Errol Musk: in India: तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क १ जूनपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते दिल्लीत आले आणि शुक्रवारी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याची शक्यता आहे. भारतात असताना एरॉल मस्क अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. गुरूवारी ४ जून रोजी ते अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच व्यवसायाशी संबंधित अनेक बैठकांमध्येही ते सहभागी होतील. १ ते ६ जूनपर्यंत ते भारतात असणार आहेत. एरॉल मस्क यांच्याविषयी आणि त्यांच्या भारत दौऱ्याचे काय नियोजन आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
एरॉल मस्क भारतात का आले?
पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एरॉल मस्क यांचे भारतात आगमन झाल्यावर त्यांचे जोरदार स्वागत झाले. टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल यांचा हा दौरा व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल. ते सुमारे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असतील आणि त्यापैकी एका दिवशी ते अयोध्येलाही भेट देतील. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, एरॉल मस्क यांची ही भेट व्यावसायिक बैठकांशी, तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशांतर्गत ईव्ही चार्जिंग कंपनी ‘सर्वोटेक’च्या जागतिक सल्लागार मंडळात सामील झाल्यानंतर ते भारतात येत आहेत. त्यांचा हा भारत दौरा पाच दिवसांचा (१ जून ते ६ जूनपर्यंत) असेल आणि त्यानंतर ते आफ्रिकेला रवाना होतील.
ते हरियाणाच्या सफियााबाद येथील ‘सर्वोटेक’च्या सौर व ईव्ही चार्जर उत्पादन सुविधेला भेट देतील आणि वृक्षारोपण मोहिमेतही सहभागी होतील. या कार्यक्रमांना अनेक राज्यमंत्री आणि उच्च अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क यांच्या शाश्वतता आणि पर्यावरणाभोवतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या भेटीचा भाग म्हणून ‘सर्वोटेक’तर्फे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिननिमित्त् वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे.
“सर्वोटेक रिन्यूएबल कुटुंबात आम्ही एरॉल मस्क यांचे स्वागत करतो. स्मार्ट भविष्य घडविण्याच्या आमच्या मोहिमेला गती देण्यासाठी त्यांचा अफाट अनुभव, सखोल जागतिक अंतर्दृष्टी व नवीन उपक्रमासाठीची अढळ आवड या गोष्टी मौल्यवान ठरतील”, असे ‘सर्वोटेक’चे व्यवस्थापकीय संचालक रमन भाटिया यांनी म्हटले आहे.
एलॉन मस्क आणि एरॉल मस्क संबंध
या वर्षाच्या सुरुवातीला एका पॉडकास्ट कार्यक्रमात एरॉल मस्क यांनी त्यांचा मुलगा एलॉन मस्कवर उघडपणे टीका केली होती. एलॉन एक चांगला पिता आहे, असे त्यांना वाटते का, असे विचारले असता, एरॉल यांनी, नाही, असे उत्तर दिले आणि तो आयांवर खूप अवलंबून होता, असे म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, एलॉन आपल्या मुलांसोबत पुरेसा वेळ घालवत नव्हता.
दुसरीकडे एलॉन त्यांच्या खूप खडतर बालपणाबद्दल बोलले आहेत आणि त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी आर्थिक चणचणीत दिवस काढले आहेत. एरॉल यांनी त्यावर आक्षेप घेत, एलॉन रोल्स रॉइसमधून शाळेत गेला आणि मुले अगदी आरामात वाढल्याचे सांगितले.
एरॉल मस्क यांचा भूतकाळ
एलॉन हा एरॉल मस्क व मेय मस्क यांचा मुलगा आहे आणि त्यांना आणखी दोन मुले आहेत. एरॉलने सुपरमॉडेल असलेल्या मेय यांना फसवल्यानंतर १९७९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हे जोडपे नऊ वर्षे एकत्र होते.
मेय म्हणाल्या की, एरॉल त्यांचा लग्नादरम्यान भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या छळ करीत होते. सात मुले असलेल्या एरॉल यांनी नंतर १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला हायडे बेझुइडेनहॉटशी लग्न केले आणि त्यांना अलेक्झांड्रा व आशा रोज या दोन मुली होत्या. दोन वर्षांनी हे जोडपे वेगळे झाले. काही वर्षांनंतर एरॉल आणि सावत्र मुलगी जाना यांना दोन मुलं झाली
२०१८ मध्ये ‘द संडे टाइम्स’शी बोलताना एरॉलने या नात्याबद्दल सांगितले, “एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली. तुम्ही त्याला देवाची योजना किंवा निसर्गाची योजना म्हणू शकता”. त्यानंतर त्याच्या वडिलांशी पुन्हा संपर्क साधणारा एलॉन एकदा रोलिंग स्टोनला म्हणाला होता की, एरॉल एक भयानक माणूस आहे, ज्याने विचारपूर्वक वाईट योजना आखली होती.