Elon Musks Third-Party Intervention In US Politics : अमेरिकेतील धनाढ्य उद्योगपती एलॉन मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत त्यांनी रविवारी या संदर्भातील माहिती दिली. एलॉन मस्क यांनी आपल्या पक्षाचं नाव ‘अमेरिका पार्टी’ असं ठेवलं आहे. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. दरम्यान, एलॉन मस्क यांच्या राजकीय पक्षामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना किती फटका बसणार? अमेरिका पार्टीच्या स्थापनेमुळे देशातील राजकीय समीकरणं कशी बदलणार? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
रविवारी आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये एलॉन मस्क म्हणाले, “अमेरिकेतील सध्याच्या दोन राजकीय पक्षांवर (रिपब्लिकन-डेमोक्रॅटिक) देशातील लोक समाधानी नाहीत. आम्ही स्थापन केलेल्या नवीन पार्टीच्या पाठीमागे जवळपास ८० टक्के मतदार आहेत.” आगामी निवडणुकीत ‘अमेरिका पार्टी’चा मोठा राजकीय प्रभाव दिसून येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान?
एलॉन मस्क यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे अमेरिकेच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी असलेले मतदार हे एलॉन मस्क यांच्या पार्टीला समर्थन देऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. एलॉन मस्क हे प्रसिद्ध उद्योजक असल्यामुळे त्यांना अमेरिकेत मोठी लोकप्रियता आहे. विशेषतः तंत्रज्ञानप्रेमी, लिबर्टेरियन विचारसरणीचे आणि सध्याच्या सत्ताधारी यंत्रणेला विरोध करणाऱ्या मतदारांनी मस्क यांच्या पार्टीला आतापासूनच पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : एलॉन मस्क यांच्या पार्टीचे कोषाध्यक्ष वैभव तनेजा कोण आहेत? त्यांचा भारताशी काय संबंध?
मस्क यांच्या पार्टीला समर्थन देणाऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची संख्याही मोठी असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेतील पारंपरिक राजकारणाविषयी असलेली नाराजी, सरकारच्या हस्तक्षेपावरील रोष आणि झपाट्याने बदल घडवण्याची इच्छा या मुद्द्यांवरून अनेक जण ट्रम्प यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. जर एलॉन मस्क यांची अमेरिका पार्टी या मतदारांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी ठरली आणि महत्त्वांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा मोठा फटका ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला बसू शकतो, असं भाकीत वर्तवलं जात आहे.
अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय अनेकांना रुचलेले नाही.
- त्यांच्या नवीन धोरणांमुळे रिपब्लिकन पार्टीतील मतदार नाराज असल्याची चर्चा आहे.
- जर हे मतदार आगामी निवडणुकीत अमेरिका पार्टीबरोबर उभे राहिले तर मतांमध्ये होणारी तफावत निर्णायक ठरू शकते.
- डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळण्यापासून रोखलं जाऊ शकतं, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.
- एलॉन मस्क यांच्या नवीन पक्षामुळे अमेरिकेतील डाव्या विचारसरणीचे मतदार विभाजित होण्याची शक्यता आहे.
- त्याचबरोबर उजव्या किंवा पॉप्युलिस्ट मतांचीही फाटाफूट होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे.
- यापूर्वी अमेरिकेत रिपब्लिकन-डेमोक्रॅटिक हे दोनच पक्ष असल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला मोठा विजय मिळत होता.
- अमेरिकेतील मतदार विभाजित झाल्याने कोणत्याही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवणे अधिक अवघड ठरू शकते.
मस्क यांच्या पक्षामुळे ट्रम्प यांचा अप्रत्यक्ष फायदा होणार?
एलॉन मस्क यांच्या नव्या पक्षामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय समीकरण बिघडू शकते, असा अंदाज व्यक्त होत असतानाच काही विश्लेषकांचा असा दावा आहे की, यामुळे ट्रम्प यांना काही प्रमाणात अप्रत्यक्ष फायदाही होऊ शकतो. जर मस्क यांच्या पक्षाला मोठी लोकप्रियता मिळाली, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदारही त्यांच्याकडे वळू शकतात. ट्रम्प यांना कधीच मतदान न करणारे मतदार जर मस्क यांच्या पार्टीकडे वळाले तर डेमॉक्रॅटिक पार्टीच्या मतांमध्ये विभाजन होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. एलॉन मस्क यांनी माघार घेतल्यास ट्रम्प हे त्यांना आपल्या राजकीय फायद्यासाठी माफही करू शकतात, असं काहींचं म्हणणं आहे.
