scorecardresearch

विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

सुप्रसिद्ध गिझा पिरॅमिडच्या आत अलीकडेच एक भुयार सापडले, हे भुयार व त्याला धारण करणारा पिरॅमिड प्राचीन भारतीय संस्कृतीशी समकालीन आहेत. पण मग या प्राचीन संस्कृतींमध्ये काही आदानप्रदान होत होते का? आणि त्याचे पुरावे आपल्याला सापडतात का?

Giza pyramid, Egypt
गिझाचा पिरॅमिड आणि प्राचीन सिंधू संस्कृती (Photo : Loksatta graphic team)

सुप्रसिद्ध गिझा पिरॅमिडच्या आत काही दिवसांपूर्वीच नव्याने उघडकीस आलेल्या बंद भुयारामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. या भुयाराच्या निर्मितीचा काळ हा साधारण ४५०० वर्षे इतका मागे जातो. म्हणजेच भारतीय सिंधू संस्कृतीशी हे भुयार व त्याला धारण करणारा पिरॅमिड समकालीन आहेत. इजिप्त आणि भारत या दोन्ही संस्कृती प्राचीन असल्याचे पुरावेही उपलब्ध आहे. पण मग या प्राचीन संस्कृतींमध्ये काही आदानप्रदान होत होते का? आणि त्याचे पुरावे आपल्याला आजही २१ व्या शतकात सापडतात का? हे पुरावे नेमके कोणते आहेत? आणि त्यातून कोणते निष्कर्ष काढता येतात? या प्रश्नांचा घेतलेला हा शोध!

आणखी वाचा : इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो धाराशिवचा पुरातत्त्वीय …

इजिप्तच्या पिरॅमिड्स मध्ये सापडलेल्या भुयाराचे महत्त्व काय?

गिझाच्या पिरॅमिड्स मध्ये सापडलेले हे भुयार ३० फूट लांब व ६ फूट रुंद आहे. सापडलेले भुयार पिरॅमिडच्या दरवाजावर असून ते अपूर्ण अवस्थेत आहे. या भुयाराच्या निर्मितीमागे नेमका कोणता उद्देश होता, हे अद्याप उघडकीस आलेले नाही. कदाचित पिरॅमिडचा भार विभागण्यासाठी या भुयाराची निर्मिती झाली असावी, असे गृहीतक इजिप्त येथील पुरातत्त्वज्ञानी मांडलेले आहे. यापूर्वी ‘खुफु’च्या पिरॅमिडमध्ये अशाच स्वरुपाची भुयारे २०१७ साली उघडकीस आली होती. पिरॅमिडच्या निर्मिताचा विचार करता स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून या सारख्या बंद भुयारांचा नेमका उद्देश काय असू शकेल याचा शोध पुरातत्त्वज्ञ घेत आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता

इजिप्तप्रमाणे भारतीय संस्कृतीही प्राचीन आहे, तर मग या दोन्ही संस्कृतींमध्ये आदानप्रदान झाल्याचे पुरावे सापडतात का?

इजिप्त असे म्हटले की, जगभरात सर्वांच्याच नजरेसमोर येतात ते पिरॅमिडस्; हाच इजिप्तचा जगासाठीचा सर्वात मोठा परिचय आहे. सध्या या देशात ८० हून अधिक पिरॅमिड आहेत. आपल्या भव्यतेमुळे हे पिरॅमिड जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. असे असले तरी हा देश आणखी एका कारणासाठी ओळखला जातो, ते कारण म्हणजे जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक महत्त्वाचे ठिकाण. सिंधुसंस्कृती, चीन, मेसोपोटेमिया व इजिप्त अशा चार संस्कृतींचा समावेश जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींमध्ये होतो. या चारही संस्कृतींमध्ये परस्पर व्यापारी व सांस्कृतिक देवाण घेवाण असल्याचे पुरावे पुरातत्त्वीय सर्वेक्षणातून सिद्ध झालेले आहे. म्हणूनच नव्या शोधाच्या पार्श्वभूमीवर भारत व इजिप्त यांच्यात गेल्या चार हजार वर्षांपासूनचा असलेला अनुबंध समजावून घेणे हे आपल्या समृद्ध इतिहासाची जपणूक करण्यासारखेच आहे.

आणखी वाचा : international womens day 2023 : जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

पिरॅमिडस नेमके कशासाठी बांधण्यात आले?

