सुमित पाकलवार

गुजरातमधील मुकेश अंबानी यांच्या प्राणिसंग्रहालयात हत्ती पाठवण्यावरून प्रकाशझोतात आलेले गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त कमलापूर येथील हत्ती कॅम्प हत्तीच्या नवजात पिल्लाच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी मंगला नावाच्या गरोदर हत्तिणीच्या पिल्लाचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. वनकर्मचारी हत्तीच्या शोधात कॅम्पलगतच्या जंगलात गेले असता त्यांना पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. यापूर्वीही ४ पिल्लांचा येथे मृत्यू झाला आहे. या पिल्लांचा ‘हर्पिस’ या आजाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवला जातो. मात्र, वैद्यकीय सुविधांचा अभाव हेही मुख्य कारण असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.

हत्तींची गैरसोय का होत आहे?

इंग्रज काळापासून हा कॅम्प वापरात आहे. तेथील हत्तींची वंशावळ वाढून सद्यःस्थितीत सहा मादी आणि दोन नर असे एकूण आठ हत्ती येथे आहेत. त्यांच्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथे नाही. प्रशिक्षित माहूत, कायमस्वरूपी वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने हत्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषकरून, हत्तींच्या पिल्लांना याचा अधिक फटका बसतो आहे. यामुळे हत्तींच्या आजारावर किंवा हत्तीच्या प्रसूतीवेळी त्यांना योग्य उपचार मिळत नाही. परिणामी हत्तींचा मृत्यू होतो.

वनविभागाचे म्हणणे काय?

एकेकाळी हे हत्ती वनविभागाचे कर्मचारी होते. यांत्रिकीकरणामुळे त्यांची गरज संपली. मात्र, आता या हत्तींची देखभाल करण्याचे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आहे त्या सुविधा व कर्मचाऱ्यांवर हत्ती कॅम्प सुरू आहे. हत्तींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास १७० कि.मी. लांब चंद्रपूरहून वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवावे लागते. परिणामी हत्तींवर उपचारात उशीर होतो, असे वनविभागाचे म्हणणे आहे. यामुळे येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती हाच एकमेव पर्याय आहे. परंतु हा निर्णय राज्यस्तरावरचा असल्याने वनविभाग देखील हतबल आहे.

विश्लेषण: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी का मिळत नाहीत?

हत्ती कॅम्पची सद्यःस्थिती काय?

आजमितीस हत्ती कॅम्पमध्ये एकूण ८ हत्ती आहेत. त्यात बसंती, प्रियांका, मंगला, रूपा, राणी आणि लक्ष्मी अशा एकूण सहा मादी तर गणेश आणि अजित हे दोन नर आहेत. मागील सहा ते सात वर्षात कृष्णा, आदित्य, सई, अर्जुन आणि परवा जन्मलेले नवजात पिल्लू या पाच पिल्लांचा मृत्यू झाला. त्यांच्या देखभालीसाठी ५ माहूत आणि ४ चाराकटर आहेत. मात्र, ते पुरेसे नाही.

पर्यटक आणि प्राणीप्रेमींमध्ये नाराजी का?

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी दूरवरून पर्यटक येतात. मधल्या काळात मुकेश अंबानी यांच्या प्राणी संग्रहालयात येथील हत्ती पाठवण्यात येणार होते. मात्र, राज्यभरात संतापाची लाट उसळल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु दरवर्षी वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे येथे हत्तीच्या पिल्लांचा मृत्यू होत असल्याने पर्यटकांनी आणि प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. नक्षल्यांच्या माहेर घरात नावारूपास आलेले पर्यटनस्थळ यामुळे बंद होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिकतेने लक्ष देऊन येथील समस्या सोडवावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. जर प्रशासन किंवा राज्य सरकार ही समस्या सोडवण्यास असमर्थ असेल तर येथील हत्तींना मारण्यापेक्षा त्यांना इतरत्र हलविलेले बरे, असाही एक मतप्रवाह आहे.

विश्लेषण: संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत नित्यानंदचा देश सहभागी झाला? ‘युएस ऑफ कैलासा’ या देशाबद्दलची माहिती जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांसंदर्भात आरोग्यविषयक अडचण निर्माण झाल्यास एकही कायमस्वरूपी वन्यजीव पशु वैद्यकीय अधिकारी नाही. आता केवळ एकच अधिकारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. त्यामुळे ते कायम व्यग्र असतात. त्यांच्यानुसार कमलापूर हत्ती कॅम्प परिसर हत्तींसाठी स्वर्ग आहे. येथील नैसर्गिक पाणवठा आणि जंगल त्यांच्यासाठी पोषक आहे. परंतु मागील काही काळात येथील हत्तींना ‘हर्पिस’ आजाराची लागण होत आहे. यातील सर्वाधिक मृत्यूदेखील याच आजारामुळे झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि उपचाराची गरज आहे.