बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रवासी भाड्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या बेस्टच्या प्रस्तावाला नुकतीच मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली. तब्बल सहा – सात वर्षांनंतर बेस्टच्या तिकिटाची भाडेवाढ करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात भाडेवाढ करणे आवश्यक होते का, बेस्टला ही भाडेवाढ तारणार का, भाडेवाढ केल्यामुळे बेस्टला फायदा होणार की बेस्टचे प्रवासी आणखी घटणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेस्टचे जमा-खर्चाचे गणित नक्की कसे आहे याबाबतचा आढावा…

बेस्टची भाडेवाढ किती होणार?

बेस्ट उपक्रमाने मुंबई महानगरपालिकेकडे पाठवलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावानुसार, किमान भाड्यात दुपटीने वाढ होणार आहे. सध्या बेस्ट बसचे किमान भाडे पाच किमीसाठी पाच रुपये आहे, ते आता दहा रुपये होणार आहे. पुढील प्रत्येक टप्प्यासाठी पाच रुपये वाढ होणार आहेत. तर वातानुकूलित बसचे भाडे सध्या पाच किमीसाठी सहा रुपये आहे, ते बारा रुपये होणार आहे. पहिल्या पाच किमी टप्प्यात प्रवास करणारे प्रवासी मुंबईत मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या सर्व प्रवाशांना एकदम दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने २०१९ मध्ये बेस्टच्या तिकीट दरात कपात केली होती. भाडे आठ रुपयांवरून पाच रुपये केले होते. त्यावेळी प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र आता एकदम दुपटीने होणारी ही भाडेवाढ प्रवाशांना चालेल का हा प्रश्न आहे.

भाडेवाढ कधीपासून लागू होईल?

मुंबई महापालिका प्रशासनाने भाडेवाढीला मंजुरी दिल्यानंतबरोबर विरोधकांनी त्यास विरोध सुरू केला आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव आता राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यावर आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बेस्टला लगेचच भाडेवाढ करता येईल. मात्र त्यापूर्वी बेस्टला प्रवाशांसाठी भाडेवाढीची सूचना जाहीर करावी लागेल. तसेच तिकीट देणाऱ्या यंत्राच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील. नवीन भाडे रक्कम त्यात अंतर्भूत करावी लागेल. म्हणजे प्रवाशांना योग्य त्या रकमेची पावती मिळू शकेल.

बेस्टने भाडेवाढीसाठी आग्रह का धरला?

गेल्या काही वर्षांपासून बेस्टची आर्थिक स्थिती ढासळत असून संचित तूट वाढत आहे. परिवहन आणि वीजपुरवठा असे दोन भाग असलेल्या बेस्ट उपक्रमाचा विद्युत विभाग नेहमीच फायद्यात होता. त्या फायद्याच्या जोरावरच परिवहनचा गाडा हाकला जात होता. मात्र विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळवता येणार नाही असे बंधन वीज नियामक आयोगाने घातल्यानंतर गेल्या काही वर्षांत परिवहन विभागाची तूट वाढतच गेली. सध्या विद्युत विभाग ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सुरू आहे. तर परिवहन विभागही तोट्यात असून तूट वाढत आहे. दैनंदिन खर्च भागवणेही बेस्ट उपक्रमाला मुश्कील झाले आहे. बेस्टच्या या दुर्दशेवर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यात बेस्ट उपक्रमाने भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता. बेस्ट उपक्रमाने आधीच मुंबई महापालिकेकडे भाडेवाढीसाठी प्रस्ताव पाठवलेला होता. त्यावर निर्णय झाला नव्हता. मात्र मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर लगेचच मुंबई महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर केला.

बेस्टची सद्यःस्थिती कशी आहे?

एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस घटत आहेत. तर दुसरीकडे बेस्टची वार्षिक तूटही वाढत आहे. त्यामुळे संचित तूट आठ हजार कोटींवर गेली आहे. बसताफा वाढवण्याचा संकल्प बेस्ट उपक्रमाने केलेला असला तरी हे उद्दिष्ट साध्य होऊ शकलेले नाही. दिवसेंदिवस रोडावत चाललेली प्रवासी संख्या, कमी होत गेलेले उत्पन्न, जुन्या गाड्या भंगारात गेल्यामुळे कमी झालेला ताफा, बसगाड्या कमी झाल्यामुळे सेवेवर झालेला परिणाम, कर्जाचा वाढलेला डोंगर आणि वाढणारी तूट अशा दुष्टचक्रात बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांत अडकला आहे.

