Chinese Navy Fujian: चीनने अलीकडेच तिसरी विमानवाहू युद्धनौका फुजियान समारंभपूर्वक नौदलाच्या सेवेत दाखल करून घेतली. या युद्धनौकेचा नौदलात दाखल होण्याचा सोहळा बीजिंगमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतः या सोहळ्यास जातीने उपस्थित होते. या विमानवाहू युद्धनौकेच्या चिनी नौदलातील समावेशामुळे आता चीन हा अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक विमानवाहू युद्धनौका असलेला देश ठरला आहे.

‘मेक इन चायना’

चीनसाठी ‘फुजियान’ ही केवळ आणखी एक विमानवाहू युद्धनौका नसून चीनच्या वाढत्या सामरिक सागरी शक्तीचे आणि अभियांत्रिकी कौशल्याचे ते प्रतिकच आहे. ‘फुजियान’ ही चीनची पहिली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. यापूर्वीच्या दोन विमानवाहू युद्धनौका लिओनिंग आणि शानडोंग या अनुक्रमे सोव्हिएत युनियनची जुन्या युद्धनौका होत्या. त्यामुळे ‘फुजियान’ ही चीनच्या नौदल तंत्रज्ञानात ‘मेक इन चायना’च्या नव्या युगाची सुरुवात ठरते.

या तीनही नौकांची नावे चीनच्या किनारपट्टीवरील प्रांतांवरून देण्यात आली आहेत. या तिसऱ्या नौकेच्या समावेशामुळे चीनने भारत, ब्रिटन आणि इटलीसारख्या प्रबळ सागरी शक्तींना मागे टाकले आहे. कारणया सर्व देशांकडे प्रत्येकी दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. भारताकडे आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य अशा दोन विमानवाहू युद्धनौका आहेत.

Chinese Navy Fujian
फुजियान या चीनच्या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी सुरू असतानाचे छायाचित्र (Photo- Wikipedia)

‘ब्लू वॉटर नेव्ही’

‘फुजियान’मुळे चीनचं नौदल आता ‘ब्लू वॉटर नेव्ही’ म्हणजेच दूरवर महासागरांमध्ये कार्यरत असणारं नौदल ठरलं आहे. आतापर्यंत चीनच्या युद्धनौका किनारपट्टीच्या किंवा जवळच्या सागरी हद्दीतच प्रामुख्याने कार्यरत होत्या. पण ही नवीन युद्धनौका तैवानची सामुद्र्यधुनी, दक्षिण चीन समुद्र, आणि पूर्व चीन समुद्र या वादग्रस्त भागांत तैनात असणार आहे. त्यामुळे या परिसरातील चिनी कारवायांमध्ये येणाऱ्या काळात वाढ अपेक्षित आहे. या परिसरातील देशांसाठी ही डोकेदुखीच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

तरंगती युद्धभूमी

विमानवाहू युद्धनौकेला तरंगती युद्धभूमी असं म्हटलं जातं. कारण त्यावर लढाऊ विमानांसाठी धावपट्टी असते. शत्रूच्या अगदी जवळ जाऊन लढाऊ विमानांची उड्डाण करत शत्रूचे अधिक नुकसान करण्याची क्षमता या विमानवाहू युद्धनौकेमुळे प्राप्त होते. त्यामुळे चिनी नौदलाच्या आक्रमणाला यामुळे धार चढेल, असे संरक्षणतज्ज्ञांना वाटते.

अत्याधुनिक वैशिष्ट्ये

‘फुजियान’ ही ८०,००० टनांहून अधिक वजनाची आणि सुमारे ३१६ मीटर लांबीची नौका आहे. तिचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट लाँच सिस्टीम (EMALS) अशा प्रकारची लढाऊ विमानांसाठीची खास प्रणाली सध्या तरी केवळ अमेरिकेच्या अत्याधुनिक USS Gerald R. Ford या युद्धनौकेवरच उपलब्ध होती. मात्र चीननेही आता ही प्रणाली विकसित करण्यात यश मिळवले आहे.