एलॉन मस्क यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं?
एलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांच्यासमोर अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्था, राज्य-वार बॅलेट सिस्टम, नोंदणी प्रक्रिया, निधीची जुळवाजुळव आणि मतदारांचा पाठिंबा यासारखी आव्हानं आहेत. जाणकारांना असं वाटतं की, मस्क यांच्याकडे संसाधनं तर आहेत, मात्र राजकीय धैर्य आणि प्रत्यक्षातील संघटनेचा अभाव ही त्यांच्यासमोरील मोठी अडचण ठरू शकते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी हे दाखवलं आहे की, ते त्यांच्याकडील संसधानांचा वापर मोठे निर्णय घेण्यासाठी करू शकतात. मात्र, ते अनेकदा बोललेल्या गोष्टी पूर्ण करत नाहीत, असंदेखील भूतकाळात अनेकदा दिसून आलं आहे.

यापूर्वी मस्क यांनी जेव्हा ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी’चं नेतृत्व केलं होतं, तेव्हा त्यांनी अनेक सरकारी योजना आणि अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कपात केली होती. मात्र, नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेतील धोरणांशी निगडीत मोठ्या विधेयकावर टीका केली होती. गेल्या महिन्यात मस्क यांनी सोशल मीडियावर या कायद्याला ‘घृणास्पद आणि भीतीदायक’ म्हटलं होतं. या कायद्यामुळे अमेरिकेच्या आधीच वाढलेल्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आणखी भर पडेल, असं त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता धोक्यात? उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५३८ जागांसाठी मतदान होते. अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या ४३८ जागा अधिक अमेरिकी सेनेटच्या १०० जागा यांचे मिळून ५३८ मतदारसंघ असतात. २७० जागा मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. या निवडणुकीत दोन प्रकारची मते असतात – प्रत्यक्ष मते (पॉप्युलर वोट्स) आणि प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल वोट्स). इलेक्टोरल कॉलेज किंवा प्रतिनिधीवृंद हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. दोन्ही पक्ष प्रत्येक राज्यात आपले प्रतिनिधी (इलेक्टर) नेमतात. मतदार अध्यक्षीय उमेदवारांना थेट मत न देता संबंधित प्रतिनिधींना देतात. कॅलिफोर्निया राज्यात सर्वाधिक ५४ प्रातिनिधिक मते किंवा इलेक्टोरल वोट्स आहेत. त्याखालोखाल टेक्सास (४०), फ्लोरिडा (३०), न्यूयॉर्क (२८), पेनसिल्वेनिया आणि इलिनॉय (प्रत्येकी १९), ओहायो (१७), जॉर्जिया व नॉर्थ कॅरोलिना (प्रत्येकी १६) असे क्रमांक लागतात.
राजधानी वॉशिंग्टनमध्ये (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) तीन इलेक्टोरल वोट्स आहेत. त्याचप्रमाणे नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, अलास्का, डेलावेर, वेरमॉन्त या राज्यांमध्येही प्रत्येकी तीन इलेक्टोरल मते आहेत. त्या दृष्टीने ही राज्ये निवडणूकदृष्ट्या सर्वांत छोटी ठरतात. अमेरिकेतील ४८ राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये इलेक्टोरल वोट्सचा विचार होतो. पण, नेब्रास्का आणि मेन ही दोन राज्ये यास अपवाद आहेत. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्यक्ष मते अधिक मिळवणाऱ्या उमेदवारास त्या जिल्ह्याचे प्रातिनिधिक मत मिळते. सध्या अमेरिकेत रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक हे दोनच पक्ष आहेत, त्यात आता मस्क यांच्या नवीन अमेरिका पार्टीची भर पडल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणातील कोणती समीकरणं बदलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.