scorecardresearch

Premium

विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या विनोदवर मदत मागण्याची नामुष्की का ओढवली

Vinod Kambli Financial Crisis
करोना साथीच्या कालखंडात विनोद कांबळीच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले

प्रशांत केणी

क्रिकेट जगतातील ध्रुवतारा सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे डागाळलेल्या या कारकीर्दीत विनोदने काही संस्मरणीय विक्रमही नोंदवले. परंतु करोना साथीच्या कालखंडात या माजी क्रिकेटपटूच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले. सध्या फक्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या विनोदवर मदत मागण्याची नामुष्की का ओढवली, हे समजून घेऊ या.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न
disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Akash Chopra's big statement on Siraj Bumrah and Shami Said These three will not play together in the World Cup
IND vs AUS: सिराज, बुमराह आणि शमीबाबत आकाश चोप्राचे मोठे विधान; म्हणाला, “विश्वचषकात या तिघांना…”
World Cup 2023: Pakistani team did not get visa for the World Cup plan to come via Dubai cancelled Babar-PCB worried
World Cup 2023: ‘व्हिसा’मुळे पाकिस्तानच्या विश्वचषक २०२३च्या तयारीवर टांगती तलवार, भारतात येण्याची परवानगी अद्याप नाही मिळाली

विनोदवर ही वेळ का आली?

विनोदच्या म्हणण्यानुसार, सध्या त्याच्या कुटुंबाची गुजराण फक्त ‘बीसीसीआय’कडून मिळणाऱ्या ३० हजार रुपये निवृत्तिवेतनावर होत आहे. करोनाच्या साथीच्या कालखंडात नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमधील मार्गदर्शनाचे काम स्थगित झाले आहे. याचप्रमाणे २०१९मध्ये झालेल्या मुंबई क्रिकेट लीगमध्ये तो एका संघाचा प्रशिक्षक होता. परंतु ही लीगसुद्धा अद्याप पुन्हा सुरू होऊ शकलेली नाही.

विनोदची काय अपेक्षा आहे?

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्याला मार्गदर्शनाची जबाबदारी द्यावी, जेणेकरून अर्थार्जन होऊ शकेल, अशी अपेक्षा विनोदने व्यक्त केली आहे. सचिनला सर्व काही ठाऊक आहे. परंतु माझी त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. माझ्या पाठीशी तो सदैव खंबीरपणे उभा असतो. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीत त्याच्यामुळेच काही वर्षांपूर्वी मी प्रशिक्षक होतो, असे विनोदने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – विश्लेषण: शेअर बाजारातील तेजी १९८१पासूनच! झुनझुनवालांच्या दाव्याचा नेमका अर्थ काय?

शालेय जीवनात विनोद आणि सचिन यांनी प्रथम केव्हा क्रिकेट जगताचे लक्ष वेधले?

१९८८मध्ये विनोद आणि सचिनने ६६४ धावांची ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी भागीदारी करीत क्रिकेट जगताचे लक्ष वेधले होते. क्रिकेटमधील कोणत्याही गड्यासाठी (विकेटसाठी) ती सर्वोच्च भागीदारी ठरली. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेकडून सेंट झेवियर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी हा पराक्रम दाखवला. १६ वर्षीय विनोदने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या, तर १४ वर्षीय सचिनने नाबाद ३२६ धावा केल्या होत्या. त्यामुळे शारदाश्रम शाळेने २ बाद ७४८ धावांचा डोंगर उभारला.

विनोदच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

फेब्रुवारी-मार्च १९९३ मध्ये कांबळीने सलग दोन द्विशतके झळकावून क्रिकेटविश्वात आपल्या आगमनाची ग्वाही दिली. यापैकी पहिले द्विशतक (२२४) इंग्लंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झळकावले, तर दुसरे द्विशतक (२२७) झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर साकारले. हे विनोदच्या कारकीर्दीतील अनुक्रमे तिसरे आणि चौथे कसोटी सामने होते. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतही (१२५, १२०) विनोदने शतके नोंदवली होती. त्यामुळे तीन विविध प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सलग तीन शतके झळकावण्याचा विक्रम त्याने नावावर केला. मग फक्त १४ कसोटी डावांमध्ये विनोदने एक हजार धावांचा टप्पा गाठला. परंतु १७ कसोटी सामन्यांत १,०८४ धावा करणाऱ्या विनोदची कारकीर्द तो २४ वर्षांचा होण्याआतच १९९५ मध्ये संपुष्टात आली.

विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं?

विनोदची कसोटीमधील धावसरासरी किती?

विनोदची कसोटी क्रिकेटमधील ५४.२० ही धावसरासरी ही सचिन, सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यापेक्षाही सरस आहे. परंतु विनोद दुसऱ्या डावात धावांसाठी झगडतो, हे त्याची आकडेवारीच स्पष्ट करते. त्याच्या पहिल्या डावातील धावांची सरासरी ही ६९.१३ अशी आहे, तर दुसऱ्या डावातील ९.४० धावा अशी आहे.

विनोदच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीला ग्रहण केव्हा लागले?

विनोदने १९९१मध्ये विल्स शारजा करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १०४ एकदिवसीय सामन्यांत ३२.५९च्या सरासरीने २,४७७ धावा केल्या. यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. यापैकी पहिले शतक त्याने १९९३मध्ये जयपूर येथे इंग्लंडविरुद्ध झळकावले. वाढदिवसाच्या दिवशी शतक नोंदवणारा तो एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. त्याने १९९२ आणि १९९६ अशा दोन विश्वचषकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९९६च्या विश्वचषकातील उपांत्य सामना भारत गमावण्याची चिन्हे दिसत असताना प्रेक्षकांनी धुडगूस, जाळपोळ करीत सामना स्थगित करण्याची परिस्थिती आणली, त्यावेळी विनोद मैदानावर होता. अखेरीस हा सामना श्रीलंकेला बहाल केल्यामुळे विनोदने रडत-रडतच मैदान सोडले होते. त्यानंतर विनोदच्या एकदिवसीय कारकीर्दीला ग्रहण लागले. मार्च ११९६ ते ऑक्टोबर २०००पर्यंतच्या ३५ एकदिवसीय सामन्यांत विनोदची धावसरासरी १९.३१ इतकी खालावली. त्याने एकदिवसीय संघात नऊ वेळा पुनरागमन केले. ऑक्टोबर २०००मधील श्रीलंकेविरुद्धचा सामना त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. अखेरीस २०११मध्ये त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

विनोदचे आयुष्य कोणत्या घटनांमुळे डागाळले?

सामना निश्चितीमुळे भारताने १९९६च्या विश्वचषकातील उपांत्य सामना गमावला. संघातील अन्य फलंदाजांसह, व्यवस्थापक आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तो सामना निश्चित केला, असा आरोप विनोदने केला होता. २०१५ मध्ये विनोद आणि त्याची पत्नी आंद्रीआ यांनी मारहाण आणि तीन दिवस खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप मोलकरणीने केला होता. त्यामुळे विनोदला तुरुंगात जावे लागले होते. यानंतर एका मॉलमध्ये गायक अंकित तिवारीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी कांबळी दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू आणि रमीझ राजा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी विनोदने ‘ट्विटर’वर केली. परंतु नंतर दिलगिरी व्यक्त करीत आपली पोस्ट हटवली होती. याशिवाय वांद्रे येथील आपल्या सोसायटीत चार वर्षांहून अधिक कालावधीची १० लाख रुपयांहून अधिक थकबाकी केल्यामुळे तो अडचणीत सापडला होता. परदेशी शेजाऱ्याविरोधातही विनोदने पोलीस तक्रार केली होती. त्याने आपल्याला उद्देशून ‘काळा भारतीय’ असा उल्लेख केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. याचप्रमाणे गृहकर्ज आणि गाडीसाठीच्या कर्जाचे हफ्ते न फेडल्याप्रकरणी एका बँकेने त्याच्यावर ठपका ठेवला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why vinod kambli is desparately seeking financial help print exp sgy

First published on: 18-08-2022 at 08:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×