scorecardresearch

Blogs : २३०० वर्षांपर्यंत मागे जातो ‘धाराशिव’चा पुरातत्त्वीय इतिहास!

धाराशिव आणि छत्रपती संभाजी महाराज नगर या नावांना अलीकडेच केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यानिमित्ताने धाराशिवच्या प्राचिनतेचा ऐतिहासिक कागदपत्रे आणि पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे घेतलेला धांडोळा.

Dharashiv Maharashtra
धाराशिव लेणी आणि ग्रीक – रोमशी असलेला तेरचा संबंध…

एखाद्या ठिकाणाला विशिष्ट नाव मिळते, त्या वेळेस त्याला काही तार्किक असा संदर्भ असतो. शहर किंवा गावांच्या संदर्भात हा विचार करताना तो तार्किक संदर्भ आपल्याला इतिहास आणि पुरातत्त्वाच्या निकषावर तपासून पाहावा लागतो. अलीकडेच औरंगाबादचे छत्रपती संभाजी महाराज नगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. या निर्णयामागचे राजकारण आपण बाजूला सारले आणि प्राचीन संदर्भांच्या निकषावर तपासून पाहिले असता यातील धाराशिवच्या इतिहासाचा संदर्भ पुराव्यांच्या आधारे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो.

आणखी वाचा : BBC IT Raid: अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ‘आउटलूक’वर पडली होती प्राप्तिकर विभागाची अशीच रेड

गावे किंवा शहरे यांच्या नावांमागे इतिहास असतो आणि संस्कृतीदेखील. त्याच अनुषंगाने धाराशिवच्या इतिहासाचा धांडोळा घेतला असता काही महत्त्वाच्या बाबी नजरेसमोर येतात. दोन शहरे आणि जिल्ह्यांचे नामकरण अलीकडे पार पडले. पैकी, मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावरून या शहराला औरंगाबाद नाव मिळाले. हा औरंगजेबाच्या सुभेदारीचा प्रांत होता. औरंगाबादचे मूळ नाव खडकी होते. तेथील प्राचीन शिवमंदिर खडकेश्वर या नावाने ओळखले जाते. खडकी या प्राचीन नावाचा संदर्भ मराठा, मुघल तसेच निजामाच्याही कागदपत्रांमध्ये सापडतो. त्यावरून असेही एक गृहीतक मांडले जाते की, खडकेश्वर या देवालयावरून खडकी हे नाव आले आहे. मात्र इतिहास, पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्र असे सांगते की, देवावरून कधीच कोणत्याही ठिकाणाला त्याचे नाव प्राप्त होत नाही. तर ठिकाणाच्या नावावरून प्रसंगी देवालाही नामाभिधान प्राप्त होते. प्राचीन नाव द्यायचे तर मग खडकी का नाही, या प्रश्नाचे उत्तर विद्यमान राजकारणात दडलेले आहे आणि ते सर्वश्रुत आहे.

आणखी वाचा : आत्तापर्यंत ऑस्करला पाठवलेल्या भारतीय चित्रपटांची निवड खरंच योग्य ठरली आहे का?

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेवटच्या निझामाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या भागाचे नामकरण उस्मानाबाद असे करण्यात आले. हे खरे असले तरी विशेष बाब म्हणजे निजामाने या शहराचे नाव उस्मानाबाद करूनदेखील स्थानिक ग्रामस्थ मात्र या ठिकाणाचा उल्लेख धाराशिव म्हणूनच करत होते व आजही करतात. मध्ययुगीन मराठा, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही अशा सर्वच पातशाह्यांनी आपल्या कागदपत्रांमध्ये उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव म्हणूनच केला आहे, हे विशेष. यावरून खरे तर धाराशिव या नावाची ऐतिहासिकता सिद्ध होण्यास मदत होते. मात्र इतिहासात डोकावले असता असे लक्षात येते की, या नावाची प्राचीनता पार इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे नेणारे पुरावेही तेवढेच उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : BLOG: ईटा अन् किटा मध्ये अडकली जिंदगी….

