संदीप नलावडे

पुढच्या ३० वर्षांत मंगळ ग्रहावर मानवी वस्ती झालेली असेल, असे भाकीत तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी गेल्याच महिन्यात वर्तविले होते. मस्क यांनी आता त्या दृष्टीने काम करण्यासही सुरुवात केली आहे. आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी मस्क यांनी ‘स्पेसएक्स’ या अंतराळ प्रक्षेपक कंपनीवर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळावर गेल्यानंतर काय करता येईल याचा आढावा सध्या मस्क घेत असून त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात येईल का, मस्क यांच्या कल्पनेबाबत त्यांनी काय प्रयत्न सुरू केले आहेत, यांविषयी…

इलॉन मस्क मंगळ मोहीम काय आहे?

मंगळ ग्रहाबाबत खगोलशास्त्रज्ञांना कायमच रस राहिला आहे. मंगळावर मानवी वस्तीसाठी अनुकूल वातावरण आहे काय याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र उद्योजक इलॉन मस्क यांनी मंगळ मोहिमेसाठी भलताच रस दाखविला आहे. पुढील ३० वर्षांत मंगळावर मानवी वस्ती असेल, असे भाकीत मस्क यांनी गेल्याच महिन्यात केले. मंगळावर मानवी वस्ती झाल्यास तिथे सुनियोजित शहर वसविण्यासाठी मस्क यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. “पुढच्या पाच वर्षांत मानवरहित यान मंगळ ग्रहावर पाठविले जाईल. त्यानंतर १० वर्षांपर्यंत मानव मंगळावर पाऊल ठेवले. पुढच्या २० ते ३० वर्षांत मंगळावर मानवी वस्ती झालेली असेल,” असे मस्क यांनी सांगितले. मंगळ मोहिमेसाठी मस्क यांनी ‘स्पेसएक्स’ या आपल्या कंपनीवर लक्ष केंद्रित केले आहे. २००२ साली स्पेसएक्सची स्थापना केली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मानवांना घेऊन जाणारी ती पहिली खासगी कंपनी आहे. ही कंपनी सध्या ‘स्टारशिप’ बनविण्याच्या कामात गुंतली आहे. हे स्टारशिप जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक असणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. यामार्फतच पुढील दहा वर्षांत मानव मंगळावर पोहोचला असेल, असा ठाम दावा मस्क यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>धूम्रपान न करणार्‍यांनाही होतोय कॅन्सर, संशोधनात धक्कादायक माहिती उघड; काय आहेत कारणं?

मंगळ मोहिमेसाठी काय प्रयत्न?

दोन दशकांहून अधिक काळ इलॉन मस्क यांनी मंगळावर पोहोचण्याच्या त्यांच्या आजीवन ध्येयासाठी ‘स्पेसएक्स’ या त्यांच्या कंपनीवर लक्ष केंद्रित केले आहे. मस्क यांनी नुकतेच स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांना मंगळावरील शहराची रचना आणि तपशील यांवर संशोधन करण्याचे आणि त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकी वृत्तसमूहाने नुकतीच याबाबत माहिती मिळवली आहे. स्पेसएक्स कर्मचाऱ्यांचा एक समूह मंगळावर लहान घुमट निवासस्थानांसाठी योजना आखत आहे. ज्यामध्ये ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचा समावेश आहे. दुसरा समूह मंगळाच्या प्रतिकूल वातावरणाचा सामना करण्यासाठी स्पेससूटवर काम करत आहे. याच कंपनीचे एक वैद्यकीय पथक मंगळावर मानवाला अपत्य होऊ शकते का यावर संशोधन करत आहे. कृत्रिम बीजधारणा करण्यासाठी मस्क यांनी त्यांचे शुक्राणू स्वच्छेने दिले आहेत, अशी माहिती याच कंपनीच्या काही जणांनी ‘द न्यूयाॅर्क टाइम्स’ला दिली आहे. मंगळ ग्रहावर वृक्ष लागवड करण्यासाठी मस्क आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे.

मस्क यांच्या इतर कंपन्यांचे योगदान काय?

