महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या काही भागांमध्ये तिसऱ्या लाटेचे परिणाम देखील जाणवू लागले आहेत. त्यासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नुकतीच करोनाच्या निर्बंधांविषयी नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले असून काही गोष्टी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्बंधांबाबत चुकीच्या गोष्टी सांगून लोकांची फसवणूक केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नेमकं राज्य सरकारच्या नियमावलीत काय म्हटलंय, हे जाणून घेणं नागरिकांसाठी महत्त्वाचं ठरतंय!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हालाही असा अनुभव आलाय?

पुण्याच्या एका वाहन चालकानं नाव न सांगण्याच्या अटीवर एक प्रसंग सांगितला. तो मुंबईत सहा प्रवासी असलेली (चालक+सहा) गाडी घेऊन आला तेव्हा त्याला वाहतूक पोलिसांनी अडवलं. त्याला सांगितलं की, “नव्या निर्बंधांनुसार गाडीत तीनच प्रवाशांना परवानगी आहे. त्यामुळे दोन हजार रूपये दंड भरा.” त्याच्याकडे नियमानुसार गाडीची सगळी कागदपत्र होती. त्यामुळे तो म्हणाला की, “जीआरची कॉपी दाखवा, तर दंड भरीन.” हे ऐकून पोलिसांनी आपल्याला सोडून दिलं.

हा प्रसंग तसा कुणासोबतही घडू शकतो. करोनाच्या नियमावलीबाबत आपल्याला माहिती नसलेल्या बाबींवर कुणीही काहीही सांगून आपली फसवणूकही करू शकतं. त्यामुळे ही नियमावली नेमकी काय आहे? राज्य सरकारने त्यात कोणत्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केला आहे? आणि विशेषत: सार्वजनिक वाहतुकीसाठी कोणते नियम आहेत? हे आता सविस्तर पाहुयात…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

दुसऱ्या लाटेनंतर करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील निर्बंध हटवण्यात आले होते. ८ जानेवारी २०२१ रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार सार्वजनिक वाहतूक किंवा खासगी वाहतूक साधनांमधील प्रवाशांची संख्या मर्यादित केल्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. पूर्णपणे लसीकरण झालेल्या अर्थात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवास करता येणार आहे. तसेच, इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तींना ७२ तासांपूर्वीपर्यंत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. हवाई मार्गे, रेल्वेने किंवा रस्ता मार्गे येणाऱ्या प्रवाशांना हे लागू असेल.

सार्वजनिक वाहतूक साधनांसाठी नेहमीच्या वेळाच कायम असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम

दरम्यान, इतर देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रानं आखून दिलेली नियमावलीच लागू असेल. ११ जानेवारीपासून ही नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

संचारावर निर्बंध!

दरम्यान, राज्य सरकारने पहाटे ५ ते रात्री ११ यादरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र संचार करण्यावर बंदी घातली आहे. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या क्षेत्रातील लोकांना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय, खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तसेच उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. 

इतर निर्बंध

१. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.

२. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.

३. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.

४. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.

५. प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.

६. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.

७. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.

८. नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained transport rules in maharashtra amid corona cases surge omicrone third wave pmw
First published on: 12-01-2022 at 14:19 IST