Dashavatara Movie Who is Rakhanadar: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने सध्या राखणदार या देवतेबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. हा राखणदार कोण? हा खरंच देव आहे का? अशा प्रश्नांची कमी- अधिक फरकाने चर्चा होत आहे. राखणदार या शब्दातच या देवतेचे कार्य दडलेले आहे. प्रामुख्याने एखाद्या क्षेत्राचे रक्षण करणे किंवा राखण करण्याचे कार्य ही देवता करते. राखणदाराचा निसर्गाशी असलेला संबंध चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे. कोकणातील राखणदार हा वेतोबा, भैरोबा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. हातात घुंगरू असलेली काठी, पायात चामड्याची चप्पल, खांद्यावर घोंगडी असे काहीसे राखणदाराचे रूप असते. भक्ती, शक्ती आणि भीती तसेच गूढता असे आगळे वेगळे समीकरण आपल्याला राखणदाराच्या संकल्पनेत पाहायला मिळते. त्याच निमित्ताने कोकणातील राखणदाराची हजारो वर्षांची परंपरा नेमकं काय सांगते? याचा घेतलेला आढावा.
राखणदार हजारो वर्षांच्या सांस्कृतिक जडण घडणीचा साक्षीदार
भारतीय संस्कृतीने नेहमीच मानवी उत्क्रांतीला अनुसरून परंपरा आत्मसात केल्या. माणूस हा निसर्गाचाच अविभाज्य भाग आहे, म्हणूनच उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यावर त्याने निसर्गपूजनाला महत्त्व दिले. कालांतराने याच निसर्गशक्तींना काया देऊन राऊळी विराजमान करण्यात आले. असे असले तरी उत्क्रांतीच्या या प्रवासात काही सांस्कृतिक अनुबंध आजही तसेच अबाधित आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे राखणदार. दशावतार सिनेमाच्या निमित्ताने कोकणातील राखणदाराची चर्चा होत असली तरी, या देवतेचा इतिहास हा भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक जडण घडणीचा साक्षीदार आहे.
क्षेत्रपाल ते राखणदार
उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील भटक्या माणसापासून ते शेतीसाठी एका ठिकाणी स्थायिक होणार्या माणसापर्यंत निसर्गाने माणसाला भरभरून दिलं. म्हणूनच भरणपोषण करणाऱ्या क्षेत्राला, भूमीला आदिशक्ती मानले जाते. तर, आकाशाला पुरुषतत्त्वाचं प्रतीक मानले जाते. आकाशातून होणाऱ्या पर्जन्याच्या स्पर्शाने भूमी सृजन पावते, ही यामागची संकल्पना आहे. यातून पुरुष आणि प्रकृती यांच्या मिलनाची संकल्पना स्पष्ट होते. प्रकृतीबरोबरच्या याच विश्वपुरुषाचे रूप क्षेत्रपालाच्या रूपात अनुभवास येते.

क्षेत्रपाल किंवा भूपती
विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या भूमीचे, क्षेत्राचे रक्षण करणारा भूपती किंवा क्षेत्रपाल असतो. म्हणूनच एखाद्या क्षेत्राचा राजा हाही क्षेत्रपाल किंवा भूपती ठरतो. म्हणजेच सजीव सृष्टीच्या पालनपोषणाचे कार्य भूमी करत असल्याने तिच्या रक्षणाची जबाबदारी ज्याच्याकडे असते तो क्षेत्रपाल, अशी संकल्पना यातून अधोरेखित केली आहे. हाच क्षेत्रपाल पुढे कोकणात राखणदार म्हणून भेटीस येतो, तर भारतातील वेगवगेळ्या प्रांतात तो वेगवेगळ्या नावाने आपले अस्तित्त्व दर्शवतो.
