-बापू बैलकर
इतर देशांत लागू असलेले वाहन विम्यासाठीचे अॅड ऑन धोरण भारतातही लागू करण्याची मागणी वाढल्यानंतर गेल्या आठवड्यात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहन विमा धोरणामध्ये बदल करत ऍड ऑन वाहन विम्यासाठी तीन धोरणे लागू करण्यास विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे. यात वाहनचालक आपल्या वाहनाचा जसा वापर करेल त्या प्रमाणात विम्याचा हप्ता लागू होणार आहे. तसेच वाहन सुरक्षित न चालवल्यास याचा फटका वाहनमालकास बसणार असून अपघात कमी होण्यासही या धोरणाचा फायदा होणार आहे. एका मालकाकडे एकापेक्षा अनेक वाहने असल्यास त्यांचा एकच विमा काढणेही शक्य होणार आहे.

या धोरणाबाबत सध्या वाहनचालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे धोरण जुन्या की नवीन वाहनांना लागू होणार? तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे का ? वाहन विमा हप्ता स्वस्त होणार की महाग? या सर्व प्रश्नांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

-पे ऍज यू ड्राइव्ह
-पे हाऊ यू ड्राइव्ह
– फ्लोटर पॉलिसी

ही वाहन विम्यासाठीची तीन नवीन धोरणे आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जसे की जीपीएस प्रणाली, टेलिमॅटिक्स, मोबाइल ॲपद्वारे वाहन व वाहन चालकांच्याबाबत माहिती मिळवली जाणार आहे.

पे ऍज यू ड्राइव्ह
या प्रकारात गाडीच्या वापरावर विमा हप्ता आकारला जाईल. उदारणार्थ रमेश आणि श्याम या दोघांकडे एकाच प्रकारचे व एका वेळेस घेतलेले वाहन आहे. दोघांना वार्षिक ९००० रुपये हप्ता आहे. रमेशचा गाडी वापर वर्षाला ५० हजार कि. मी. आहे आणि श्यामचा गाडी वापर वर्षाला ७ हजार कि. मी. आहे. परंतु दोघांनाही समान हप्ता भरावा लागतो. आता या नवीन धोरणामुळे ज्याचा गाडीचा वापर कमी आहे त्यास कमी हप्ता आकारला जाईल आणि ज्याचा अधिक वापर असेल त्यांना अधिक हप्ता द्यावा लागेल. पुणेस्थित इन्शुरन्स सर्व्हेअर अँड इन्व्हेस्टिगेटर मिलिंद शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, करोनाकाळात अनेकांची वाहने अनेक महिने जागेवरच उभी होती. मात्र त्यांना वाहन विमा हप्ता भरावा लागत होता. या नवीन धोरणामुळे अशा प्रसंगात विमा ग्राहकांचा फायदा होणार आहे. मुंबई महानगराचे उदाहरण विचारात घेतले तर अनेक नोकरदार, व्यावसायिक आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात आणि फक्त सुट्टीच्या दिवशी आपल्या चारचाकी वाहनाचा वापर करतात. म्हणजे त्यांचा वाहनाचा वापर हा कमी आहे. मात्र त्यांना इतरांप्रमाणेच विमा हप्ता भरावा लागत होता. अशा वाहनमालकांना हे नवीन धोरण लाभदायक ठरणार आहे. हा विमा घेताना तुम्हाला आपल्या वाहनाच्या वार्षिक वापरासंदर्भात अंदाजे कि. मी. वापर किती हे सांगून विम्याची निवड करता येणार आहे. यात आपण निवडलेल्या अंदाजे किलोमीटर अंतरापेक्षा आपल्या वाहनाचा वापर अधिक झाला तरी यात पुढील पर्याय निवडून आपला विमा कायम ठेवता येणार आहे.

पे हाऊ यू ड्राइव्ह
या प्रकारात तुम्ही गाडी कशी वापरता त्यावर विमा हप्ता आकारला जाईल. एखादा वाहनचालक शांत, संयमाने, वाहतूक नियमांचे पालन करून विनाअपघात गाडी चालवत असेल तर अशा सुरक्षित वाहनचालकांसाठी कमी विमा हप्ता आकारला जाईल. तसेच भरधाव वेगात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन मालकांसाठी अधिक विमा प्रीमियम आकारला जाईल. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन, वित्त व जीवितहानी कमी होऊ शकेल. तसेच सुरक्षित वाहनचालकांचे प्रमाण वाढण्यास निश्चितच मदत होईल. सदर वाहनावर तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन चालविण्याच्या सवयींची माहिती गोळा केली जाईल व त्यानुसार सुरक्षित किंवा असुरक्षित वाहनचालक गणना करून हप्ता आकारला जाईल.

फ्लोटर पॉलिसी
आपण कुटुंबासाठी सर्व व्यक्तींसाठी एकत्रित विमा कवच एका पोलिसीअंतर्गत घेतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळा विमा काढण्याऐवजी एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांचा एकच विमा काढता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनासाठी वेगळा विमा आणि विविध तारखांना संपणाऱ्या त्यांच्या मुदती लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. यात अनेकदा एखाद्या वाहनाचा विमा काढणे राहून जाते. त्यालाही यामुळे आळा बसणार आहे.

विमा निवड कशी?
एकंदरीत, यामुळे ग्राहकांना व्यक्तिगत विमा हप्ता आकारला जाईल, जो वाहन चालविण्याच्या सवयी व वापरावर आधारित असेल. विमा कंपन्यांना अधिक जोखीम पत्करणाऱ्या वाहनचालकांकडून त्या जोखमीच्या प्रमाणात हप्ता आकारता येईल. तसेच ग्राहकांना त्यांच्या सोयी व गरजेनुसार विमा प्रकार निवडण्याची मुभा राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हप्त्यामध्ये बचत होणार का?
तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्यामुळे बनावट विमा दाव्यांना देखील आळा बसणार आहे. तसेच अंदाजे ५ ते २५ टक्क्यांपर्यंत विमा हप्त्यामध्ये बचत होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने हे धोरण लागू करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्या आहेत. अद्याप कोणत्याही कंपनीने आपले धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे किती किलोमीटरला किती हप्ता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यापुढे वाहन विमा कंपन्या आपला दर जाहीर करतील. त्यानुसार आपल्याला याची निवड करता येणार आहे.