स्की जंप डेक

पूर्वीच्या लिओनिंग आणि शानडोंग या युद्धनौकांवर ‘स्की-जंप’ डेक होता. अशाच प्रकारचा विमानोड्डाणासाठीचा स्की जंप डेक भारताच्या पहिल्या आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराटवरही होता. तिथून उड्डाण करताना लढाऊ विमानांना पूर्ण इंधन आणि शस्त्रसंभार घेऊन उड्डाण करता येत नाही. परंतु ‘फुजियान’वरच्या कॅटापुल्ट प्रणालीमुळे लढाऊ विमाने पूर्ण इंधन आणि शस्त्रसज्जतेच्या पूर्ण क्षमतेसह उड्डाण करू शकतात. उदाहरणार्थ- चीनचे नवीन स्टेल्थ फायटर J-35, तसेच KJ-600 सारखी हवाई रडार यंत्रणा असलेली विमाने इथून सहज हवेत झेपावू शकतात.

क्षमता वाढली

यामुळे चीनच्या नौदलाची कार्यक्षमता तर वाढलेली आहेच. पण त्याही शिवाय दूरवर प्रवास करून इच्छीत स्थळी शत्रूच्या नजीक जात प्रहार करण्याची क्षमताही लक्षणीयरीत्या वाढली आहे.

अणुउर्जेवर मात्र नाही

ही युद्धनौका अत्याधुनिक असली, तरी ती अणुऊर्जेवर चालणारी नाही. त्यामुळे तिची गती आणि समुद्रात राहण्याची मर्यादा अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांपेक्षा कमी आहे. सध्या प्रकाशित वृत्तानुसार ‘फुजियान’ सुमारे ८,००० ते १०,००० सागरी मैल इतके अंतर एकदा इंधन भरल्यानंतर पार करू शकते. अमेरिकेकडे सध्या ११ विमानवाहू युद्धनौका असून त्या सर्वच्या सर्व अणुऊर्जेवर चालतात, त्यामुळे त्या महिनोनमहिने समुद्रात राहू शकतात. चीन सध्या अणुऊर्जेवर चालणारे युद्धनौकांसाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहे.

५० लढाऊ विमाने वाहून नेण्याची क्षमता

‘फुजियान’ ही युद्धनौका अमेरिकेच्या Nimitz किंवा Ford वर्गाच्या युद्धनौकांपेक्षा आकारानेही लहान आहे. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकांची क्षमता ६० ते ७० लढाऊ विमाने एकाच वेळेस वाहून नेण्याची आहे, तर ‘फुजियान’ अंदाजे ५० लढाऊ विमाने वाहून नेऊ शकते. फुजियानवर लढाऊ विमानांसाठी दोन लिफ्ट आहेत, तर USS Ford वर तीन लिफ्ट असून तीनच कॅटापुल्ट आहेत, तर उर्वरित अमेरिकन युद्धनौकांवर चार लिफ्ट उपलब्ध आहेत.

सामरिक परिणाम

‘फुजियान’चा समावेश चिनी नौदलात झाल्यानंतर आता चीन त्यांच्या सागरी प्रभावाचा विस्तार करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकेल, असे तज्ज्ञांना वाटते. या युद्धनौकेच्या मदतीने चीनला तैवानजवळ आणि इंडो-पॅसिफिक भागात त्यांचे अस्तित्व सतत राखता येईल. याचा थेट परिणाम अमेरिकन आणि भारतीय नौदलांच्या रणनीतिवरही पडू शकतो, असेही तज्ज्ञांना वाटते. गेल्या दशकभरात चीनने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील त्यांच्या कारवायांमध्ये वाढ केली आहे. आता नव्याने दाखल झालेली ही युद्धनौका त्यामुळेच भारतासाठी अधिकची डोकेदुखी ठरू शकते.