हृषिकेश देशपांडे

भाजप नेत्या व पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर आली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. अर्थात वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव त्यांनी केली असली, तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. जनतेच्या मनात असलेल्यांना मोदीही संपवू शकत नाहीत असे पंकजा म्हणाल्याचे प्रसिद्ध होताच पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. गेल्या चार ते पाच वर्षांत पंकजांनी वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पक्षावरची नाराजी उघड केली आहे. पण इतर मागासवर्गीय समाज मतपेढी आणि गोपिनाथ मुंडेंची पुण्याई मोठी असल्याने भाजपलाही त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जात आहे.

नाराजीची कारणे कोणती?

आपल्या भाषणात घराणेशाहीचा उल्लेख करताना पंकजांना, जनतेत राहणाऱ्या नेत्यांना बाहेर ठेवणे कठीण आहे असे सुचवायचे होते. मात्र त्यांच्या वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली. यापूर्वी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे वक्तव्य केल्याने त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळणे, राज्यसभेसाठी डावलले जाणे, विधान परिषदेतही हुलकावणी या साऱ्या बाबींमुळे पंकजांची नाराजी आहे. त्यातही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना संधी देत पक्षात पर्यायी वंजारी नेतृत्व तयार केल्याचे मानते जाते.

Video : “सध्या मी बेरोजगारच आहे, त्यामुळे मला…”, पंकजा मुंडेंची मिश्किल टिप्पणी; सोशल ट्रोलिंगवरही केलं भाष्य!

पंकजांना पक्ष संघटनेत स्थान मिळाले व त्यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नियुक्ती केली गेली. मात्र महत्त्वाचे आणि शक्तिशाली असे सरचिटणीसपद त्यांना मिळालेले नाही, हे उल्लेखनीय आहे. पंकजांप्रमाणेच राज्याच्या राजकारणातून काहीसे बाहेर गेलेले विनोद तावडे यांना सरचिटणीस करण्यात आले. आता तर त्यांना बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारीपद देण्यात आले आहे. पंकजांना तशीही कोणतीही मोठी जबाबदारी संघटनेत देण्यात आलेली नाही. आताही त्याच भाषणात त्यांनी ‘गरबा करा, दांडिया करा, नाटक, तमाशा बोलवा हे पाहता राजकारण करमणुकीचे साधन झाल्याची’ नाराजी व्यक्त करत. अप्रत्यक्षपणे राज्यातील नेत्यांना लक्ष्य केले. कारण मुंबईत भाजपकडून मराठी दांडियाचे आयोजन गाजावाजा करत करण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर पंकजांचे विधान दखलपात्र ठरते.

स्थानिक समीकरणे काय आहेत?

परळी मतदारसंघातून पंकजा या त्यांचे चुलतबंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यानंतर स्थानिक निवडणुकांतही धनंजय यांनी बस्तान बसवले. मुळात धनंजय हे पूर्वी भाजपमध्ये होते. मात्र नंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. आता जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीतच पंकजा यांच्या विरोधात धनंजय असा सामना होतो. पंकजांचे वडील दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचा चाहता वर्ग राज्यभर आहे. पंकजांच्या भगिनी बीडच्या खासदार आहेत. पंकजांनाही मानणारा मोठा वर्ग बीड आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आहे. समाजमाध्यमांवर पंकजांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. अलिकडच्या काळात समाजमाध्यमांद्वारे वातावरण तयार केले जाते. त्यातून काही प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण होते. त्यामुळे पंकजांना दुखावणे भाजपला परवडणारे नाही. तसेच राज्यपातळीवर चुकीचा संदेश जाईल हे भाजप जाणून आहे. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावर भाजपच्या एक-दोन नेत्यांच्या प्रतिक्रिया वगळता फारसे कुणी भाष्य केलेले नाही.

विश्लेषण : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; पुढे संघटनेचं आणि सदस्यांचं काय होणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे काय?

सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा काय बोलणार, याची उत्सुकता आहे. समर्थकांना काय संदेश देतात, पुढचे पाऊल काय उचलतात याची उत्तरे या मेळाव्यातून मिळतील अशी अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात नुकतेच पंकजा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर होते. पंकजांची वैचारिक जडणघडण पाहता नाराज असल्या तरी मोठे पाऊल उचलणार नाहीत अशी भाजप नेत्यांना खात्री आहे. आता राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पंकजांची वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्ष संघटनेत किंवा सरकारमध्ये पंकजांना महत्त्वाचे स्थान द्यावे ही त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त होत राहणार हे नक्की.