एखादे गाव किंवा शहर वसत असताना तेथे स्थायिक होणारे जनसमुदाय संरक्षक देवता म्हणून ग्रामदेवतेची स्थापना करतात आणि त्यानंतर गावाची खरी वाढ होते असे मानले जाते. तीच ग्रामदेवता त्या गावाची आद्यशक्ती म्ह्णून अनेक शतक आपले अस्तित्व सांभाळून असते. धाराशिवमध्येही तसेच झाल्याचे लक्षात येते. या शहरातही धाराशिव मर्दिनी या ग्रामदेवतेचे स्थान तिच्या प्राचिनत्वाची साक्षी देते. स्कंदपुराणामध्ये धारासुर नामक असुराचा उल्लेख आहे. देवीने त्याचा वध केला आणि ती धारासुरमर्दिनी ठरली. धारासुराचा हा पौराणिक संदर्भ ११ व्या शतकातील असला तरी या भागाची प्राचीनता सिद्ध करण्यास तो निश्चितच मदत करतो.

आणखी वाचा : Blog : वीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे नि विरोधकांची दिवास्वप्ने!

याशिवाय अनेक प्राचीन संदर्भ या भागाचा इतिहास इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात घेऊन जाण्यास अभ्यासकांना मदत करतात. धाराशिव जिल्ह्यात असणारे तेर हे गाव पुरातत्त्वज्ञाच्या दृष्टिकोनातून मोलाचा खजिना आहे. येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून आजपासून सुमारे २३०० वर्षांपूर्वीचे भारत व रोम यांच्यात होणाऱ्या व्यापाराचे अनेक पुरावे सापडले आहेत. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्याही आधीपासून सुरू असलेल्या भारत-रोम व्यापारी संबंधांमध्ये तेरला अनन्य महत्त्वाचे असे स्थान होते. त्यामुळे या भागाच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे आजही इतिहासात आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवून आहेत ही बाब विशेष लक्षात घेण्याजोगी आहे.

खुद्द धाराशिव शहरात असणाऱ्या धाराशिव लेणींची प्राचीनताही इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मागे जाते. तर भोगावती नदीजवळील लेणी ही चांभार लेणी किंवा चामर लेणी म्हणून म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेणी समूहात एकत्रित साधारण ११ लेणींचा समावेश होतो. भारतात बौद्ध, जैन आणि हिंदू या तीनही पंथीयांच्या लेणींचा एकत्रित समूह मोजक्याच ठिकाणी आहे. अशा मोजक्या आणि दुर्मीळ ठिकाणांमध्ये धाराशीवचा समावेश होतो, हे विशेष. जेम्स बर्जेस या पुरातत्त्वज्ञाने धाराशिव या भागात १८व्या शतकात सर्वप्रथम सर्वेक्षण केले. धाराशिव लेणीसमूहातील सर्वात प्राचीन लेणी बौद्ध आहेत. तर अर्वाचीन लेणीसमूह जैन पंथीयांचा आहे. जैन लेणीसमूह हा ११ व्या शतकातील असून भोगवती नदीकडील शैव लेणी ही इसवी सनाच्या सहाव्या शतकातील आहेत. उपलब्ध पुराव्यांनुसार बौद्ध व शैव लेणी ही वाकाटक राजवटीच्या काळात खोदली गेली. वाकाटक हे राजघराणे शिवोपासक होते. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत त्यांचा राज्यकाळ मानला जातो. ते स्वतः शिवोपासक असल्याने त्यांच्या काळात अनेक शिवमंदिरे बांधली गेली. म्हणून याच काळात या भागाचे नाव धाराशिव झाले असावे, असे संशोधक मानतात.

या भागात आढळणाऱ्या दंतकथेनुसार पूर्वी येथे शिवाचे स्थान होते व नदीच्या प्रवाहामुळे होणाऱ्या सततच्या जलाभिषेकामुळे हा भाग धाराशिव म्हणून प्रसिद्ध झाला. किंबहुना चामर लेणींशिवाय भोगावती नदीच्या पात्रात धबधब्यानजिक असणारी तीन लेणी या दंतकथेला विशेष पुष्टी देणारी आहेत. एकुणात धाराशिव या नावाला किमान २३०० वर्षांचा पुराभिलेखीय इतिहास आहे!

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 13:29 IST
ताज्या बातम्या