प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीसह देशामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. या सोहळ्यांची सांगता ही विजय चौकातल्या बिटिंग रिट्रीट सोहळ्याद्वारे केली जाते, तसा संकेत आहे. विशेष म्हणजे या शानदार कार्यक्रमाला संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनानी राष्ट्रपती हे उपस्थित असतात. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथमच या सोहळ्याला हजेरी लावली. याबरोबर पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दल प्रमुख आणि संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाचे प्रमुख यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित असतात.
अशा प्रकारचे बिटिंग रिट्रीटचे सोहळे हे इंग्लंड, अमेरिका,कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये विविध दिवसांचे औचित्य साधत आयोजित केले जातात.
बिटिंग रिट्रीट सोहळा म्हणजे काय?
ब्रिटीशांच्या काळात सुरु झालेली ही सैन्य परंपरा स्वातंत्र्यानंतरही जपण्यात आली आहे. फार पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी युद्ध समाप्ती केली जात असे, युद्ध थांबवले जात असे, तसा एक प्रघात होता. त्यावेळी युद्धावर गेलेल्या सैन्याने परत यावे यासाठी काही सैन्यदल ही विशिष्ट प्रकारचा बॅण्ड किंवा संगीताची धून वाजवत असे. याच प्रकाराला कालांतराने एका सोहळ्याचे स्वरुप येत गेले आणि विविध प्रकारच्या धून, बॅण्ड वाजवण्याच्या कार्यक्रमात रुपांतर झाले. बिटीशांच्या काळत एखादे निमित्त साधत असे कार्यक्रम आयोजित केले जात असे. स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बिटिंग रिट्रीटची परंपरा सैन्यदलाने जपली आहे.
बिटिंग रिट्रीट कोण सादर करतात?
यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरु असलेल्या सोहळ्याच्या सांगता समारंभाला संयुक्त राष्टच्या महासभेचे अध्यक्ष,हंगेरी देशाचे Csaba Korosi हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्थात या सोहळ्याचे यजमानपद हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषविले.
या प्रमुख व्यक्तिंच्या उपस्थितीत भारताच्या लष्कर, वायू दल,नौदल तसंच राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या बॅण्ड पथकांनी बिटिंग रिट्रीट सोहळ्यात सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांना आवडणाऱ्या Abide With Me या भजनाची धून ही गेली अनेक वर्षे या सोहळ्यात हमखास वाजवली जायची किंवा ही धून हे या कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण असायचे. मात्र गेल्या वर्षापासून ही धून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. असं असलं तरी विविध भारतीय संगीत आणि गाण्यांची धून, त्यावर आधारीत बॅण्ड हे नियमितपणे सादर केले जातात. यावेळी भारतीय संगीतातील विविध प्रकारच्या २९ धून आणि त्यावर आधारीत लक्षवेधी कसरती या बॅण्ड पथकांनी सादर केल्या. त्यानंतर सूर्यास्त झाल्यावर ३५०० ड्रोनच्या माध्यमातून एक ड्रोन शो देखील सादर करण्यात आला.
यानिमित्ताने जगात सर्वोत्तमपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या, लष्करी पंरपरेचा एक अविभाज्य भाग असलेल्या संरक्षण दलाच्या विविध बॅण्डचे सादरीकरण बघण्याची संधी मिळते.