पिरॅमिड हा मूळ ग्रीक शब्द पिरॅमिस या शब्दावरून रूढ झालेला आहे. पिरॅमिस म्हणजे गुळाचा केक. पिरॅमिडचा आकार हा त्रिकोणी केकप्रमाणे असल्याने ग्रीकांचे राज्य या भागावर असताना अशा स्वरूपाच्या वास्तूंना पिरॅमिड म्हटले गेले. स्थानिक भागात पिरॅमिड हे मेर म्हणून ओळखले जातात. या वास्तूंचा फॅरोच्या दफनाशी संबंध आहे. मृत्यूनंतर सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्ती ही राजघराण्यातील असल्याने त्या व्यक्तीचा सन्मान भव्य दफनांच्या माध्यमातून करण्यात येत असे. यामागे मृत्युनंतरचे जग ही संकल्पना होती. मृत्युनंतरच्या प्रवासासाठी दफनांमध्ये मृतव्यक्तीच्या आवडत्या वस्तूही ठेवल्या जात होत्या.

आणखी वाचा : International Women’s day 2023: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’

पिरॅमिड, त्या मागची संकल्पना आणि भारतीय संस्कृती यांचा काही संबंध आहे का? त्याचे पुरावे आहेत का?

मृत्यूशी संबंधित संकल्पना या इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणेच तत्कालीन प्राचीन भारतातही होत्या. भारतीय संस्कृतीत थूप, स्तूप, महाश्मयुगीन दफने, महाश्मयुगीम स्मारके यांच्या माध्यमातून त्यांचे पुरावे आपल्याकडेही सापडतात. साधारणपणे एकाच प्रकारच्या संकल्पना जगभरात एकाच वेळेस किमान दोन ठिकाणी अस्तित्त्वात असतात, असे आजवर संशोधकांना लक्षात आले आहे. पिरॅमिडच्या बाबत विशेष म्हणजे तत्कालीन फॅरोनी ममींच्या संरक्षणासाठी भारतीय तेलांचा व सुती कापडाचा वापर केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय सुती कापड हे तत्कालीन जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती आणि त्यावेळेस ती केवळ श्रीमंतांनाच परवडत असे. भारतीय सुती वस्रांमध्ये मृतदेह गुंडाळला जाणे ही भाग्याची गोष्ट मानली जात होती आणि ती केवळ राजेमहाराजांनाच उपलब्ध होती. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये राजाचे मृतदेह सुती, तलम, नक्षीदार वस्रांमध्ये गुंडाळण्यात आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ही परंपरा केवळ इजिप्तमध्येच नव्हे तर अगदी पार आग्नेय आशियातील राजघराण्यांच्या दफनांमध्येही पाहायला मिळते. याचबरोबर भारतीय तेल आणि सुगंधी तेलांचा वापरही या दफनांमध्ये झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कराराचे महत्त्व काय? काही देशांचा कराराला विरोध कशासाठी?

भारत आणि इजिप्त संबंध किती जुने आहेत?

भारत व इजिप्त यांचे संबंध नवाश्मयुगापासून असावेत असे संशोधक मानतात. विशेष म्हणजे पिरॅमिडच्या आत ज्या मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या त्या मध्ये ल्यापिझ ल्याझुलीचा समावेश आहे. यावरून इजिप्त व हिंदुकुश यांमधील व्यापारी संबंध स्पष्ट होतो. आज हिंदुकुश हा भाग भारतात नाही. तरी प्राचीन काळी तो भारतीय प्रदेश व प्राचीन संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. हिंदुकुश पर्वताच्या परिसरात ल्यापिझ ल्याझुलीच्या खाणी होत्या. ल्यापिस ल्याझुली हा निळ्या रंगाचा मौल्यवान दगड आहे, त्यापासून मौल्यवान खडे तयार केले जातात. प्राचीन काळापासून त्याचा वापर दागिन्यांमध्ये होत असे. या दगडापासून तयार करण्यात आलेल्या निळ्या रंगालाही जगभरात मागणी होती. किंबहुना अजिंठाच्या लेणींमध्ये चित्रात जो गडद निळा रंग दिसतो. तो याच ल्यापिझ ल्याझुलीच्या वापरातून तयार करण्यात आला आहे. इजिप्त येथील दफनांमाध्ये सापडलेला हा दगड नक्कीच तत्कालीन भारत व इजिप्त यांच्यातील व्यापारी संबंध विशद करणारा आहे. ३००० हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया व इजिप्त येथे सिंधू संस्कृतीतील व्यापारांची वस्ती होती. हे उत्खननात सापडलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून सिद्ध होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 11:58 IST
ताज्या बातम्या