बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी, महागठबंधन किंवा महाआघाडीला जागावाटप जाहीर करण्यात अपयश आले. या आघाडीचे नेतृत्व राष्ट्रीय जनता दलाकडे (राजद) आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेस, डावे पक्ष यांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष-एमएल हे आहेत. याखेरीज मुकेश सहानी यांचा विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) हा स्थानिक आहे. मात्र विधानसभेच्या एकूण २४३ जागांचे गणित जमवताना वरिष्ठ नेत्यांना नाकीनऊ आले.

चौदा ठिकाणी एकमेकांविरोधात

मैत्रीपूर्ण लढत या नावाखाली अनेक वेळा मित्रपक्ष आमने-सामने येतात. तीच बाब बिहारमध्येही यंदा आहे. महाआघाडीत जवळपास १४ जागांवर हे पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. दुसऱ्या टप्प्याचे अर्ज माघारी घेण्यास अवधी आहे. पहिल्या टप्प्यात सहा जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार देण्यात आले. त्यात आता बदल अशक्य आहे. राष्ट्रीय जनता दलाविरोधात काँग्रेसचे उमेदवार सहा ठिकाणी रिंगणात आहेत. तर राजद- व्हीआयपी पक्ष असा सामना चार जागांवर आहे. काँग्रेसविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष चार जागांवर आमने-सामने आहेत. राजदने काँग्रेसविरोधात एका ठिकाणी उमेदवारी अर्ज काढण्याची घोषणा केली. तरीही अन्यत्र मित्रपक्षांनीच शड्डू ठोकले.

पाटण्यापासून ते दिल्लीपर्यंत जागावाटपाच्या बैठका झाल्या. मात्र मार्ग निघू शकला नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही तोडगा निघाला नाही. आता प्रचारात याचा काही प्रमाणात फटका बसणार. त्यातुलनेत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत निदान जागावाटप तरी जाहीर झाले. उपेंद्र कुशवाह व जितनराम मांझी यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त केली असली तरी, ती दूर करण्यात भाजपश्रेष्ठींना यश आले.

राजदने शंभर जागा सोडल्या

महाआघाडीत लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा केंद्रस्थानी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. गेल्या म्हणजे २०२० च्या विधानसभा निवडणुकीत राजदने १४४ जागा लढल्या होत्या. यंदा १४३ ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर केले. थोडक्यात मित्रपक्षांना शंभर जागा सोडल्या. त्यात काँग्रेसचे ६० उमेदवार आहेत. तर तीन डाव्या पक्षांनी तीसवर उमेदवार दिले आहेत. भाकप-मालेचे १२ आमदार होते.

गेल्या निवडणुकीत १९ पैकी १२ जागा जिंकल्याने त्यांना यंदा अधिक जागा मित्रपक्षांनी सोडाव्यात अशी अपेक्षा होती. तीनही डाव्या पक्षांनी जवळपास ७५ जागांची मागणी केली होती. मात्र तितक्या जागा देणे शक्य नव्हते. काँग्रेसने गेल्या वेळी ७० जागा लढवत केवळ १९ ठिकाणीच यश मिळवले. राजकीय स्थिती पाहून काँग्रेसने अधिक जागांचा आग्रह धरू नये असे घटक पक्षांचे म्हणणे होते. यातूनच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार देण्यात आले.

मुकेश सहानी यांच्या व्हीआयपी पक्षाने ११ उमेदवार जाहीर केले. त्यांच्या पक्षाविरोधात अनेक ठिकाणी मित्रपक्षच रिंगणात आहेत. यातून पाच ते सहा ठिकाणीच त्यांचा सामना थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी आहे. बिहारमध्ये आघाडीच्या राजकारणात मित्रांशीच सामना करण्याची वेळ महाआघाडीत आली. झारखंड मुक्ती मोर्चाने तर काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलावर टीका करत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. झारखंडमधील हा सत्ताधारी पक्ष असून, इंडिया आघाडीचा घटक आहे. झारखंड विधानसभेची गेल्या वर्षी निवडणूक झाली. त्यामध्ये आघाडीतून राष्ट्रीय जनता दलाला काही जागा त्यांनी सोडल्या. आता बिहारमध्ये राजदनेही काही जागा द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा होती.

झारखंड सीमेलगत बिहारमधील तीन ते चार मतदारसंघांत या पक्षाचा प्रभाव आहे. झारखंड हा पूर्वी बिहारचा भाग होता. जागावाटपात योग्य तो सन्मान राखला नसल्याने झारखंड मुक्ती मोर्चा मित्रपक्षांवर नाराज आहे. त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील.

उमेदवारी वाटपात नवी समीकरणे

बिहारमध्ये महिला मतदार गेल्या काही निवडणुकांत संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याला कारण दारूबंदी तसेच कल्याणकारी योजना हे आहे. राजदने हेच हेरून यावेळी ते लढत असलेल्या १४३ जागांपैकी २४ महिलांना संधी दिली. तर भाजप व संयुक्त जनता दलाने प्रत्येकी १३ महिलांना संधी दिली. अर्थात हे पक्ष प्रत्येकी १०१ जागा लढत आहेत. तर काँग्रेसने त्यांच्या साठ जागांपैकी पाचच महिला उमेदवार दिले. प्रचारात राष्ट्रीय जनता दल हा मुद्दा पुढे आणेल अशी शक्यता आहे.

राज्यात १७ टक्के मुस्लीम मतदार आहेत. राजदच्या यादीत १८ मुस्लीम उमेदवार आहेत. त्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण २४३ जागांपैकी पाचच मुस्लीम उमेदवार दिले आहेत. त्यात जनता दलाने चार तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने एका मुस्लीम उमेदवाराला संधी दिली. २०२० मध्ये जनता दलाचे सर्व ११ मुस्लीम उमेदवार पराभूत झाले होते. तर पासवान यांच्या पक्षाचे सर्व सात मुस्लीम उमेदवार गेल्या वेळी अपयशी ठरले होते. भाजपने २०२० प्रमाणे यंदाही एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. राज्यात मुस्लिमांचा प्रभाव असलेले ३२ मतदारसंघ आहेत. प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाची भूमिका काही ठिकाणी निर्णायक ठरेल. उमेदवारी अर्ज आणि जागावाटपानंतर दिवाळी संपताच प्रचाराचे फटाके वाजू लागतील.