scorecardresearch

विश्लेषण : देशात करोनाच्या उद्रेकाला तीन वर्षे पूर्ण, विषाणूमुळे झालेले मृत्यू, करोनाचा प्रभाव आणि लसीकरण याचा आढावा

३० जानेवारी २०२० ला देशात पहिला करोनाने बाधित रुग्ण आढळला होता, आत्तापर्यंत करोनाच्या तीन लाटा, सुमारे पाच लाख ३० हजार जणांचा मृत्यु आणि २०० कोटी २० लाख लसी असा प्रवास करोनाचा राहीला आहे

Explained, Corona pandemic, review, corona wave, lockdown, vaccination
विश्लेषण : देशात करोनाच्या उद्रेकाला तीन वर्षे पूर्ण, विषाणूमुळे झालेले मृत्यू आणि लसीकरण याचा आढावा ( संग्रगहित छायाचित्र )

डिसेंबर २०१९ मध्ये करोना विषाणूमुळे वेगाने संसर्ग होत असल्याच्या घडामोडींची माहिती जरी यायला सुरुवात झाली असली तरी भारतात करोनो खऱ्या अर्थाने पोहचला ३० जानेवारी २०२० ला. करोनाच्या उद्रेकाचे केंद्रस्थान असलेल्या चीनमधील वुहानमधून थेट केरळमध्ये पोहचलेल्या २० वर्षाच्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हा देशातील पहिला करोनाने बाधित झालेला रुग्ण ठरला.

या सर्व घडामोडीला आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेने गाठलेले टोक, एप्रिल-मे २०२२१ मध्ये करोनाचा व्हेरिएंट-उपप्रकार डेल्डामुळे आलेली जीवघेणी दुसरी लाट आणि त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये ओमायक्रॉनमुळे आलेली करोनाची तिसरी लाट असा भारतातील करोनाचा प्रवास राहिलेला आहे. या सर्व कालावधीत आत्तापर्यंत ४ कोटी ४० लाख लोकांना करोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत पाच लाख ३० हजार नागरीक मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान जानेवारी २०२१ पासून देशात करोनाला प्रतिबंधित करणारी लस उपलब्ध झाली. आत्तापर्यंत २२० कोटी लसीचे डोस नागरीकांना देण्यात आले आहेत. १२ वर्षावरील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना किमान एकदा तरी लस देण्यात आलेली आहे.

तर उपलब्ध नोंदीनुसार जगात ७५ कोटी २० लाख लोकांना करोनाची बाधा झाली असून ६० लाख ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील करोनाच्या तीन लाटा

३० जानेवारी २०२० पासून भारतात करोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च २०२० ला करोना हा pandemic – महामारी असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर करोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात झाली. २३ मार्च भारताने सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा स्थगित केल्याचं जाहीर केलं, २१ दिवसांची पहिली टाळेबंदी – लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यानंतर हा कालावधी ३ वेळा वाढवण्यात आला.

सप्टेंबर २०२० पर्यंत सुमारे आठ हजार जणांचा मृत्यू आणि सहा लाख ४० हजार करोना बाधितांची नोंद झाली होती. करोनाच्या पहिल्या लाटेने सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला होता.

या संसर्गाचा सामना कसा करायचा, तात्पुरता का होईना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या गोळ्या वापरायच्या, रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार कसे करायचे, अशा परिस्थितीत इतर आजार असलेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची याबाबत एकच गोंधळाचे वातावरण असल्याचे बघायला मिळाले, प्रत्येक जण त्यांच्यापरिने पावले उचलत होता.

एप्रिल-मे २०२१ मध्ये करोनाची दुसरी लाट जी करोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटमुळे आली ती सर्वात घातक ठरली.यामुळे रुग्णालयात किंवा करोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे देशात उद्योग क्षेत्रात वापरला जाणारा ऑक्सीजन उपचारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. देशाबाहेरुनही ऑक्सीजन आणावा लागला, यामध्ये संरक्षण दलाच्या युद्धनौका आणि मालवाहू विमानांनी मोठी कामगिरी बजावली. याच काळात करोना बाधितांना बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले. या दुसऱ्या लाटेने मे महिन्यात सर्वोच्च पातळी गाठली होती, ज्यामध्ये देशात तब्बल २७ लाख ४० हजार करोना बाधितांची नोंद झाली तर २८ हजार ९०० लोकांचा प्राण गमवावे लागले.

करोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे व्हेरिएंटमुळे २०२१ च्या अखेरीस आली असली तरी ती अल्पकाळ टिकली. यामध्ये करोनाचा उपप्रकार हा डेल्टासारखा घातक नसला तरी संसर्गाचे प्रमाण हे मोठे होते. जानेवारी २०२२ मध्ये या लाटेचा सर्वोच्च बिंदू होता, या महिन्यात २१ लाख लोकं बाधित झाले आणि सात हजार ८०० जणांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊनचा परिणाम

करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशव्यापी २४ मार्च २०२० ला देशामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तोपर्यंत देशात ६०० पेक्षा जास्त करोना बाधितांची नोंद झाली होती. करोनाचा संसर्ग पसरु नये, आरोग्य व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांना तयारीला वेळ मिळावा यासाठी लॉकडाऊची घोषणा करण्यात आली. मात्र याचा थेट परिणाम हा हातावर पोट असलेली लोकसंख्या आणि असंघटीत क्षेत्र यांवर झाला. यासाठी केंद्र सरकारने एक लााख ७० हजार कोटी रुपयांच्या मार्फेत गरजू लोकांना धान्य,खात्यात थेट पैसे आणि स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करुन दिला. त्यानंतर लॉकडाऊन आणि करोनाचा प्रभाव असेपर्यंत गरजू जनतेसाठी धान्य योजना केंद्र सरकारला सुरु ठेवाव्या लागल्या.

करोनाच्या चाचण्या

करोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक प्रयोगशाळा भारतभरात मोजक्याच उपलब्ध होत्या. तसंच करोनासाठी चाचणी करणे हे अत्यंत महाग ठरत होते, सुरुवातीच्या काळात करोनाच्या चाचणीसाठी किमान चार हजार ८०० रुपये मोजावे लागायचे. तेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीसह देशभरात करोना चाचणीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिल्या आणि चाचणीचा खर्चही काही महिन्यांना कमी झाला.

लसीकरण

करोनाचा उद्रेक झाल्यावर काही दिवसांतच करोनावरील लसीच्या संशोधनाला जगभारत सुरुवात झाली होती. १६ जानेवारी २०२१ ला लसीकरणाला भारतात सुरुवात झाली. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस देण्यात आले, त्यानंतर ४५ वर्षांच्या वर लसीकरणाचा टप्पा आला, मग १८ वर्षावरील नागरीकांनासाठी लसीकरण खुलं करण्यात आलं.करोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यावर बुस्टर लस आणि १२ वर्षावरील मुलांना करोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशात आता करोनाची साथ पुर्णपणे ओसरली असून सर्व प्रकारचेही निर्बंध हटवले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 19:41 IST