रशियाने युक्रेनच्या सार्वभौम सीमेअंतर्गत हल्ले सुरू केल्याचे जाहीर केल्यामुळे किती दिवस सुरू असलेली याविषयीची अनिश्चितता संपुष्टात आलेली आहे. रशियाने यापूर्वी म्हणजे २०१४मध्येही युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर कब्जा करताना तेथील बंडखोरांना हाताशी घेतले होते. आताही डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनच्या प्रांतांमधील बंडखोरांच्या मदतीला जात असल्याचे दाखवत रशियाने थेट युक्रेनची राजधानी किएव्हलाही लक्ष्य केलेले दिसून येते. रशियाच्या या आक्रमणाला थोपवण्याची कुवत सध्या तरी कोणत्याही एका देशात नाही. पण या पुंडाईपासून ‘स्फूर्ती’ घेऊन इतर देशही आक्रमक बनल्यास आणखी हाहाकार उडू शकतो.

आज रशिया, उद्या चीन, इस्रायल…?

रशियाइतकाच विस्तारवादी साहसवाद अलीकडे चीनने दाखवलेला दिसून येतो. भारताशी भिडलेल्या सीमेवर लडाखच्या पूर्वेकडे गलवान भागात गतवर्षी झालेल्या चकमकीच्या जखमा अजून ओल्या आहेत. भारताशी दीर्घ मुदतीच्या संघर्षाच्या हेतूनेच चीनने विशेषतः प्रत्यक्ष ताबारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्यसामग्री आणि कायमस्वरूपी लष्करी पायाभूत सुविधांची उभारणी केलेली आहे. हे झाले भारताबाबत. भारतीय सीमेपेक्षाही अधिक उद्दाम आणि अधीर चीन त्यांच्या आग्नेयेकडील दक्षिण चीन समुद्रात झालेला आहे. या समुद्रावर चीनने स्वामित्व सांगण्यास सुरुवात केली असून, मलेशिया, फिलिपाइन्ससारख्या देशांच्या मच्छीमार बोटींवर हल्ले करणे, अमेरिकी आरमाराला रोखण्यासाठी अजस्र युद्धसराव आयोजित करणे असे प्रकार सुरूच आहेत. आजवर अमेरिकेसह रशियाही चीनच्या आक्रमणाला (विशेषतः भारताच्या बाबतीत) मुरड घालण्याविषयी सावध भूमिका घेत असे. आज चीनला तसा पोक्त सल्ला देण्याच्या स्थितीत रशिया नाहीच. तेव्हा चीनच्या साहसवादी प्रवृत्तीला रशियाच्या आक्रमणाने खतपाणीच मिळेल.

पश्चिम आशियातील आणखी एक साहसवादी आक्रमक देश म्हणजे इस्रायल. या देशाने आता विशेषतः तेलसमृद्ध अरबी देशांशी जुळवून घेतले असले, तरी इराणशी या देशाचे असलेले हाडवैर अजिबात संपुष्टात आलेले नाही. इराणवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याची या देशाची खुमखुमी आजही शाबूत आहे. ती नव्याने जागृत झाल्यास पश्चिम आशियातील तेलनिर्मिती व तेलवाहतूक व्यवस्थेला फटका बसू शकतो.

इराण, उत्तर कोरिया…?

इराण आणि उत्तर कोरिया हे देश पुंड म्हणूनच वर्षानुवर्षे ओळखले जातात. इराणची इस्रायलवर हल्ले करण्याची मनिषा लपून राहिलेली नाही. अणुकरार गुंडाळल्यानंतर या देशाने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रम नव्याने सुरू केलेला आहे. त्याचबरोबर इराणच्या आसपास असलेल्या सुन्नीबहुल देशांशी या शियाबहुल देशाचे खटके उडतच असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर कोरियाने कधीच कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम वा संकेत मानलेले नाहीत. दक्षिण कोरिया आणि त्यानिमित्त त्या देशाचा खंदा समर्थक असलेल्या अमेरिकेच्या तेथील तळावर हल्ले करण्याची तयारी उत्तर कोरियाने कित्येक महिने सुरू केल्याचे सामरिक विश्लेषक सांगत आहेच. विशेष म्हणजे रशिया आणि चीन हेच या दोन देशांचे पाठीराखे असावेत हा योगायोग नाही.