explained how bjp candidate can become mayor in delhi mcd despite aap win spb 94 | Loksatta

विश्लेषण : दिल्ली महापालिकेत ‘आप’ची सत्ता, तरीही भाजपाचा महापौर होणार? कशी आहेत समीकरणं? जाणून घ्या

दिल्ली महापालिकेत महापौरपदाची समीकरणं नेमकी कशी आहेत? सविस्तर जाणून घ्या.

विश्लेषण : दिल्ली महापालिकेत ‘आप’ची सत्ता, तरीही भाजपाचा महापौर होणार? कशी आहेत समीकरणं? जाणून घ्या
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

आम आदमी पक्षाने १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दिल्ली महापालिका ताब्यात घेतली. आपने २५० प्रभागांपैकी १३४ प्रभाग जिंकून बहुमताचा आकडा पार केला, तर भाजपाने १०४ प्रभागांमध्ये विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ ९ प्रभागांमध्येच विजय मिळवता आला. दरम्यान, आपने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असला, तरी निकालानंतर भाजपाने ‘महापौरपदाची निवडणूक आणखी बाकी आहे’, असे म्हणत एकप्रकारे आपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी चंदीगडमध्येही आपला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना भाजपाचा महापौर निवडून आला होता. त्यामुळे दिल्ली महापालिकेत महापौरपदाची समीकरणं नेमकी कशी असेल? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : सुपर हिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा ‘मॅजिकल टच’ कसा ठरतो यशाचा हिट फॉर्म्युला?

भाजपाचे ‘आप’ला आव्हान?

दिल्ली महापालिकेच्या निकालानंतर भाजपाने महापौरपदाची निवडणूक आणखी बाकी आहे, असे म्हणत एकप्रकारे ‘आप’ला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाचे आयटीसेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करत, “दिल्लीतील जनतेने भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि केजरीवालांच्या ‘भ्रष्ट’ मंत्र्यांच्या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक मते दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो”, असेही म्हटले होते.

पुढे बोलताना त्यांनी “दिल्लीतील महापौरपदाची निवडणूक बाकी असून या लढतीत संख्याबळ कोणाकडे आहे, नगरसेवक नेमके कोणाला मतदान करतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं म्हणत आपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी यावेळी चंडीगडमध्येही आपचे सर्वाधिक उमेदवार असून महापौर भाजपाचा आहे, अशी आठवणही करून दिली होती. याचबरोबर दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तजेंदरपाल सिंह बग्गा यांनीही दिल्लीत पुन्हा भाजपाचा महापौर होईल”, असे म्हटले होते.

हेही वाचा – विश्लेषण: आर्थिक आरक्षणाच्या फेरविचाराची मागणी का होतेय?

दिल्लीच्या महापौरांची निवड कशी केली जातो?

दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७ अंतर्गत १९५८मध्ये दिल्ली महापालिकेची स्थापना करण्यात आली. २०१२ मध्ये ही महापालिका तीन भागांमध्ये विभागण्यात आली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून हे तिन्ही भाग एकत्र करण्यात आले. दिल्ली महानगरपालिकेचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७च्या नियम ३५ नुसार प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या बैठकीत महापौरांची नियुक्ती केली जाते. नियमानुसार बहूमत असणाऱ्या पक्षाकडून महापौरपदासाठी दावा केला जातो. तसेच विरोधी पक्षाने उमेदवार दिल्यास महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते.

महत्त्वाचे म्हणजे महापौर पदाचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. नियमानुसार पहिल्या वर्षी महापौरपदासाठी महिला उमेदवाराची निवड केली जाते, तर तिसऱ्या वर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराची निवड केली जाते.

दिल्ली महापौर पदासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबच दिल्लीतील १४ आमदार, १० लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडूनही मतदान करण्यात येते. मात्र, यानिवडणुकीत नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाहीत. जर या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना सारखी मतं मिळाल्यास सोडचिठ्ठीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येते.

हेही वाचा – विश्लेषण : ‘मंदौस’ चक्रीवादळ धडकणार; जाणून घ्या, कुठे आणि काय होणार परिणाम?

कशी आहेत दिल्लीतील समीकरणं?

भाजपाचे लोकसभेत सात खासदार आहेत. तर ‘आप’चे राज्यसभेत तीन खासदार आहेत. भाजपाचे सात खासदार आणि निवडून आलेले नगरसेवक मिळून त्यांची संख्या १११ पर्यंत पोहोचते. तर ‘आप’कडे तीन खासदार, निवडून आलेले नगरसेवक आणि १४ आमदार मिळून ही संख्या १५१ पर्यंत पोहोचते. दरम्यान, ‘आप’कडे बहूमत असतानाही भाजपाने आमचाच महापौर होईल, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. कोणताही पक्ष आपल्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी करू शकत नाही. त्यामुळे महापौरपदासाठी ‘क्रॉस-वोटिंग’ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – विश्लेषण: कैद्यांच्या देवाणघेवाणीत रशियाच्या तावडीतून अमेरिकन बास्केटबॉल पटूची मुक्तता! ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे? जाणून घ्या

चंदीगडमध्ये आपचा विजय, तरीही भाजपाचा महापौर

या वर्षाच्या सुरुवातीला चंदीगडमध्येही महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत ‘आप’ने ३६ पैकी १४ प्रभागांमध्ये विजय मिळवला. तर भाजपाला १२, काँग्रेसला ८ आणि शिरोमणी अकाली दलला एका प्रभागात विजय मिळवता आला. मात्र, बहूमत असतानाही आपला आपला महापौर निवडून आणता आला नाही. मतदानाच्या दिवशी ८ पैकी ७ काँग्रेस आमदार गैरहजर होते. तर एकाने भाजपात प्रवेश केला. शिरोमणी अकाली दलाच्या एका नगरसेवकानेदेखील भाजपाच्या उमेदवाराला मत दिले. त्यानंतर उपस्थित २८ नगरसेवकांपैकी आप आणि भाजपाकडे १४-१४ अशी संख्या होती. मात्र, ‘आप’चे एक मत बाद झाल्याने भाजपाचा महापौर निवडून आला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 15:00 IST
Next Story
विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?