भैरव हाच राखणदार
राखणदाराचे किंवा क्षेत्रपालाचे अस्तित्त्व वेदपूर्व कालखंडापासून आहे. परंतु, मौखिक किंवा साहित्यिक संदर्भ धुडांळताना वैदिक साहित्यात डोकावून पाहावे लागते. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये क्षेत्रपतीकडे गोधन, अश्व आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागितल्याचा उल्लेख आहे. तर, अथर्ववेदातही शेती, वनस्पती आणि नांगरणी यासंबंधी स्तोत्र सापडतात, त्यात क्षेत्रपतीचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन वाङ्मयात क्षेत्रपती म्हणून रुद्राचा उल्लेख करण्यात आला आहे.
रक्षक देवता
वास्तोष्पति ही वैदिक साहित्यातील एक रक्षक देवता आहे. काही अंशी ही देवता रुद्राशी साम्य दर्शवते. या देवतेचा संबंध कुत्र्याशीही जोडला जातो. कुत्रा हे क्षेत्रपालाचे, भैरवाचे वाहन आहे. तर, कोकणातील राखणदाराबरोबरही कुत्रा असतो. भैरव हाच क्षेत्रपाल किंवा राखणदार असल्याचे पौराणिक साहित्याने मान्य केले आहे. भैरव हा कुत्र्याबरोबर असतो किंवा त्याच्यावर स्वार असतो, म्हणून त्याला श्वाश्व म्हणतात. म्हणजेच त्याचे वाहन कुत्रा आहे. त्यामुळे क्षेत्रपाल ते राखणदार या परंपरेचा दीर्घ प्रवास येथे लक्षात येतो.
राखणदार आणि शैव परंपरा
कोकणातील आज वेगवगेळ्या भागात राखणदार किंवा क्षेत्रपालाची वेगवेगळी नाव प्रचलित असली तरी, त्यांचा मुख्य संबंध हा शैव परंपरेशी आहे. दक्षिण भारतात भैरवालाच क्षेत्रपाल म्हणून वेगवेगळ्या नावाने पुजले जाते. किंबहुना, महाराष्ट्रातही भैरों, बहिरोबा वा भैरोबा या ग्रामदेवतेचे, राखणदाराचे शिवाशी तादात्म्य मानले गेले आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते. शिवाच्या इतर गणांचाही उल्लेख क्षेत्रपाल किंवा राखणदार म्हणून येतो.
भूमीचा रक्षक आणि आठ भैरव
भैरवस्तोत्रामध्ये क्षेत्रपाल हे भैरवाच्या १०८ नावांपैकी एक मानले गेले आहे, तर कालभैरवस्तोत्रात भैरवाला थेट ‘क्षेत्रपाल’ म्हणून संबोधले आहे. उलटपक्षी, देवताध्यानश्लोक, ध्यानग्रंथ आणि ध्यानरत्नावलीत क्षेत्रपालालाही भैरव म्हणून संबोधलेले गेले आहे. तसेच दक्षिणकुटीद्विपक्षेत्रमाहात्म्य मध्ये भैरवाला ‘भूमीचा रक्षक’ म्हणजेच क्षेत्रपाल म्हटले आहे, त्याच्यापासून आठ भैरव उत्पन्न होतात असाही उल्लेख आहे.
अष्टभैरव
शैव आगमांत एकूण ६४ भैरवांचे आठ वर्ग दिलेले असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. तंत्रग्रंथांनुसार ६४ भैरव हे ६४ योगिनींचे स्वामी असतात. अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल (क्षेत्रपाल) म्हटले जाते. काशीत प्रवेश करताना प्रथम त्याचे दर्शन घेतले जाते व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. भैरव हा क्षेत्रपाल म्हणून शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ ठरते, असे मानले जाते.