मंगळावर मानवी वसाहत तयार करण्याच्या कल्पनेने मस्क यांना इतके झपाटले आहे की, त्यांच्या इतर कंपन्यांनाही त्यांनी याच कामासाठी लावले आहे. मस्क यांनी खोदकाम करणारी ‘बोरिंग कंपनी’ची स्थापना केली आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर खोदकाम करण्यासाठी आणि राहण्यायोग्य जमीन बनवण्यासाठी ही कंपनी उपकरणे तयार करत आहे. मस्क यांनी काही वर्षांपूर्वी ‘एक्स’ हे समाजमाध्यम विकत घेतले. त्याचे कारण म्हणजे मंगळावर एकमताने नियम करणारे नागरिकांच्या नेतृत्वाखाली सरकार कसे कार्य करू शकते हे तपासण्यास हे समाजमाध्यम मदत करू शकते, असे मस्क यांनीच सांगितले होते. या ग्रहावरील रहिवासी त्यांच्याच ‘टेस्ला’ या विद्युत वाहन कंपनीने बनवलेले स्टील-पॅनेल सायबर वाहन चालवतील, अशी त्यांची कल्पना आहे. मस्क यांची संपत्ती जवळपास २७० अब्ज डॉलर आहे. मस्क यांनीच सांगितले होते की केवळ आपल्या मंगळ मोहिमेला निधी पुरवण्यासाठीच ते पैसे कमावत आहेत. 

हेही वाचा >>>Kalki 2898 AD हिंदू धर्मासारखेच ‘या’ देशांनाही आहेत ‘चिरंजीव’ वंदनीय; निमित्त ‘कल्की’चे… काय आहे चिरंजीव ही संकल्पना?

मस्क यांची खुळचट कल्पना?

मस्क यांचा उपक्रम केवळ बाल्यावस्थेत असून मंगळावरील मानवी जीवनासाठी अधिक ठोस नियोजन मस्क यांच्याकडे नाही. मंगळ मोहिमेसाठीचा मस्क यांनी आखलेला कार्यकाळही चुकीचा आणि घाईचा आहे. मस्क यांनी २०१६ मध्ये सांगितले होते की मंगळ ग्रहावर मानवी वस्ती करण्यासाठी ४० ते १०० वर्षे लागतील. मात्र आपल्या या विधानात मस्क यांनी बदल केला असून १० वर्षांतच मानव मंगळावर पोहोचला असेल, असे मस्क यांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये मस्क यांनी स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांची अपेक्षा आहे की २० वर्षांत दहा लाख लोक मंगळावर राहतील, अशी त्यांची योजना आहे.  मस्क यांनी मंगळावर मानवी वसाहतीच्या स्वप्नवत कल्पना मांडल्या आहेत. मात्र त्यासाठीचा संशोधनात्मक अभ्यास आणि नियोजन यांचा अभाव असल्याचे दिसून येते. मस्क यांनी यापूर्वी अनेक आव्हाने स्वीकारली असून अनेक कठीण शक्यतांवर मात करण्यात यश मिळवले आहे. मात्र मंगळावरील मानवी संस्कृतीविषयी त्यांची दृष्टी त्यांच्या वरवरच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेला अत्यंत टोकापर्यंत घेऊन जाते, असे काही संशोधकांनी सांगितले. नासानेही सध्या मंगळावर मानव उतरण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले. कारण ओसाड प्रदेश, अति शीत तापमान, धुळीचे वादळ आणि श्वास घेण्यास अशक्य हवा यांमुळे ते शक्य नसल्याचे नासाने सांगितले.

मस्क यांना मंगळाचे आकर्षण का?

आयझॅक असिमोव्हची १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘फाऊंडेशन’ ही अंतराळ विज्ञानावर आधारित कादंबरी वाचून मस्क यांना मंगळ ग्रहाबद्दल आकर्षण वाटू लागले आहे. या कादंबरीत आंतरतारकीय साम्राज्याच्या पतनापासून मानवतेला वाचवण्यासाठी नायक आकाशगंगेच्या पलीकडे एक वसाहत तयार करतो, असा विषय आहे. ही कादंबरी काल्पनिक असली तरी मस्क यांना ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी मंगळ मोहीम आखली आहे. मानवी जीवन बहुग्रहीय बनवण्याची उच्च निकड आहे, असे मस्क एका मुलाखतीत म्हणाले होते. मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याच्या कल्पनेशी मस्क एवढे जोडले गेले आहेत की एकदा त्यांनी मंगळावरच मृत्यू यावा, अशी योजना आखत असल्याचे सांगितले होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sandeep.nalawade@expressindia.com