राखी चव्हाण
विदर्भ आणि पाऊस याचे समीकरण अजूनही अनेकांना उलगडलेले नाही. कारण गेल्या काही वर्षांत पावसाचा ‘पॅटर्न’ बदलला आहे. बारमाही पण अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाची वैदर्भियांना सवय झाली असतानाच सुमारे दोन दशकांनंतर पहिल्यांदा पाऊस विदर्भात मूळ रूपात परतल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक पाऊस पडणारा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदेश म्हणजे विदर्भ. इतक्या व्यापक भूभागावर अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाने विदर्भ पूरमय झाला आहे. त्यामागे काय कारणे असावीत?

सार्वत्रिक, मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि मोसमी पावसाचा संबंध काय?

विदर्भात मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले, पण आता तो मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला. गेल्या आठ-दहा दिवसांत तो अधिकच तीव्र झाला आहे. वैज्ञानिक भाषेत या सक्रिय झालेल्या मोसमी पावसाला ‘हेल्दी मान्सून’ असेही म्हणतात. अलीकडच्या काही वर्षात याच मोसमी पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली होती. तो मूळ रूपात आल्यामुळे आणि संपूर्ण विदर्भ व्यापल्याने सार्वत्रिक आणि मोठ्या प्रमाणावर विदर्भात पाऊस दिसून येत आहे.

विदर्भातील सर्वाधिक पावसाचे जिल्हे कोणते?

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे विदर्भातील सर्वाधिक पावसाचे जिल्हे आहेत. गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत ६०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. १८९१ साली विदर्भात सर्वाधिक पाऊस आणि गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठी पूरस्थिती होती.  त्यानंतर १९१३, १९५९ आणि १९८६मध्येही मोठा पाऊस आणि पुरस्थिती या जिल्ह्यांमध्ये होती.  त्यानंतर आता मोठा पाऊस आणि पूर दिसून येत आहे.

विदर्भातील पावसाची सरासरी किती?

विदर्भातील पावसाची सरासरी ही साधारण १४०० मिलीमीटर इतकी अपेक्षित आहे. तरी साधारण तो ११०० मिलीमीटर होताना दिसून येतो. यावर्षी तो १५ दिवसांतच ५०० ते ६०० मिलीमीटर कोसळला आहे. जून महिन्यात याच विदर्भात पावसाने सरासरीदेखील ओलांडली नव्हती.

पाऊस आणि तापमानाचा संबंध काय?

पृथ्वीच्या पहिल्या आवरणातील सर्वांत वरच्या भागाचे तापमान गेल्या काही वर्षांत वाढत आहे. यावर्षी वाढलेल्या उष्णतेच्या लाटा हा त्याचाच परिणाम आहे. गेल्या शंभर वर्षांत इतक्या उष्णतेच्या लाटा नव्हत्या, जेवढ्या या वर्षी विदर्भात आल्या आहेत. पृथ्वीच्या आवरणाचे वाढलेले तापमान आणि उष्णतेच्या लाटा या दोन्हीचा परिणामामुळे कमी दाबाचे पट्टे मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. त्यामुळे येत्या काळात पावसाचे प्रमाण वाढणार हे निश्चित आहे. यावेळी अरबी समुद्रावरून सातत्याने बाष्पयुक्त वारे येत आहेत. पावसासाठी हे वारे देखील कारणीभूत ठरत आहे.

जगातील इतर देशांपेक्षा भारतातील मोसमी पाऊस वेगळा कसा?

जगातील इतर देशांपेक्षा भारतातील मोसमी पाऊस निश्चितच वेगळा आहे. इतर देशातही मोसमी पाऊस पडतो, पण यातील काही देशांमध्ये तो वर्षभर असतो. या मोसमी पावसाला खरी ओळख भारतात मिळाली आहे. कारण पावसाळ्याचे तीन महिने तो कोसळतो. त्याच्या हवेची दिशाही वेगळी आहे. १८० अंशात भारतात मोसमी पावसातील हवेची दिशा परतताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rakhi.chavhan@expressindia.com