आशिया चषक सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती असा आरोप नक्वी यांनी केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तान युएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचे संकेत दिले. पण मूळात असा बहिष्कार घालता येतो का?


आशिया चषकात भारत-पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने बहिष्काराचा मुद्दा चर्चेत आला आहे. एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धस्त करत प्रत्युत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध दुरावले. आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळणार का? याविषयी साशंकता होती. केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित सामन्यांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळेल. मात्र द्विराष्टीय मालिका होणार नाही. सोप्या भाषेत भारतीय संघ पाकिस्तानात मालिकेसाठी जाणार नाही. याच धर्तीवर पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. केंद्र सरकारने हे धोरण स्पष्ट केल्यामुळे भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार हे स्पष्ट झालं. पहलगाम हल्ल्याला अवघे काही महिने झाले आहेत. या घटनेची दाहकता अनुभवलेल्या असंख्य चाहत्यांनी भारत-पाकिस्तान सामना पाहणार नाही अशी भूमिका घेतली. भारताने पाकिस्तानशी खेळू नये अशी भूमिका अनेक माजी खेळाडूंनी मांडली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी हस्तांदोलन केलं नाही. सर्वसाधारण शिरस्त्याप्रमाणे नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करतात. भारतीय संघाने हा सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करतात. भारतीय संघाने हस्तांदोलन टाळलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रशिक्षक माईक हेसन यांनीही हस्तांदोलन न करण्याची भूमिका पटली नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानचा संघ सामना संपल्यानंतर खेळभावनेचा भाग म्हणून हस्तांदोलनासाठी तयार होता मात्र भारतीय खेळाडूंनी पाठ फिरवत ड्रेसिंगरुममध्ये जाणं पसंत केलं असं हेसन म्हणाले.

आशिया चषक स्पर्धेचे संयोजक कोण?

आशिया चषक स्पर्धा ही दर दोन वर्षांनी होते. आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आशियाई उपखंडातील देशांमध्ये सौहार्द वाढीस लागावं यासाठी १९८५ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली. आगामी काळात कोणत्या प्रकाराचा वर्ल्डकप होणार आहे त्यानुसार स्पर्धेचा फॉरमॅट ठरतो. यंदाचा आशिया चषक टी२० प्रकारात होत आहे. यंदा या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, युएई, हाँगकाँग हे संघ सहभागी होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भारताचे जय शाह यांच्याकडून पदभार स्वीकारला. जय शाह यांनी आययीसीच्या प्रमुखपदाची धुरा हाती घेतल्याने आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालं.

आशिया चषकासाठी नियम कोणाचे?

स्पर्धेचं आयोजन आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे होत असलं तरी सामन्यांसाठी नियम आयसीसीचेच लागू आहेत. आयसीसीसाठी नियम तयार करण्याचं काम मेरलीबोन क्रिकेट क्लब ही संस्था करते. आयसीसी कोड ऑफ कंडक्ट त्यांनीच तयार केलं आहे. ही नियमावली सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांना लागू होते. बाकी आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे या स्पर्धेकरता सामनाधिकारी आणि पंचांच्या नियुक्तीचं कामही आयसीसीच करतं.

एखाद्या संघाला बहिष्कार टाकता येतो का? त्याचे काय परिणाम होतात?

बहिष्कार टाकता येतो मात्र त्याच्या परिणामांचाही सामना करावा लागतो. खेळांव्यतिरिक्त अन्य कारणासाठी सामन्यावर बहिष्कार टाकल्यास सामना forefeit करण्यात येतो. बहिष्कार घालणाऱ्या संघामुळे सामना होत नाही. प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित करण्यात येतं. त्यांना विजयाचे गुणही मिळतात. बाद फेरीच्या समीकरणांसाठी गुण अतिशय महत्त्वाचे असतात. न खेळता जिंकण्याचे गुण मिळत असल्याने प्रतिस्पर्धी संघाचा फायदा होतो. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकाच्या समीकरणानुसार, प्राथमिक फेरीत दोन गट मिळून ८ संघ सहभागी होत आहेत. यापैकी प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील. अव्वल २ मध्ये स्थान मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सामने जिंकणं आणि रनरेट चांगला राखणं आवश्यक आहे. भारतीय संघाने बहिष्काराचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं असतं. त्यांना विजयाचे गुण मिळाले असते. यामुळे पाकिस्तानच्या सुपर फोर फेरीत जाण्याची शक्यता वाढली असती. दुसरीकडे भारताला या लढतीच्या गुणांवर पाणी सोडावं लागलं असतं तर बाकी सगळे सामने मोठ्या फरकाने जिंकणं अनिवार्य झालं असतं. या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा दावेदार आहे. जेतेपेदापर्यंत पोहोचण्यासाठी प्राथमिक फेरी, सुपर फोर आणि त्यानंतर अंतिम लढत अशी आगेकूच करावी लागते. मात्र त्यासाठी सामने जिंकणंही आवश्यक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार आणि अन्य एखाद्या सामन्यात हार झाल्यास जेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळू शकतं.

