Early signs of heart attack आजची बदलती जीवनशैली अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हृदयविकाराचा धोका केवळ वयस्करांनाच नाही, तर तरुणांनाही आहे. भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. लोक या लक्षणांना अपचन किंवा गॅस समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सामान्य लक्षणेही शरीरासाठी घातक ठरू शकतात.

असाच काहीसा अनुभव एका प्रतिष्ठित डॉक्टरला आला. त्यांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखता आली नाही. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखावी कशी? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणते बदल होतात? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याची कारणं काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

डॉक्टरांना आलेला अनुभव

सामान्य लोकच नव्हे तर डॉक्टरदेखील काहीवेळा हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. डॉक्टर राजन शेट्टी हे बंगळुरूच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक आहेत. त्यांनी सांगितले, माझ्या ५८ वर्षीय सहकाऱ्याला सकाळी ४.३० वाजता उठून योगा करण्याची सवय होती. त्याला थोडा अस्वस्थपणा जाणवला, पण त्याने याला थकवा आणि कामाचा ताण मानले.

सकाळी १० वाजता त्याला ५ ते १० मिनिटांसाठी छातीत जडपणा जाणवला आणि हलकासा घाम आला. त्याला वाटले की आपल्याला नाश्त्यामुळे गॅस झालाय किंवा सकाळी व्यायाम न केल्यामुळे आपल्याला त्रास होतोय. दुपारी १२.३० वाजता त्याला सतत वेदना होऊ लागल्या आणि घाम येऊ लागला, तेव्हा त्याने तातडीने रिक्षा घेतली आणि जवळच्या रुग्णालयात गेला. त्याच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ९५ टक्के अडथळा (Blockage) होता आणि त्याला स्टेंटिंगची गरज होती. स्टेंटिंग ही रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्तप्रवाह पूर्ववत करण्याची प्रक्रिया आहे.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अचानक का दिसतात?

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कधीकधी अचानक तीव्र होतात. कधीकधी सुरुवातीची लक्षणे केवळ १० टक्केच असतात. लोक त्याकडे अपचन, शारीरिक ताण किंवा रक्तदाबाचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात, यालाच आपण ‘स्टटरिंग हार्ट अटॅक’ म्हणतो. यात तीव्र हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी वारंवार चढ-उतार असलेली लक्षणे दिसतात. हे तेव्हा घडते, जेव्हा कोरोनरी धमनीतील अडथळा थोड्या-थोड्या वेळाने उघडतो आणि बंद होतो, ज्यामुळे काही प्रमाणात रक्तप्रवाह होतो आणि नंतर तो पुन्हा थांबतो. स्टटरिंग म्हणजेच अडखळणे. पूर्ण अडथळा येऊन मोठा झटका येण्यापूर्वी अनेक तास किंवा अनेक दिवस अशी पूर्वसूचना देणारी लक्षणे शरीरात दिसतात.

स्टटरिंग हार्ट अटॅकमध्ये काय होते?

साधारणपणे कोरोनरी धमनीमध्ये एक अस्थिर प्लेक असतो, जो वेळोवेळी रक्तपुरवठा सुरू करतो आणि नंतर थांबवतो. म्हणूनच लक्षणांची तीव्रता बदलते. डॉक्टर इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये (ईसीजी) हे बदल ओळखू शकतात आणि हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच ते हे ओळखू शकतात, त्यामुळे कारण नसताना होणाऱ्या अशा अस्वस्थपणाकडे लक्ष देणे आणि स्वतःची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे हृदयाचे होणारे नुकसान टाळता येते.

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • कधीकधी वेदना नसतेच. केवळ छातीतील दबाव, जडपणा जाणवतो.
  • रुग्णाला एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा, दात किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
  • घाम येणे, चिकट त्वचा, मळमळ, चक्कर येणे किंवा थकवा ही इतर लक्षणे आहेत.
  • मुख्य म्हणजे व्यक्तीच्या वय, लिंग आणि शरीराच्या वजनानुसार अपेक्षित असलेले कोणतेही शारीरिक काम करता येणे शक्य नसणे, हे सर्वांत प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.
  • हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, श्वास घेण्यासाठी अडचण किंवा दीर्घ श्वासाचा प्रयत्न करणे, खूप थकवा जाणवणे आणि पायांना गोळे हीदेखील महत्त्वाची लक्षणे आहेत.

रक्तवाहिन्यांमध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक अडथळा आहे हे कसे ओळखायचे?

वैद्यकीय निदानाशिवाय हे तपासण्याचा कोणताही मार्ग नाही, त्यामुळे प्रत्येक वर्षी संपूर्ण शरीर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यात मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब तपासा, तसेच कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास विचारात घ्या. जर तुम्ही धूम्रपान, मद्यपान सोडले नसेल तर ते त्वरित सोडा आणि आहार, व्यायाम व झोपेच्या सवयींमध्ये सुधारणा करा.

रक्तवाहिन्यांमधील अडथळा फक्त अँजिओग्राफीनेच ओळखता येतो. यात एक विशेष रंग शरीरात सोडला जातो आणि हृदयाचा एक्स-रे घेतला जातो, ज्यामुळे कोरोनरी धमन्यांमध्ये असणारा अडथळा दिसतो. सीटी कॅल्शियम स्कोर नावाचे स्कॅनिंग कोरोनरी धमन्यांमधील कॅल्शिफाइड प्लेक्सचे प्रमाण मोजते. याशिवाय, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञान ध्वनी लहरींचा वापर करून हात-पाय आणि सर्वात मोठ्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह तपासते.

१० टक्के प्लेक असतानाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो?

हृदयातील कोणत्याही अडथळ्याने रक्ताची गाठ तयार होऊ शकते आणि रक्तप्रवाह थांबवू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अडथळा १० टक्के आहे की ९० टक्के, यावरून हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता ओळखता येत नाही. तुमच्या इतर जोखीम घटकांचा विचार करून डॉक्टर तुम्हाला तो टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करू शकतात. जर तुमचे कोलेस्ट्रॉल आणि साखर यांसारखे जोखीम घटक जास्त असतील तर ते नियंत्रित करण्यासाठी औषधे घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.