Cyclone Montha Impact on Maharashtra : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘मोंथा’ असे नाव देण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ताशी ११० किमी वेगाने वारे वाहत असल्याने सोमवारपासूनच किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या पाच वर्षांत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात अनेक चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळांचा महाराष्ट्रावर कसा परिणाम झाला? त्या संदर्भातील हा आढावा…

चक्रीवादळ म्हणजे काय? ते कसे तयार होते?

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वारे बदलले की एक अख्खा ऋतू बदलतो आणि निसर्गचक्र पुढे सरकते. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमिनीच्या दिशेने वाहू लागतात. या वाऱ्यांचे प्रत्येक वेळी वादळात रुपांतर होतेच असे नाही. मात्र, त्यामध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते, त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असते. या कमी दाबाच्या केंद्राला ‘चक्रीवादळाचा डोळा’ असे म्हटले जाते. या डोळ्याभोवती हवा गोल गोल फिरून विध्वंसक वादळ निर्माण करते.

चक्रीवादळांना वातावरणातील विचलन असेही म्हणतात. या चक्रीवादळांचा आकार गोलाकार, लंबवर्तुळाकार ते ‘V’ आकारापर्यंत असतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

आणखी वाचा : Supreme Court on Maharashtra Government : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची कानउघडणी का केली? प्रकरण काय?

चक्रीवादळांचा महाराष्ट्रावर कसा होतो परिणाम?

  • गेल्या पाच वर्षांत बंगालच्या उपसागरात अनेक चक्रीवादळे निर्माण झाली असली तरी त्यापैकी मोजक्याच चक्रीवादळांचा महाराष्ट्रावर परिणाम झालेला आहे.
  • ३ जून २०२० रोजी ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन धडकले होते.
  • या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला.
  • निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर मोठे नुकसान केले.
  • अनेक ठिकाणी शेतमालाचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडल्या.
  • १२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणारे हे पहिले तीव्र चक्रीवादळ होते.
  • २०२१ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले होते.
  • सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता.
  • गुजरातकडे सरकताना तौक्ते वादळाने कोकण किनारपट्टी भागालाही मोठा तडाखा दिला.
  • परिणामी, महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
  • २०२३ मध्ये अरबी समुद्रातून आलेल्या बिपरजॉय वादळामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला मोठा फटका बसला होता.
  • या चक्रीवादळातील वाऱ्यांची तीव्रता ताशी ४५ ते ५० किमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  • पालघरशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांवरही या वादळाचा परिणाम झाला होता, फळबागासह भाजीपाला पिकांची मोठी नासधूस झाली होती.

महाराष्ट्रातील सर्वात तीव्र चक्रीवादळ कोणते?

ऑक्टोबर २०२५ मध्ये आलेल्या शक्ती वादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसला तरी खबरदारी म्हणून मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या अनेक चक्रीवादळांचा महाराष्ट्राला थेट फटका बसत नाही, परंतु त्यांच्या बाह्य प्रभावामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असते. मागील काही वर्षांत अरबी समुद्रात अनेक कमी तीव्रतेची चक्रीवादळे तयार झाल्याचे दिसून येते. या चक्रीवादळांनी महाराष्ट्राला वेळोवेळी धोका निर्माण केला आहे. नोंदीनुसार, २०२० मध्ये आलेले ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ १२९ वर्षांनंतर किनारपट्टी भागात धडकलेले सर्वात तीव्र चक्रीवादळ होते.

हेही वाचा : नितीश कुमार यांची ‘पलटी’ भाजपासाठी कशी ठरतेय फायदेशीर? बिहारचे समीकरण काय सांगते?

मोंथा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय आहेत. त्यापैकी बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. मोंथा हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे. यापार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या आणि छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट; तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फारसा धोका नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.