सध्याचे उत्पन्न व खर्चाचे गणित

बेस्टच्या गाड्यांची देखभाल आणि आस्थापना खर्च तिकिटातून व जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तिप्पट आहे. बेस्टकडे सध्या सरासरी दैनंदिन ३१ लाख प्रवासी आहेत. बेस्टला दिवसाला तिकिटातून पावणेदोन कोटी रुपये उत्पन्न मिळते. बेस्टला महिन्याला ५० ते ६० कोटी रुपये उत्पन्न तिकिटांतून मिळत असते. त्याचबरोबरच जाहिरातीतूनही सुमारे दीडशे कोटी उत्पन्न मिळत असते. त्यामुळे बेस्टचे वार्षिक उत्पन्न सुमारे साडेआठशे कोटी इतके आहे. तरी खर्च तीन हजार कोटींच्या पुढे आहे. बेस्ट बसगाड्यांची देखभाल, आस्थापना खर्च, बॅंकांच्या कर्जाची परतफेड, बसचे प्रवर्तन, डिझेल आदी खर्चाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाला दरवर्षी सुमारे दोन हजार कोटींहून अधिक तोटा सोसावा लागत आहे. बॅंकांच्या व्याजाची देणी, बस खरेदीसाठी लागणारे भांडवल, कामगारांची देणी, निवृत्त कामगारांची देणी, टाटा कंपनीची विजेची बिले हे सगळे गृहित धरल्यास बेस्टची संचित तूट ८००० कोटींवर गेली आहे. मुंबई महापालिकेने अनुदान दिले तरी ही तूट भरून निघणारी नाही. त्यामुळे बेस्टने भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता.

बेस्टची सेवा का खालावली?

जुन्या गाड्या भंगारात काढल्या जात असल्यामुळे बेस्टचा बस ताफा सातत्याने कमी होत आहे. बसताफा कमी झाल्यामुळे, नवीन वातानुकूलित गाड्या ताफ्यात समाविष्ट होण्यास झालेला विलंब, आकाराने लहान गाड्या यामुळे प्रवासी दुरावले आहेत. मेट्रो स्थानकांपासून पूरक अशा मार्गाची आखणी न करणे, लांबपल्ल्याचे बसमार्ग आदींच्या नियोजनात त्रुटी आहेत. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना गाडीची सेवा वेळेवर देणेही बेस्टला जमलेले नाही. जागतिक पातळीवरील निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ६० बसगाड्या असाव्या लागतात. त्याचे प्रमाण सध्या एक लाख लोकांमागे २० गाड्या इतके कमी आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता बेस्टकडे सध्या किमान साडेपाच हजार गाड्या असायला हव्यात. सध्या केवळ २७८४ गाड्या आहेत. त्यातही बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्या केवळ ६६५ आहेत. त्यामुळे बेस्टच्या सेवेवर परिणाम झाला आहे. पण सेवा देत नसताना भाडेवाढ कशी करता येईल असाही प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

बेस्टच्या दुर्दशेची कारणे कोणती?

बेस्टच्या या दुर्दशेला आर्थिक आणि राजकीय कारणे आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा कधीच फायद्यात नसते. अन्य सगळ्या शहरांमध्ये परिवहन सेवा ही महापालिका देत असतात. मात्र मुंबई महापालिका बेस्टचा तोटा उचलण्यास तयार नाही. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची फक्त घोषणा झाली होती. त्याची अंमलबजावणी झाली नाही. बेस्टचे बांडगुळ पालिका प्रशासनाला आपल्या तिजोरीवर नको आहे. बेस्ट उपक्रमाला नियमित उत्पन्न मिळू शकेल असा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. बेस्टने महसुलाचे नवीन पर्याय आणावे व स्वावलंबी व्हावे असा सल्ला पालिका प्रशासन, राज्य सरकार, राजकारण्यांकडून बेस्ट उपक्रमाला वारंवार दिला जातो. मात्र बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी आतापर्यंत आलेल्या अधिकाऱ्यांनी महसूल वाढविण्यासाठी कोणतेही नवीन धाडसी प्रयोग केलेले नाहीत हे देखील तितकेच खरे आहे.

भाडेवाढीमुळे बेस्टला फायदा की तोटा?

बसगाड्या भाड्याने घेऊन देखभाल खर्च कमी करणे आणि बसताफा वाढवून प्रवाशांना स्वस्तात उत्तम सेवा देणे हाच ‘बेस्ट’ उपाय असल्याचे काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने सुचवले होते. मात्र भाडेतत्त्वावर बसगाड्या घेऊनही बेस्टचा तोटा वाढतच गेला. आता बसभाडेवाढ केल्यामुळे तोटा काहीसा कमी होईल, पण तो भरून काढता येणार नाही. भाडेवाढ केल्यानंतर प्रवासी बसची वाट पाहत थांबतील का हा प्रश्न आहे. त्याच रकमेत शेअर टॅक्सी, रिक्षा मिळत असेल तर प्रवासी का थांबतील हे साधे उत्तर आहे. त्याकरीता बेस्टला आपला ताफा येत्या काळात वाढवून बसगाड्यांची वारंवारता वाढवण्याची गरज आहे. प्रवाशांचा वेळ वाचवता आला पाहिजे, चांगली सेवा देता आली पाहिजे, त्याकरीता कार्यादेश दिलेल्या गाड्या लवकरत कशा ताफ्यात येतील याचा पाठपुरावा करावा लागेल. तरच ही भाडेवाढ बेस्टला तारेल, अन्यथा दरवाढीचा निर्णय बेस्टला आणखी एका खड्ड्यात घालणारा ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

indrayani.narvekar@expressindia.com