एकीकडे करोना विषाणूच्या उद्रेकामुळे बसलेल्या तडाख्यातून जग सावरत असतांना आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असतांना आता आणखी एका विषाणूचे संकट समोर उभं ठाकलं आहे. तुलनाच करायची झाली तर मराठवाडा एवढे क्षेत्रफळ असलेल्या आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या Equatorial Guinea या छोट्या देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे. Marburg नावाचा विषाणूच्या उद्रेकामुळे या देशात करोना उद्रेकानंतर पुन्हा एकदा बहुतांश भागात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत या विषाणूमुळे ९ जणांचा बळी घेतला असून तातडीच्या उपाययोजना या देशात अंमलात आणल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.आत्तापर्यंत एकूण १६ जण हे Marburg या विषाणूमुळे बाधीत झाले असून रुग्णांचे नमूने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठण्यात आले असून संबंधित विषाणूबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Marburg विषाणू काय आहे?
करोना विषाणूच्या उद्रेकानंतर ज्या Ebola विषाणूचे नाव आफ्रिकेतून ऐकायला मिळत होते त्याच Ebola च्या कुळातील हा Marburg विषाणू आहे. यामध्ये रक्तस्रावी ताप म्हणजेच ताप येत अंतर्गत रक्तस्त्राव होतो. यामुळे रुग्ण दगावल्याचे प्रमाण जास्त असते.
लक्षणे
या विषाणूमुळे वेगाने ताप येत मोठ्या प्रमाणात डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत, अस्वस्थ वाटण्याच्या त्रासाला सुरुवात होते. हा विषाणू शरीरातील विविध अवयवांना लक्ष्य करत असल्याने एक एक अवयव निकामी होतात आणि त्यामुळे विषाणूची लागण झालेल्यांमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.
विषाणूचा प्रसार कसा होतो?
वटवाघळापासून या विषाणूचा प्राथमिक संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. माणसामध्ये लागण झाल्यावर शरीरातील द्रव, रक्त किंवा अगदी दूषित चादरीच्या पृष्ठभागाच्या माध्यमातून Marburg विषाणूचा संसर्ग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
लस उपलब्ध आहे का?
सध्या Marburg विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. पण या विषाणू्च्या प्रादुर्भवामुळे जी लक्षणे बाधितांमध्ये दिसतात त्यांवर आधारीत उपचार केले जात आहेत.
Marburg या विषाणूशी साधर्म्य दाखवणाऱ्या विषाणूची नोंद ही १९६७ ला पहिल्यांदा करण्यात आली होती. त्यानंतर या विषाणूचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी अँगोला आणि त्यांनतर घाना या देशांमध्ये Marburg बाधित रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली होती.