आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवार, १४ सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघ एकमेकांसमोर येणार आहेत. हे दोन्ही संघ जगात कोठेही एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा तो सामना पाहण्याकरिता चाहते नेहमीच गर्दी करतात. मात्र, या १४ सप्टेंबरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या तिकीट विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या सामन्याच्या तिकीट विक्रीला फटका का बसत आहे,  कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे कोणती, याचा घेतलेला हा आढावा.

वाढत्या किमतींमुळे तिकीट विक्रीला वेसण?

भारत-पाकिस्तान हा सामना रविवारी १४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असतानाही वरील स्टँडची तिकिटे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दुबई येथील स्टेडियमची आसनक्षमता २५ हजार इतकी आहे. मात्र, या लढतीकरिता अजूनही स्टेडियमच्या अर्ध्या तिकिटांची विक्री झालेली नाही. भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकिटे विक्री आयोजकांकडून पॅकेज स्वरूपात करण्यात येत होती. म्हणजे, हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना सात सामन्यांची तिकिटे एकत्र घ्यावी लागत होती.

तिकिटांचा कमी प्रतिसाद पाहता आयोजकांनी यामध्ये बदल करीत केवळ एकाच सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली. मात्र, तरीही विक्रीत वाढ झाली नाही. सध्या सर्वात महाग तिकीट पॅकेज हे २.५७ लाख रुपयांचे असून यामध्ये दोन तिकिटांसह जेवण, पार्किंस पास, व्हीआयपी क्लब/ लाऊंज, स्वतंत्र प्रवेश यासारख्या सुविधा मिळणार आहेत. याचप्रमाणे रॉयल बॉक्स २.३० लाख, स्काई बॉक्स ईस्ट १.६७ लाख, प्लॅटिनम ७५ हजार, ग्रँड लाऊंज ४१ हजार, पॅव्हेलियन वेस्ट २८ हजार आणि सर्वात स्वस्त जनरल ईस्टसाठी दहा हजार रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. किमती अधिक असल्याने चाहत्यांनी तिकिटांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

तारांकित खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका?

भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यानंतर या प्रारूपातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यंदा आशिया चषक स्पर्धा ही ट्वेन्टी -२० प्रारूपात खेळवली जात असल्याने हे दोन्ही खेळाडू संघात दिसणार नाहीत. दुसरीकडे, पाकिस्तान संघातील बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारखे खेळाडू संघात नाहीत. दोन्ही संघांतील तारांकित खेळाडूंच्या अभावाचा फटकाही या सामन्याला बसण्याची शक्यता आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर विरोध?

एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध अधिक बिघडले. यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका एक दशकाहून अधिक काळपासून आयोजित होत नाही. दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’ आणि आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्ये खेळतात. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानबद्दल सर्वांचा रोष वाढलेला आहे. समाजमाध्यमांवर अनेकांनी भारताने या स्पर्धेतून माघार घ्यावी असे म्हटले होते. त्यामुळे तिकीट विक्रीला कमी प्रतिसादाचे हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.

एमिरेट्स क्रिकेट मंडळाचे म्हणणे काय?

‘‘भारत-पाकिस्तान सामन्याचे नेहमीच चाहत्यांमध्ये आकर्षण असते. मात्र, यंदा तिकीट विक्रीला प्रतिसाद कमी का हे कळलेले नाही. सध्या खालील स्टँडच्या तिकिटांची विक्री झालेली आहे. तसेच, वरील स्टँडची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत या सामन्याकरिता तिकिटांचा इतका प्रतिसाद मिळत होता की, आम्हाला दोनदा तिकीट खिडकी उघडावी लागली. त्यावेळी चार मिनिटांहून कमी वेळेत सर्व तिकिटांची विक्री झाली होती. यावेळी तितका उत्साह पाहायला मिळाला नाही. कदाचित भारताच्या तारांकित खेळाडूंची अनुपस्थिती याचे कारण असू शकते,’’ असे एमिरेट्स क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारत-पाकिस्तान तीनदा आमनेसामने?

भारत-पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. सध्या स्पर्धेची साखळी फेरी सुरू असून रविवारी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. यानंतर स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांकडे पाहिल्यास ते या गटात पोहचतील. त्यामुळे ते २१ सप्टेंबरला पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणार आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही संघाने ‘अव्वल चार’ फेरीत सुरुवातीच्या दोन स्थानांत राहिल्यास कदाचित अंतिम सामनाही या दोन संघांमध्येच होईल.

आशिया चषकातील कामगिरी कशी?

भारत आणि पाकिस्तान हे संघ आशिया चषकात १८ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी दहा सामने भारताने जिंकले असून पाकिस्तानने सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या १८ सामन्यांपैकी १५ सामने एकदिवसीय व तीन ट्वेन्टी-२० प्रारूपात खेळले गेले आहेत. ट्वेन्टी-२० प्रारूपातील तीन सामन्यांत भारताने दोन सामने जिंकले असून पाकिस्तानच्या खात्यात एक विजय आहे.