यात पूरक ठरणारी आहे. या प्रणालीचे दिवसा आणि रात्रीच्या परिस्थितीत विस्तृत मूल्यांकन करण्यात आल्याचे अधिकारी सांगतात.
वैशिष्ट्ये कोणती?
अनंत शस्त्र ही वाहनावर बसवलेली प्रणाली आहे. वाळवंट, मैदान आणि उत्तुंग पर्वतीय प्रदेशात ती हालचाली करण्यास सक्षम आहे. ३० किलोमीटरच्या श्रेणीत १० ते १४ किलोमीटर उंचीवरील हवाई लक्ष्यांवर ती हल्ला करू शकते. इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला प्रतिकार करू शकते. ३६० अंशात कार्यरत ॲरे रडार, स्वयंचलित कमांड ॲण्ड कंट्रोल आणि हालचालीदरम्यान ती क्षेपणास्त्र डागू शकते. फिरत्या व्यवस्थेमुळे ती शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोनचे थवे आणि फिरत्या शस्त्रांनी निर्माण होणाऱ्या धोक्यांचा प्रभावीपणे सामना करू शकते. लष्कर, लढाऊ वाहने आणि तोफखान्याला हवाई संरक्षण कवच प्रदान करण्याच्या दृष्टीने तिची रचना आहे.
सद्यःस्थिती काय आहे?
लष्कराच्या हवाई संरक्षण विभागाकडे (एएडी) वेगवेगळ्या शस्त्र प्रणालीच्या ५५ रेजिमेंट्स आहेत. हा विभाग मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (एमआर-सॅम), आकाश आणि इतर लहान हवाई संरक्षण प्रणाली चालवतो आणि कोणत्याही हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय हवाई दलाबरोबर एकात्मिक पद्धतीने काम करतो. चिनी शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात या युनिटने एल – ७० आणि झू – २३ हवाई संरक्षण तोफांचा वापर करून बहुतेक ड्रोन नष्ट केले. तर आकाश व एमआर-सॅमने भारतीय हवाई दलाच्या स्पायडर आणि सुदर्शन एस – ४ हवाई संरक्षण प्रणालींसह महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानच्या सैन्याकडील तुर्की आणी चिनी बनावटीच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी हवाई संरक्षण दल अनेक नवीन रडार, अतिशय कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली, जॅमर तसेच लेझर आधारीत तंत्रज्ञान प्रणाली समाविष्ट करीत आहे.
पाकिस्तानच्या धमकीशी संबंध?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मध्यंतरी अमेरिकेतील कार्यक्रमात पाकिस्तानचा पाणी पुरवठा रोखण्यासाठी भारताने कोणतेही धरण बांधल्यास आम्ही ते क्षेपणास्त्रांनी उडवू, अशी धमकी दिली होती. यानंतर भारताने देशातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली. त्या अंतर्गत विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली सक्षम केल्या जाणार आहेत. स्वदेशी अनंत शस्त्र प्रणालीचा समावेश, हादेखील त्याचाच एक भाग होय.