दिल्ली क्राइम या प्रसिद्ध वेबसीरिजचा दूसरा सीझन नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिरिजचा पहिला सीझन निर्भया हत्याकांडावर बेतलेला होता. या पहिल्या सीझनचं चांगलंच कौतुक झालं, देशविदेशात या सीरिजला पुरस्कार मिळाले. आता याच्या नवीन सीझनमधून अशाच एका भयानक केसची आठवण करून दिली जाणार आहे. ती गाजलेली केस म्हणजे ‘चड्डी बनियन गॅंग’ केस. देशाच्या वेगवेगळ्या भागात या गॅंगने दहशत पसरवली होती. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांत ही गॅंग जास्त सक्रिय होती.

कोण होती ही ‘चड्डी बनियन गॅंग’?

या गॅंगनी आजवर १०० हुन अधिक घरफोडी, दरोडे, आणि खून असे गंभीर गुन्हे केले आहेत. १९९० मध्ये ही गॅंग सर्वात जास्त सक्रिय होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही गॅंग अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यासाठी ओळखली जायची. माणसांना फार भयानक पद्धतीने मारून त्यांच्या घरातले सगळे दागदागिने, रोकड पैसा ते घेऊन जात असे. जातानासुद्धा ते घराची नासधुस करत असत. तिथेच खाऊन ते घाण करून जात असत. २०१६ मध्ये त्यांची ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचं म्हंटलं जातं. कारण त्यांनी तेव्हा हायवेवरुन जाणाऱ्या एका कुटुंबाला मारलं आणि त्यातल्या काही महिलांवर बलात्कारदेखील केला होता. या गॅंगच्या काही सदस्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. पण असं म्हंटलं जातं की या गॅंगशी निगडीत काही लोकं अजूनही सक्रिय आहेत, इतकंच नाही त्यांची ही पद्धत कॉपी करणाऱ्या इतर टोळ्यांचाही सध्या बराच सुळसुळाट झाला आहे.

आणखी वाचा : “चित्रपट पूर्ण करण्याच्या नादात आजारपण…” ‘केजीएफ’ फेम कॅन्सरग्रस्त अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

ही गॅंग कशापद्धतीने काम करायची?

ही गॅंग चक्क त्यांची अंतरवस्त्र घालून गुन्हे करत होती म्हणूनच त्यांना ‘चड्डी बनियन गॅंग’ हे नाव पडलं होतं. इतकंच नाही तर त्याआधी ते स्वतःच्या शरीराला तेल लावत असत जेणेकरून त्यांना पकडायचा प्रयत्न कुणी केला तर त्यांना निसटता येईल. शिवाय ते स्वतःचा चेहेरा पूर्णपणे झाकून घेत असल्याने त्यांची ओळख पटणं पोलिसांसाठी तसं कठीणच होतं. नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एक गोष्ट समोर आली की या गॅंगमधले काही लोकं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी पाड्यातले आहेत. आणि यापैकी कित्येकांच्या नावावर याआधी गुन्हे दाखल झाले आहेत.

आणखी वाचा : “प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, ही गंभीर समस्या आहे.” सुनील शेट्टीचं बॉयकॉट ट्रेंडवरील वक्तव्य व्हायरल

‘चड्डी बनियन गॅंग’ ही नेहमी ४ ते ५ लोकांच्या घोळक्यात काम करायची. घरात चोरी करताना ते घरातल्या सदस्यांना बांधून ठेवायचे आणि कुणी पळायचा किंवा मदत मागायचा प्रयत्न केला तर त्याला थेट मारून टाकायचे. बंदूक, कुऱ्हाड, हातोडा, सळ्या अशा अनेक हत्यारांचा ते वापर करायचे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली क्राइम या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात जरी या गॅंगचा उल्लेख असला. तरी ही सीरिज या मुख्य गॅंगच्या गुन्ह्यावर बेतलेली नाही. या सीरिजमध्ये ‘चड्डी बनियन गॅंग’च्या हुबेहूब पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गॅंगची आणि त्यांना पकडणाऱ्या दिल्ली पोलिसांची गोष्ट दाखवली गेली आहे.