scorecardresearch

विश्लेषण: भारतामध्ये करोना रुग्णसंख्या का वाढू लागली आहे? पुन्हा निर्बंधांची गरज आहे का?

देशभरातून करोनासंबंधी निर्बंध हटवण्यात आल्यानंतर काही आठवड्यातच रुग्णसंख्येत आणि पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ

भारतामध्ये गेल्या आठवड्यात करोना रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळाली आहे

भारतामध्ये गेल्या आठवड्यात करोना रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २ हजार ५१४ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गेल्या सोमवारी म्हणजेच १८ एप्रिलला २ हजार १८३ रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्याच्या घडीला (२५ एप्रिल) १६ हजार ५२२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १८ एप्रिलला अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ होती.

आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १८ एप्रिलला ०.३२ टक्के असणारा पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी ०.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान या काळात चाचण्यांची संख्यादेखील वाढवण्यात आली होती. १८ एप्रिलला २ लाख ६ हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर २५ एप्रिलला ही संख्या तीन लाखांपर्यंत होती.

देशभरातून करोनासंबंधी निर्बंध हटवण्यात आल्यानंतर काही आठवड्यातच रुग्णसंख्येत आणि पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

भारतात करोना रुग्णसंख्येची वाढ नेमकी कुठे होत आहे?

देशात सध्या करोना रुग्णसंख्येत जी वाढ पहायला मिळत आहे त्यामध्ये दिल्ली आणि शेजारील राज्यं उत्तर प्रदेश आणि हरियाणा आघाडीवर आहेत. गेल्या २४ तासात (२५ एप्रिल) आढळलेल्या २ हजार ५४१ रुग्णांपैकी एकट्या दिल्लीतील एक हजार रुग्ण आहेत.

दिल्लीमध्ये मास्कसक्ती हटवण्यात आल्यानंतर दोन आठवड्यांनी एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली. रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा दिल्ली तसंच शेजारील राज्यं हरियाणामधील चार आणि उत्तर प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

विश्लेषण : भारत करोना मृत्यू दडवतोय? जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यावरून का सुरू आहे वाद?

दिल्लीत जानेवारीत वाढ दिसू लागल्यानंतर कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात वाढली आहे. फक्त गेल्या पाच दिवसात दिल्लीत एक हजार नवे रुग्ण आढळले आहेत.

रुग्णसंख्या कमी झाल्याने दिल्ली सरकारने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शाळा पुन्हा सुरु करत मास्कसक्ती हटवली होती. पण एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली आणि दोन आठवड्यात १०० वरुन एक हजारवर पोहोचली. पण याआधी दिल्लीत झालेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत ही वाढ तितकी नाही.

विश्लेषण: आयपीएलमध्ये करोना नियम काय आहेत? किती खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरु शकतो?

दिल्लीमध्ये फक्त गेल्या १६ दिवसांत रुग्णसंख्या १०० वरुन एक हजारवर पोहोचली आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारीमधील आकडेवारीशी तुलना केली तर फक्त १० दिवसांत इतकी वाढ झाली होती. डिसेंबर-जानेवारीमध्ये रुग्णसंख्या १२ दिवसांमध्ये दोन हजार आणि १५ दिवसांमध्ये पाच हजारांवर पोहोचली होती.

यानंतर फक्त एका दिवसात रुग्णसंख्या पाच हजारांवरुन थेट १० हजारांवर पोहोचली होती. पुढील आठ दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या २८ हजार ८६७ झाली होती.

ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे का?

भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर ललित कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लोकांनी मास्क काढल्यानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होणं अपेक्षित होतं. ही रुग्णसंख्या कमी जास्त होत राहणार आहे. मात्र गंभीर आजार आणि होणारे मृत्यू यासंबंधीची आकडेवारी जास्त महत्वाची आहे”.

विश्लेषण : चीनचे ‘झिरो कोविड’ धोरण फसले आहे का? काय कारणे असावीत?

दुसरीकडे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक नाही. लोकनायक आणि एम्ससारख्या रुग्णालयात मोजके रुग्ण दाखल झाले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, अनेक लोकांना ताप, खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे असा त्रास होत असून तीन ते पाच दिवसात बरे होत आहेत,

दरम्यान करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ पहायला मिळाली आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर गेल्या १४ दिवसात १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या १४ दिवसांमध्ये सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मृत्यू होणाऱ्यांमध्ये असुरक्षित गटात येणारे म्हणजेच व्याआधी असणारे आणि वयस्कर रुग्ण जास्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

त्यामुळे अद्याप चिंता करण्याचं कारण नाही. मात्र करोनासंबंधी जागरुक राहावं लागणार आहे.

निर्बंधांची गरज आहे का?

रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापनाने मास्क न घातल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आदेशाऐवजी आरोग्यसंबंधी शिक्षण देत मास्कसक्ती केली पाहिजे.

मास्कशिवाय इतर निर्बंध सध्याच्या घडीला लावण्याची गरज नसल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांनी म्हटलं आहे की, “आपण कधीपर्यंत मास्कसक्ती आणि इतर निर्बंध किती काळ लावू शकणार आहोत? सध्याच्या घडीला लोकांना संसर्ग झाला तरी आजार सौम्य आहे आणि त्यामुळे लॉकडाउन लावण्याची किंवा शाळा बंद करण्याची गरज नाही”.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why covid 19 cases are rising in india is there a need for more restrictions sgy

ताज्या बातम्या