Putin Xi Jinping secret talk रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील एक गुप्त संभाषण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बीजिंगमध्ये झालेल्या चीनच्या लष्करी परेडदरम्यान हा प्रकार घडला. व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात ऑर्गन ट्रान्सप्लांट (अवयव प्रत्यारोपण) आणि इतर वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त किंवा ते अमर कसे होऊ शकतात, यावर चर्चा झाल्याचे एका हॉट माइकवर रेकॉर्ड झाले. परंतु, राष्ट्राध्यक्षांची ही विधाने वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहेत की नाहीत? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बीजिंगमध्ये चीनचे लष्करी संचलन सुरू असताना पुतिन आणि जिनपिंग यांच्या अनौपचारिक गप्पा सुरू होत्या, ज्या माईकमध्ये रेकॉर्ड झाल्या आणि या गप्पांनी जगाची चिंता वाढवली? त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? खरंच माणूस १५० वर्षे जगू शकतो का? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात….
पुतिन आणि जिनपिंग यांच्यात काय चर्चा झाली?
पुतिन आणि जिनपिंग दोघेही ७२ वर्षांचे आहेत आणि त्यांनी पद सोडण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यांनी अद्याप आपले उत्तराधिकारीदेखील घोषित केलेले नाहीत. त्यामुळे वयाचा प्रभाव टाळणे त्यांच्या मनात होते, असे या संभाषणातून दिसून येते. पुतिन यांनी जिनपिंग यांना सांगितले, “बायोटेक्नॉलॉजीच्या विकासामुळे मानवी अवयवांचे सतत प्रत्यारोपण (organ transplants) केले जाऊ शकते, लोक पुन्हा तरुण होऊ शकतात आणि कदाचित अमरही होऊ शकतात.”

त्यावर जिनपिंग यांनी उत्तर दिले, “या शतकात माणूस १५० वर्षांपर्यंत जगू शकतो.” परंतु, या कल्पनेला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मानवी आयुष्याला जैविक मर्यादा आहे की नाही, यावरही वैज्ञानिकांचे एकमत झालेले नाही. शेफिल्ड विद्यापीठातील (University of Sheffield) वृद्धत्वाच्या जीवशास्त्रावर संशोधन करणाऱ्या इलारिया बेलान्टुनो (Ilaria Bellantuono) यांनी ‘एएफपी’ला सांगितले, “हा वाद अजून संपलेला नाही.” खरं तर, गेल्या काही दशकांत आरोग्याच्या बहुतेक क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती झाली आहे; मात्र माणसांचे आयुष्य वाढल्याची नोंद नाही. १९९७ मध्ये वयाच्या १२२ व्या वर्षी मृत्यू झालेल्या फ्रान्सच्या जियान कॅल्मेंट यांच्या नावे सर्वांत जास्त वय असलेल्या व्यक्तीचा रेकॉर्ड आजही आहे.
अवयव प्रत्यारोपणाने लोक पुन्हा तरुण होऊ शकतात?
पुतिन यांनी फक्त मृत्यू टाळण्याबद्दलच नाही, तर खराब झालेले अवयव बदलून (ऑर्गन ट्रान्सप्लांट) लोक प्रत्यक्षात पुन्हा तरुण होऊ शकतात, असेही सुचवले. फ्रान्सच्या लिले विद्यापीठातील (Lille University) जीवशास्त्र आणि वृद्धत्वाचे प्राध्यापक एरिक बाउलँगर म्हणाले, “हे पूर्णपणे वेडेपणाचे आहे.” बाउलँगर यांनी वैद्यकीय अडथळ्यांच्या आणि नैतिक चिंतेच्या बाबी सांगितल्या. त्यात त्यांनी वारंवार प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमुळे शरीरावर होणाऱ्या आघातांविषयीदेखील सांगितले. ते म्हणाले की, आपले शरीर फक्त अवयवांनी तयार झालेले नाही. त्यात चरबीयुक्त ऊती, हाडे आणि इतर गोष्टीही आहेत. या सर्व गोष्टीं एकमेकांशी जोडलेल्या आहेत. वृद्धत्वाचा एकूणच परिणाम या सर्व गोष्टींवर होतो. त्यामुळे कारच्या भागांप्रमाणे अवयव बदलण्याची कल्पना अवास्तव आहे.

दीर्घायुष्यासाठी केले जाणारे प्रयत्न
काही काळापासून दीर्घायुष्याच्या प्रयत्नांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जात आहे. रशियाने गेल्या वर्षी पुनरुत्पादक औषध (Regenerative medicine) आणि दीर्घायुष्यावर लक्ष केंद्रित करणारा ३८ अब्ज रुबल (४६० दशलक्ष डॉलर)चा प्रकल्प सुरू केल्याने पुतिन यांनी स्वतः यात रस दाखवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असलेले अब्जाधीश पीटर थील यांनी दीर्घायुष्याच्या प्रकल्पांमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
ब्रायन जॉन्सन नावाच्या एका तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तीने स्वतःसाठी ‘अमरत्वाचे’ ध्येय ठेवले आहे. त्याने अनेक नवीन अँटी-एजिंग सिद्धांत, तंत्रे व ट्रेंड स्वतःवर आजमावून पाहिले आहेत. परंतु, वैज्ञानिकांनी अशा प्रयत्नांवर टीका केली आहे आणि त्यांना धोकादायक म्हटले आहे.
संशोधन काय सांगते?
‘एएफपी’ने मुलाखत घेतलेल्या संशोधकांनी ‘एपिजनेटिक्स’ (Epigenetics)वर विशेष भर दिला. बऱ्याच काळापासून डीएनएमधील बदल हे मानवी वृद्धत्वाचे एक महत्त्वाचे कारण मानले गेले आहे. परंतु, ‘एपिजनेटिक्स’ डीएनएमध्ये बदल न करता, जनुकांचा (जीन्स) अभ्यास करते. ‘एजिंग सेल’ (Aging Cell) जर्नलमध्ये जूनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, ‘रॅपमायसिन’ (Rapamycin) नावाचे औषध एपिजेनेटिक वृद्धत्वावर परिणाम करते. हे औषध माशांसहित अनेक प्राण्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रभावी ठरले आहे. परंतु, हे औषध माणसांवर प्रभावी ठरेल, याची कोणतीही खात्री नाही. सध्या संशोधकांनी असे सुचवले आहे की, लोकांनी आपले आयुष्य वाढविण्यावर भर देण्यापेक्षा जेवढे आयुष्य आहे, ते चांगल्या प्रकारे जगावे.