धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एचपीसीए) स्टेडियममध्ये भारतातील पहिली संकरित खेळपट्टी (हायब्रिड पिच) ‘आयपीएल’ सामन्यादरम्यान वापरली जाईल. या खेळपट्टीचे अनावरणही करण्यात आले. संकरित खेळपट्टीच्या रूपाने एका नवीन संकल्पना भारतीय क्रिकेटमध्ये राबविली जात आहे. संकरित खेळपट्टी म्हणजे काय, तसेच यात आणि नैसर्गिक खेळपट्टीमध्ये काय फरक आहे, याचा आढावा.

हायब्रिड पिच म्हणजे काय?

हायब्रिड पिच किंवा संकरित खेळपट्ट्या या नैसर्गिक गवत आणि सिंथेटिक फायबरचे मिश्रण असतात. पाच टक्के सिंथेटिक फायबर आणि ९५ टक्के नैसर्गिक गवताचा भाग असतो. सिंथेटिक फायबर नैसर्गिक पृष्ठभागावर टाकण्यात येते. यामुळे खेळपट्टीचे आयुष्य वाढते आणि एकसमान उसळीची हमी मिळते. अशा खेळपट्ट्यांना टिकाऊ मानले जाते. खेळपट्टीवर नैसर्गिक गवतही ठेवण्यात येते. खेळपट्टीची नैसर्गिकता कुठेही कमी होणार नाही यासाठी केवळ पाच टक्के फायबर वापरले जाते.

हेही वाचा : Israel-Hamas War: हमासला शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, इस्रायल-गाझा युद्ध थांबणार?

पदाधिकाऱ्यांची मते काय?

धरमशालेत लावण्यात आलेल्या खेळपट्टीत ‘द युनिव्हर्सल’ हे संकरित फायबर वापरण्यात आले आहे. नेदरलँड्स स्थित ‘एसआयएस’ या कंपनीने ही खेळपट्टी तयार केली आहे. या खेळपट्टी सामान्य खेळपट्टीच्या तुलनेत अधिक टिकाऊ असेल. तसेच यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल आणि क्रिकेटचे सामने अधिक दर्जेदार होतील, असा अंदाज आहे. इंग्लंडमधील लॉर्ड्स आणि द ओव्हल या महत्त्वाच्या स्टेडियमवर मिळालेल्या यशानंतर संकरित खेळपट्ट्यांचा वापर आता भारतात सुरू केल्याने येथील क्रिकेटमध्ये क्रांती घडणार आहे, असे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले. इंग्लंडचे माजी खेळाडू आणि ‘एसआयएस’ इंटरनॅशनल क्रिकेटचे संचालक पॉल टेलर हे मुंबई आणि अहमदाबाद येथे आणखी काही प्रकल्प राबवण्यास उत्सुक आहेत. ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंजुरीनंतर या खेळपट्ट्यांचा खेळावर काय सकारात्मक परिणाम होईल, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच यापुढे आम्ही मुंबई आणि अहमदाबाद येथे हा प्रयोग राबवण्याच्या प्रयत्नात आहोत,’’ असे टेलर म्हणाले. दरम्यान, ‘आयसीसी’ने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संकरित खेळपट्टींचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यास मंजुरी दिली आहे. इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्येही अशा खेळपट्ट्यांचा वापर करण्याची योजना आहे.

हेही वाचा : ताडोबाच्या वाघांचे सह्याद्रीच्या अभयारण्यात स्थलांतर करणार; व्याघ्र संवर्धनात वन्यजीव कॉरिडॉरची महत्त्वाची भूमिका

संकरित खेळपट्ट्या वेगळ्या कशा?

टेलर यांच्या मते, सामन्यांदरम्यान खेळपट्टीच्या नूतनीकरणासाठी लागणारे काम खूपच कमी होईल. नैसर्गिक खेळपट्टीवर एक सामना संपला की दुसरा सामना होण्यापूर्वी खेळपट्टीचे पुन्हा नूतनीकरण करून ती व्यवस्थित केली जाते. त्यामुळे मैदानी कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण असतो. मात्र, संकरित खेळपट्टीचा वापर केल्यानंतर तुम्ही नेहमीपेक्षा तिपटीने जास्त खेळू शकता. संकरित खेळपट्टीचा वापर करत असताना नैसर्गिक खेळपट्टीवर दिसणारे वेगवेगळ्या बदलांचा अभ्यास करण्याचे आव्हान असेल,’’ असे टेलर यांनी सांगितले. ‘‘खेळपट्टीची वैशिष्ट्ये मूलभूतपणे बदलणार नाहीत आणि गरजेनुसार खेळपट्टीवर नियंत्रण ठेवता येईल. खेळपट्टीतील आर्द्रतेचे प्रमाण आपण नियंत्रित करू शकता. कोरड्या खेळपट्टीवर खेळायचे असेल तर त्याचेही नियोजन असते. जर तुम्हाला अधिक गवत सोडायचे असेल तर, तुम्ही ते करू शकता,’’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा : विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?

फिरकीपटूंना फायदा होईल का?

फिरकीपटूंना या खेळपट्टीतून मदत मिळेल. नैसर्गिक खेळपट्टीपेक्षा संकरित खेळपट्टीतून त्यांना अधिक उसळी मिळते असे दिसून आल्याचे टेलर म्हणाले. सामन्यानंतर परिस्थिती बदलत असतानाही खेळपट्टीवर नियंत्रण ठेवता येते, असे टेलर यांनी सांगितले. खेळपट्टीच्या होणाऱ्या वापरावर तिचे आयुष्य अवलंबून असते. खेळपट्टीची नीट काळजी घेतली गेली आणि त्यावर वाजवी संख्येने सामने खेळले गेले, तर ७-१० वर्षे ही खेळपट्टी टिकू शकते. किमान सात वर्षे तरी ही खेळपट्टी टिकण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.