आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल, असे इस्रोने जाहीर केले. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चांद्रयान-२ मोहिमेचा हा पुढचा टप्पा आहे. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ चे प्रक्षेपण केल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि त्यानंतर लॅण्डर विक्रम आणि रोव्हर प्रग्यान हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. महत्त्वाचे म्हणजे, चांद्रयान-२ दक्षिण ध्रुवाच्या ७० अंश अंतरावर असलेल्या मैदानी प्रदेशात उतरले होते, त्याच्याच आसपास चांद्रयान-३ उतरणार आहे. यावेळी जर सर्वकाही सुरळीत पार पडले तर दक्षिण ध्रुवावर उतरणारी ही जगातील पहिली मोहीम ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी चंद्रावर जी अंतराळयाने उतरली, ती सर्व विषुववृत्ताजवळील भागात उतरली आहेत. चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्ताच्या काही परिसरात याआधी याने उतरली आहेत. सर्व्हेयर ७ (Surveyor 7) हे यान आतापर्यंत विषुववृत्ताच्या थोडे पुढे जाऊन दक्षिण ध्रुवाच्या ४० अंश अंतरानजीक उतरले होते. नासाने ही मोहीम १० जानेवारी १९६८ साली हाती घेतली होती.

दक्षिण ध्रुवाच्या नजीक आतापर्यंत एकही अंतराळयान का उतरले नाही?

चंद्राच्या विषुववृत्तीय भागावरच आतापर्यंत अनेक अंतराळयाने का उतरली, यामागे काही कारणे आहेत. चीनचे चँग-ई ४ (Chang’e 4) हे अंतराळयान विषुववृत्ताच्या पुढे जाऊन उतरणारे पहिले अंतराळयान ठरले होते. चँग-ई ही चीनची चंद्रमोहीम असून त्यांच्या चांद्रसंशोधन कार्यक्रमातील दुसरा टप्पा होता. ही बाजू पृथ्वीवरून दिसत नाही.

हे वाचा >> विश्लेषण : ‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?

विषुववृत्ताजवळ उतरणे सोपे आणि सुरक्षित असल्याचे मानले जाते. येथील भूप्रदेश आणि तापमान हे सहन करण्याजोगे आणि उपकरणांसह शोधमोहीम करण्यास दीर्घकाळासाठी अनुकूल असणारे आहे. येथील पृष्ठभाग अतिशय सपाट असून उंच टेकड्या किंवा पर्वत जवळपास नाहीत. तसेच मोठ्या खळग्यांचेही प्रमाण येथे खूप कमी आहे. याठिकाणी सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो, कमीतकमी पृथ्वीच्या बाजूने असणाऱ्या भागावर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना नियमितपणे ऊर्जेचा पुरवठा होतो.

याउलट चंद्राचा ध्रुवीय प्रदेश अधिक कठीण आहे. येथील भूपृष्ठभाग सपाट नाही. येथील बरेच भाग पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव आणखी गडद अंधारात आहे. याठिकाणचे उणे २३० अंश सेल्सियस पेक्षाही कमी तापमान असते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि अत्यंत कमी तापमानामुळे उपकरणांकडून काम करणे अवघड होते. याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही सेंटिमीटर्सपासून ते काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत.

चांद्रयान-२ ने घेतलेले चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्र. यामध्ये छोट्या-मोठ्या विवरांचा आकार दिसून येत आहे. (Photo – ISRO)

शास्त्रज्ञांना दक्षिण ध्रुवावर संशोधन का करायचे आहे?

अतिशय खडतर वातावरण असल्यामुळे दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत चंद्रयान मोहिमा झालेल्या नाहीत. पण अनेक ऑर्बिटर मोहिमांनी पुरावे दिले आहेत की, याठिकाणी शोधमोहीम घेणे उत्कंठावर्धक असणार आहे. विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, अत्यंत थंड तापमान असल्यामुळे याठिकाणी अडकलेली एखादी वस्तू काहीही बदल न होता, अनेक वर्षांनंतरही गोठलेल्या अवस्थेत मिळू शकते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. २००८ साली भारताने राबविलेल्या चांद्रयान-१ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.

आणखी वाचा >> हुकले ‘विक्रम’ तरीही…

चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश का पोहोचत नाही?

पृथ्वीपेक्षा चंद्राची परिस्थिती वेगळी अशी आहे. पृथ्वीचा भ्रमण-आस (स्पिन ॲक्सिस) सौर कक्षेच्या तुलनेत २३.५ अंशात झुकलेला आहे, तर चंद्राचा भ्रमण-आस १.५ अंशानी झुकलेला आहे. चंद्राच्या या अद्वितीय भूमितीमुळे चंद्राच्या ध्रुवीय भागातून सूर्य नेहमी क्षितिजावरच दिसतो. त्यामुळे चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील अनेक भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही. डोंगराळ आणि पर्वतीय भागात त्यांच्या उंचीमुळं सूर्यप्रकाश असतो. मात्र, विवरातील खोल भागामध्ये गडद अंधार असतो. विवरातील या भागांना कायम अंधारी प्रदेश (Permanently Shadowed Regions – PSRs) म्हटले जाते.

‘नासा’ने २०१९ साली एका संशोधन अहवालात म्हटले की, चंद्राच्या अशा ध्रुवीय प्रदेशांतील पीएसआर्समध्ये पाणी अनेक काळापासून साठून राहिलेले असण्याची शक्यता आहे. डिव्हायनर इन्स्ट्रूमेंट ऑनबोर्ड एलआरओ (Lunar Reconnaissance Orbiter) यांनी संबंध चंद्रावरील आणि पीएसआर्समधील तापमानाचे मोजमाप केले आहे. चंद्रावरील काही भाग अतिथंड असल्यामुळे अशा भागांत पाणी साचून राहिल्याची शक्यता अधिक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 mission why isro wants to explore the moons south pole what is the lunar south pole kvg
First published on: 11-07-2023 at 16:18 IST