फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. ३६ वर्षीय सना मरीन यांच्या या व्हिडीओमुळे सध्या एकच वाद निर्माण झाला आहे. सना मरीन यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हा वाद इतका पेटला आहे की, काही नेत्यांनी सना मरीन यांची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी आहे.

जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांमध्ये गणल्या जाणाऱ्या सना मरीन यांनी ड्रग्ज घेतल्याचे आरोप फेटाळले असून, गरज लागली तर आपण चाचणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. “माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही. मी कधीच ड्रग्जचं सेवन केलेलं नाही,” असा दावा सना मरीन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा – विश्लेषण: राजीनामा की नाराजीनामा? कमी काम करणं हे कर्मचारी आणि कंपनीच्याही भल्याचं, कसं ते समजून घ्या

पार्टी केल्यामुळे सना मरीन वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी, करोनाची लागण झालेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या संपर्कात आल्यानंतरही नाईटक्लबमध्ये उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

सना मरीन कोण आहेत?

देशाच्या वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या सना मरीन यांनी २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. वयाच्या ३४ व्या वर्षी शपथ घेतल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा यांना मागे टाकत त्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या.

नोव्हेंबर महिन्यात सलग दोन आठवडे सुरु असलेला पोस्टल संप योग्य प्रकारे न हाताळल्याने टीका होऊ लागल्यानंतर एंटी रिने यांनी ३ डिसेंबरला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोशल डेमोक्रॅटिक पक्षाने सना मरीन यांची निवड केली होती.

हेही वाचा – विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

सना मरीन २० वर्षांच्या असतानाच त्यांची राजकारणाशी ओळख झाली होती. दोन वर्षांनी हेलसिंकीच्या उत्तरेकडील शहर, टेम्पेरे येथे काऊन्सिलच्या जागेसाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. २०१५ मध्ये त्या खासदार झाल्या. पंतप्रधान झाल्यानंतर युक्रेनशी युद्ध पुकारणाऱ्या रशियाविरोधात कठोर भूमिका घेतल्याने त्यांचं कौतुक झालं होतं. तसंच नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतल्याने कौतुकास पात्र ठरल्या होत्या.

गेल्या चार वर्षांपासून सना मरीन वेगवेगळ्या कारणामुळे टीकेच्या धनी ठरल्या होत्या. सतत पार्टी करण्याच्या आपल्या सवयीमुळे तसंच सोबतीमुळे त्यांच्यावर टीका होत असते. गतवर्षी नाईट क्लबवरुन झालेल्या वादानंतर, सना मरीन यांनी फेसबुकला भली मोठी पोस्ट करत माफी मागितली होती. फिनलँडमधील प्रसिद्ध मॅगझीनने सना मरीन यांचे मैत्रिणींसोबत डान्स करतानाचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

सध्याच्या वादासाठी कारणीभूत ठरलेल्या व्हिडीओत काय आहे?

सना मरीन यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्या आपल्या मैत्रिणींसोबत मद्यपान आणि डान्स करताना दिसत आहेत. खासगी निवासस्थानी ही पार्टी झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. या व्हिडीओत फिनलँडमधील गायक अलमा, टीव्ही होस्ट टिन्नी विकस्ट्रॉम, युट्यूबवर इलोना असे प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसत आहेत.

सना मरीन यावेळी मैत्रिणींची गळाभेट घेताना, गाताना तसंच नाचताना दिसत आहेत. युरो न्यूजच्या वृत्तानुसार, “मी सर्व कायदेशीर गोष्टी केल्या आहेत” असं सना मरीन यांनी म्हटलं आहे. “माझ्याकडे कौटुंबिक आणि कामाच्या आयुष्याव्यतिरिक्त मोकळा वेळही आहे, जो मी मित्रांसोबत घालवते,” असं सना मरीन यांनी सांगितलं आहे.

यादरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सना मरीन यांची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी केल्याचं वृत्त बीबीसीने दिलं आहे. फिनलँडमध्ये देशांतर्गत समस्या असतानाही पार्टी केल्याबद्दल इतर राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही नागरिकांनी सना मरीन यांना पाठिंबा दिला असून, एखाद्या नेत्याने मोकळा वेळ आपल्या मित्रांसोबत घालवण्यात काही चुकीचं नाही असं सांगितलं आहे.