दिशा काते

राज्यातील बहुतेक भागात सध्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मोसमी पाऊस अद्याप दाखल झालेला नाही. यंदा मोसमी पावसाचे केरळमधील आगमन सर्वसाधारण तारखेपेक्षा लांबले आहे. पाऊस पडतो आहे, पण तो मोसमी नाही, म्हणजे काय, मोसमी पाऊस दाखल झाला म्हणजे काय, यंदा त्याचा प्रवास संथ का या प्रश्नांसह पावसाच्या रंजक प्रवासाचा आढावा..

मोसमी पाऊस दाखल झाला म्हणजे काय ?

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर १४ वर्षांमापन केंद्रे आहेत. त्यातील ६० टक्के म्हणजे ८ ते १० केंद्रांवर सलग दोन किंवा अधिक दिवस अडीच दिवस मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर ती मोसमी पावसाची चाहूल असते. मात्र तो मोसमी पाऊसच आहे हे निश्चित करण्यासाठी आणखी काही निकषांची पूर्तता गरजेची असते. अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंचीवर आकाशात वारे वाहतात. ते ठरावीक वेगाने, साधारण ताशी ३० ते ३५ किलोमीटर आणि साधारण ६०० हेक्टोपास्कल दाबाने वाहतात. त्याचबरोबर ठरावीक ऊर्जा किंवा उष्णता असणे आवश्यक असते. अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या लंबलहरी उष्णता ऊर्जेचे प्रतिचौरस मीटर क्षेत्रफळातील मोजमाप लक्षात घेतले जाते. उपग्रहांच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.

वळवाच्या आणि मोसमी पावसात फरक?

वळवाचा पाऊस म्हणजेच पूर्व मोसमी पाऊस. मोसमी पावसाची चाहूल हा पाऊस देतो. मात्र या दोन्ही पावसांत खूप फरक आहे. मोसमी पाऊस  मोठय़ा आणि विस्तृत प्रक्रियेचा परिणाम असतो तर पूर्व मोसमी पावसाला स्थानिक, तात्कालिक परिस्थिती कारणीभूत असते. आद्र्रता आणि वाढती उष्णता हे वळवाच्या पावसाचे संकेत मानले जातात. सोसाटय़ाचा, वादळी वारा, धुळीचे लोट, विजांचा कडकडाट यांसह वळीव हजेरी लावतो. साधारणपणे दुपारनंतर, रात्री वळवाचा पाऊस हजेरी लावतो. मोसमी पावसात संततधार असते मात्र वारे तुलनेने संथ, स्थिर होतात. दिवसभरात कोणत्याही वेळी, एकाचवेळी मोठय़ा क्षेत्रावर पडतो. दोन्ही पावसाच्या ढगांमध्येही फरक असतो. वळवाचा पाऊस देणाऱ्या ढगांचा आकार सतत बदलतो. मोसमी पावसाचे ढग दाट असतात आणि त्याचे एकसारखे थर असतात.

मोसमी पावसाचे वेळापत्रक काय ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्षांनुवर्षांची निरीक्षणे, संकेत यानुसार मोसमी पाऊस दाखल होण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार मोसमी पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात पोहोचतो. मात्र दरवर्षी तो या ठरावीक तारखेलाच येतो, असे नाही. काही वेळा केरळात तो दोन-चार दिवस आधी किंवा पाच ते सहा दिवस विलंबाने देखील दाखल होतो. पावसाचे वेळापत्रक प्रमाण मानून पावसाचे आगमन हे आधी किंवा विलंबाने आहे हे ठरवले जाते.

यंदा मोसमी पाऊस लांबणीवर का?

वाऱ्यांची दिशा आणि गती लक्षात घेऊन मोसमी पावसाचा अंदाज बांधला जातो. तीव्रता आणि इतर घटक हे या वाऱ्यांच्या दिशेवर आणि गतीवर परिणाम करतात. त्यानुसार मोसमी पावसाचा माग मिळतो. पावसाचे आगमन आठवडाभर मागे-पुढे होणे ही अतिशय सामान्य, नैसर्गिक गोष्ट आहे. सध्या अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात मोसमी पाऊस केव्हा येणार ?

हवामान विभागाच्या माहितेनुसार, केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल व्हायला आणखी तीन ते चार दिवस जातील. त्यानंतर साधारण सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र दरवर्षी तत्कालिक परिस्थितीनुसार यात बदल होतात. अनेकदा केरळमध्ये आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस एकाच दिवशी दाखल झाला आहे. तर कधीकधी केरळमध्ये मोसमी पाऊस आल्यानंतर १५-२० दिवस किंवा तीन आठवडे गेले आणि त्यानंतर मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा १५ जूननंतर राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यात बदल होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

disha.kate@expressindia.com