क्षेत्रपालाचे भूमीशी, देवीशी असलेले नाते
काही आगमिक ग्रंथांमध्ये क्षेत्रपालाचे नाते वटुकभैरवाशी जोडले आहे. ‘वटुक’ (बटुक) या संज्ञेचा अर्थ कुमार किंवा बुटका असा होतो. ध्यानश्लोकसंग्रहादी आणि ईशानशिवगुरुदेवपद्धतीमध्ये वटुक अथवा कुमार हा भूत-प्रेतांचा अधिपती मानला गेला आहे आणि भूमीचा रक्षक म्हणून पूजला गेला आहे. क्षेत्रपालाचे बालसदृश रूप मयमतम् मध्येही अधोरेखित केले गेले आहे. तर पूर्वकारणागममध्ये त्याचे रूप ‘देवीला शांत करणारे’ असे वर्णन केले आहे. एकूणच, भैरवाचे क्षेत्रपाल म्हणून भूमीशी म्हणजेच देवीशी असलेले नाते यातून अधोरेखित होते.
भैरव, राखणदार आणि वृक्षपूजा
पौराणिक कथेतील संदर्भानुसार, भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक किंवा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फळ मिळणार नाही, असा शिवाने उःशाप दिला. राजस्थानमध्ये शमी वृक्षाच्या खाली भैरवाचे स्थान असते. शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात. म्हणूनच, काही ठिकाणी राखणदार किंवा क्षेत्रपाल हा वनदेवतेच्या रूपातही पूजला जातो. गावाच्या, क्षेत्राच्या रक्षणाशिवाय शत्रूंचा नाश करण्यासाठीही राखणदाराला आवाहन केले जाते.
कोकणातील राखणदाराला काही ठिकाणी कोंबड्याच्या नैवैद्य का दिला जातो?
कोकणातील राखणदार हा शैवपंथीय असल्याने त्याला पंचमकार वर्ज्य नाहीत. मूलतः राखणदाराचा संबंध हा आगमिक परंपरेशी असल्याने तांत्रिक पूजेतील गोष्टींचा निषेध नाही. म्हणूनच कोकणात भूतबाधा किंवा तत्सम व्याधींसाठी राखणदाराचा धावा केला जातो आणि या राखणदाराला कोणत्याही जातीच्या मर्यादा नाही.
भैरवी कोण?
दशावतार सिनेमाच्या शेवटी ‘भैरवी सुरू झाली’ होशील असा उल्लेख आहे. भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप आहे. भैरवी महाविद्यांपैकी सहावी देवी, शिवाच्या दहा शक्तींपैकी एक, आठ अबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्युशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी १२ वर्षांची मुलगी आहे. त्याचप्रमाणे भैरवी हा हिंदुस्थानी संगीतातील एक राग आहे. हा राग प्रामुख्याने शेवटचा राग म्हणून गायला जातो. संगीतोत्सव किंवा मैफलीच्या अखेरीस वातावरण शांत व माधुर्यपूर्ण करण्यासाठी त्याची निवड केली जाते. दशावतार नाटकात नांदीइतकच ‘रंगपूजा’ या भैरवीलाही महत्त्व आहे. भैरवी झाल्याशिवाय नाटकातला कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. या चित्रपटात एक संघर्ष सुरू असून त्याचा अंत होताना भैरवी सुरू झाली म्हणजे शेवट जवळ झालाय असा संदर्भ देण्यात आहे. तर, दुसऱ्या बाजूला तू शक्ती होऊन हा लढा पुढे नेशील असाही अर्थ सूचित होतो.
“दशावतार चित्रपटाने कोकणातील राखणदार या अद्भुत देवतेला नव्या पिढीसमोर आणले. राखणदार म्हणजेच क्षेत्रपाल, तर त्याच्याबरोबरची भैरवी म्हणजे स्त्रीशक्तीचे उग्र रूप. या दोघांच्या अस्तित्त्वात रक्षण आणि संहार यांचा समतोल दिसतो. आजही कोकणात ही परंपरा जिवंत आहे आणि तिच्यातूनच भारतीय संस्कृतीतील सातत्य, लोकश्रद्धेची ताकद आणि शैव परंपरेतील गूढतेचा वारसा अनुभवास येतो.