यासंदर्भात आयसीसीचे नियम काय सांगतात?

आयसीसी कोड ऑफ कंडक्ट २.२० नुसार खेळभावनेला बट्टा लावणारं वर्तन नियमांचं उल्लंघन करणारं मानलं जाईल. याशिवाय कलम २.२१ नुसार खेळ स्थगित करावा लागेल किंवा त्याला बाधा पोहोचेल अशा स्वरुपाच्या वर्तनासाठी कारवाई करण्यात येऊ शकते. यासंदर्भात सामनाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.सामनाधिकाऱ्यांसमोर प्रकरणाची सुनावणी होते. संबंधित खेळाडूला, कर्णधाराला बाजू मांडण्याची संधी देण्यात येते. सर्व पैलूंचा अभ्यास केल्यानंतर सामनाधिकारी आपला निर्णय देतात.

बहिष्कार टाकल्यास काय कारवाई होते?

सामन्यावर बहिष्कार टाकल्यास संबंधित संस्थेच्या शिखर संघटनेकडून कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. खेळण्यास नकार दिल्यामुळे सर्वोच्च संघटनेकडून बंदीची कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ भारतीय फुटबॉल संघाने एएफसी फुटबॉल स्पर्धेत खेळण्यास नकार दिला तर त्यांच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. डेव्हिस चषक स्पर्धेत भारताच्या संघाने खेळायला नकार दिला तर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना त्यांना आगामी स्पर्धांमध्ये खेळण्यापासून रोखू शकतं. अॅथलेटिक्स सारख्या खेळात भारतीय संघाने खेळायला नकार दिला तर बंदीच्या बरोबरीने दंडाचीही तरतूद आहे.

बहिष्कारामुळे काय धोका?

भारताने ऑलिम्पिक तसंच कॉमनवेल्थ आयोजनासाठी मानस व्यक्त केला आहे. यजमानपद भूषवू इच्छिणाऱ्या देशानेच अशा स्वरुपाचा बहिष्कार टाकल्याचा इतिहास अडचणीचा ठरू शकतो. ऑलिम्पिक चार्टरनुसार, खेळाच्या व्यासपीठाचा अन्य कुठल्याही कारणासाठी वापर करण्यास अनुमती नाही.

बहिष्काराची उदाहरणं आहेत का?

१९८६ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने माघार घेतली होती. श्रीलंकेकडे यजमानपद होतं. तिथे गृहयुद्ध सुरू होतं. त्यामुळे केंद्र सरकारने संघ न पाठवण्याची सूचना केली. भारताऐवजी बांगलादेशला निमंत्रण देण्यात आलं.

१९९० मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भारतात झालेल्या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. १९९३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधामुळे त्यावर्षीचा आशिया चषकच रद्द करण्यात आला.

२००३ वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड संघाने झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला. झिम्बाब्वेत रॉबर्ट मुगाबे यांचं जुलुमी प्रशासन होतं. त्याचा निषेध म्हणून इंग्लंडने तिथे खेळण्यास तयार नसल्याचं सांगितलं. इंग्लंडने गुण गमावले.

यंदाच्या वर्षीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड-अफगाणिस्तान मुकाबल्यावर बहिष्काराचं सावट होतं. अफगाणिस्तानमधल्या तालिबानी राजवटीने महिलांच्या खेळण्यावर बंदी घातली. महिला खेळाडूंच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. अनेक महिला खेळाडूंनी देश सोडला. या अमानवी वागणुकीचा निषेध म्हणून अफगाणिस्तानविरुद्धचा सामना होऊ नये यासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र हा सामना झाला.

हस्तांदोलन करणं नियमावलीचा भाग आहे का?

हस्तांदोलन करावं असं आयसीसी कोड ऑफ कंडक्टमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. मात्र खेळभावनेची जपणूक म्हणून नाणेफेकीवेळी कर्णधार तर सामना संपल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करतात. मात्र तसं करणं बंधनकारक नाही. हस्तांदोलन केलं नाही यासाठी कारवाई किंवा दंडाची तरतूद नाही.

या स्पर्धेत भारत-पाकिस्तान किती वेळा आमनेसामने?

स्पर्धेची रचना पाहता, यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान तीनवेळा एकमेकांविरुद्ध उभे ठाकू शकतात. रविवारी प्राथमिक फेरीचा सामना झाला. आता सुपर फोरचा सामना होणार आहे. अंतिम फेरीतही हे दोन संघ समोरासमोर येऊ शकतात.