शैलजा तिवले
करोनाच्या साथीनंतर मुलींमध्ये अकाली पौगंडावस्था येण्याचे प्रमाण वाढले असून सहा ते नऊ वयोगटातच मुलींना या अवस्थांतराला सामोरे जावे लागत आहे. मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पौगंडावस्था म्हणजे काय?
पौगंडावस्था म्हणजे बाल्य व तारुण्य यांमधील काळ. बालपणातून तारुण्यात पदार्पण करताना लागणारा संक्रमणाचा काळ असेही याला म्हटले जाते. या वेळी शरीरात आणि मेंदूत अनेक बदल होत असतात. मुलींमध्ये साधारण ही अवस्था दहाव्या वर्षांपासून सुरू होते आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १२ वर्षांनंतर मासिक पाळी येते. पौगंडावस्थेमध्ये मुलींच्या शरीरामध्ये बदल होत असतात. शरीरातील हाडे जुळून येण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच स्त्री बीजाचा विकास होत असतो.
मुलींमध्ये पौगंडावस्थेबाबत काय बदल जाणवत आहेत ?
गेल्या काही वर्षांमध्ये मुलींना दहा वर्षांच्या आधीच पौगंडावस्था येत असल्याचे दिसून येत आहे. सहा ते नऊ वयोगटामध्ये हे बदल प्रामुख्याने दिसून येत आहेत. अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षीच मुलींमध्ये शारीरिक बदल होत असून पौगंडावस्थेची लक्षणे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाण करोना साथीच्या काळानंतर सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे आढळते. काही मुलींमध्ये दहा वर्षांच्या आत पाळी आल्याचेही आढळले आहे. मुलींना अकाली पौगंडावस्था किंवा पाळी आल्यामुळे चिंतातुर झालेले पालक रुग्णालयात मुलींना तपासणीसाठी घेऊन येत आहेत.
करोनाच्या साथीपूर्वीही अशी प्रकरणे दिसत असली तरी त्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. करोना साथीच्या काळानंतर यामध्ये नोंद घेण्याइतपत वाढ झाली आहे. मुलींमध्ये अकाली पौगंडावस्था येण्यामागे काय कारणे असू शकतात, हे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास रुग्णालयाने सुरू केला आहे, असे वाडिया रुग्णालयाच्या औषध विभागाच्या प्रमुख डॉ. सुधा राव यांनी सांगितले.
अकाली पौगंडावस्थेचे परिणाम काय?
अकाली पौगंडावस्थेमुळे शारीरिक परिणामांबरोबर मानसिक परिणाम होतात. या स्थितीत होणारे शारीरिक बदल स्वीकारण्याची तयारी लहान वयात झालेली नसते. या बदलांमुळे मुलींना वावरताना लाज वाटते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मुली अबोल होतात. त्यांना नैराश्य येऊ शकते. मासिक पाळी लवकर सुरू झाल्यामुळेही मुलींनाही बराच त्रास होतो. हाडे आणि स्नायूंची वाढ होत असते. शरीराच्या रचनेत बदल होतो. शरीराच्या पुनरुत्पादनाच्या क्षमतेचा विकास लवकर झालेला असतो. मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात हाडे जुळून येतात. त्यामुळे पाळीनंतर मुलींची उंची फारशी वाढत नाही. या मुलींमध्ये अकाली मासिक पाळी आल्यामुळे भविष्यात उंची फारशी न वाढण्याचाही धोका असतो. तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असे डॉ. राव यांनी स्पष्ट केले.
मुलींमध्ये हे बदल होण्यामागची संभाव्य कारणे काय?
मुलींमध्ये अकाली पौगंडावस्था येण्याचे मुख्य कारण म्हणजे अंतस्रावांमध्ये (हॉर्मोन्स) होणारे बदल. हे बदल होण्यामागे अनेक संभाव्य कारणे आहेत. करोनाकाळात मुली बराच काळ घरात होत्या. या काळात आहाराचे अयोग्य नियोजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्रावांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच गोठवलेले पदार्थ, जंकफूडचे सेवन, सोयाबीनयुक्त पदार्थाचे अतिसेवन अशा अयोग्य आहाराचा परिणाम स्रावांमध्ये होतो. अकाली पौगंडावस्था येण्याचे हेही एक कारण सध्या दिसून येत आहे. जनुकीय किंवा कौटुंबिक इतिहास हेदेखील यामागे एक कारण असू शकते. याबाबत खात्रीशीर आणि अभ्यासपूर्ण माहिती संकलित करणे गरजेचे आहे, असे डॉ. राव यांनी सांगितले.
अकाली पौगंडावस्था आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे का गरजेचे?
अकाली पौगंडावस्था येण्याचे धोके आणि उपचार याबाबत पालकांमध्ये फारशी जनजागृती नाही. काही पालक आमच्याकडे चौकशीसाठी येत असले तरी अनेक पालक आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. काही वेळा पालक याबाबत बोलण्यासाठी फारसे सकारात्मक नसतात किंवा त्यांना संकोच वाटतो. मात्र अकाली पौगंडावस्था येण्याची लक्षणे दिसून आलेल्या पालकांनी याबाबत सल्ला घेणे गरजेचे आहे.
मुलींची तपासणी करून पालकांना आणि मुलींना योग्य मार्गदर्शन केले जाते. तसेच अकाली तारुण्यामागील कारण लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यकता असल्यास उपचारही करता येतात. हा प्रश्न मुलींच्या आरोग्याचा आहे तितकाच तो सामाजिक प्रश्नही आहे. मुलींना या सामाजिक आणि भावनिक अडथळय़ांवर मदत करणे हे आव्हानात्मक असते. मुलींशी याबाबत चर्चा करायला हवी, पडणारे प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्या अंगी आले पाहिजे आणि पालकांनी त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास टिकण्यासाठी मदत केली पाहिजे, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.