दक्षिण कोरियाविरुद्ध उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्राझीलने ४-१ असा निर्भेळ विजय मिळवत या स्पर्धेतील आपली दावेदारी खणखणीत वाजवून दाखवली. या सामन्यात ३६व्या मिनिटालाच ब्राझीलने ४-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण कोरियाला प्रतिहल्ला करण्याची संधीच मिळाली नाही. प्रत्येक गोलनंतर ब्राझिलियन खेळाडूंचे विजयनृत्य आणि सामन्यानंतर विख्यात फुटबॉलपटू पेले यांना पाठिंबा व्यक्त करून ब्राझिलियन फुटबॉल संघाने जगभरातील फुटबॉलरसिकांची मने जिंकली. पेले सध्या गंभीर आजाराने ग्रस्त असून, त्यांच्या तब्येतीविरुद्ध उलट-सुलट बातम्या प्रसृत होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझिलियन फुटबॉल शैलीचा नजराणा…

हिरव्यागार मैदानावर पिवळ्याधमक जर्सी घालून सैराट पळणारे आणि गोलधडाका सादर करणारे ब्राझिलियन फुटबॉलपटू आजही जगभरातील फुटबॉलरसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरतात. मध्यंतरीच्या काळात ब्राझिलियन संघ विश्वचषक जिंकेनासा झाला, तरी हे आकर्षण कमी झालेले नाही. या प्रतिमेला साजेसा खेळ ब्राझीलच्या संघाने दक्षिण कोरियाच्या संघाविरुद्ध करून दाखवला. सहाव्या मिनिटालाच ब्राझीलचा गोलधडाका सुरू झाला. विनिशियस ज्युनियरने ब्राझीलचे खाते उघडले. त्यानंतर रिचर्लीसनला कोरियन पेनल्टी क्षेत्रात पाडल्याबद्दल ब्राझीलला पेनल्टी मिळाली. त्यावर नेयमारने गोल करत ब्राझीलला २-० असे आघाडीवर नेले. रिचर्लीसनने चेंडूवर सुरेख नियंत्रण मिळवत कोरियन पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारली आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पासवर ब्राझीलचा तिसरा गोल केला.

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?

कोरियन संघ सावरण्याच्या आत लुकास पाकेटाने ब्राझीलचा चौथा गोल केला. गटसाखळी टप्प्यात ब्राझीलचा बराचसा भर हा भक्कम बचावावर होता. सर्बिया, स्वित्झर्लंडविरुद्ध मिळवलेले विजय फारसे आकर्षक नव्हते. पण या सामन्यात चेंडूचा ताबा जास्तीत जास्त काळ स्वतःकडे ताबा ठेवत, आक्रमकांच्या लाटांवर लाटा प्रतिस्पर्धी संघाच्या हाफमध्ये धाडणे, प्रवाही आणि नेत्रदीपक फुटबॉल खेळणे ही खास ब्राझिलियन लक्षणे दिसून आली. दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे कॅमेरूनविरुद्ध या संघाचा पराभवच झाला. त्यामुळे या टप्प्यात ब्राझीलचा सुपरिचित खेळ दिसून आला नव्हता. तो दक्षिण कोरियाविरुद्ध दिसून आल्यामुळे ब्राझीलचे चाहतेही सुखावले आहेत.

‘सेलिब्रेशन डान्स’चे कारण काय?

या सामन्यात प्रत्येक गोलनंतर ब्राझिलियन खेळाडूंनी एकत्र येऊन खास शैलीत नृत्य केले. यांतील रिचर्लीसनच्या गोलनंतर केलेले कबुतर नृत्य किंवा ‘पिजन डान्स’ ब्राझीलमधील एका पॉप ग्रुपपासून प्रेरित असल्याचे रिचर्लीसन सांगतो. या नृत्यात ब्राझिलियन खेळाडूंनी प्रशिक्षक टिटे यांनाही सहभागी करून घेतले! बाकीचे नृत्यप्रकार ब्राझीलच्या सांबा संस्कृतीशी जवळीक सांगणारे होते. मैदानावर गोल करून अशा प्रकारे नृत्य सेलिब्रेशन केल्यामुळे या सामन्याला एखाद्या म्युझिक कन्सर्टचे स्वरूप प्राप्त झाले. प्रेक्षक अक्षरशः बेभान झाले. अशा प्रकारे सेलिब्रेशन ब्राझिलियन खेळाडूंनी का केले आणि उर्वरित स्पर्धेतही ते दिसून येईल का, हे पुरेसे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु ब्राझीलचे खेळाडू विशेषतः गोल झळकावल्यानंतर तो वेगळ्या प्रकारे साजरा करतात, हे यापूर्वीच्या स्पर्धांमध्येही दिसून आलेले आहे.

विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे?

रिचर्लीसन नवा तारा…

ब्राझील म्हणजे नेयमार असे समीकरण गेली काही वर्षे जमून गेले होते. परंतु हा ब्राझीलचा संघ निव्वळ नेयमारवर विसंबून नाही, हे या स्पर्धेत वारंवार दिसून येते आहे. या स्पर्धेत ब्राझीलचा आणखी एक फुटबॉलपटू रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचे नाव रिचर्लीसन. सर्बियाविरुद्ध ब्राझीलच्या सुरुवातीच्या सामन्यात दोन्ही गोल त्याने झळकावले. पण त्यांतील दुसरा खास ठरला. बायसिकल किक मारून केलेला हा गोल अजूनही या स्पर्धेतील सर्वोत्तम ठरतो. दक्षिण कोरियाविरुद्धही त्याने चेंडूचा ताबा डोक्याच्या आधारे घेत, एका कोरियन बचावपटूला चकवत त्याने मुसंडी मारली आणि अप्रतिम गोल झळकावला. इंग्लिश प्रिमियर लीग टॉटनहॅम हॉटस्परकडून खेळतो. रोनाल्डोसारखाच तोही निष्णात स्ट्रायकर आहे.

पेलेंना पाठिंबा दाखवण्याचे निमित्त काय?

जगातील सर्वाधिक परिचित फुटबॉलपटू पेले यांना मध्यंतरी कर्करोगाने ग्रासल्याचे वृत्त होते. त्यांच्या संपूर्ण शरीराला सूज आल्यामुळे अंतिम टप्प्यातील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती केल्याच्या बातम्यांनी फुटबॉल रसिक अस्वस्थ झाले. परंतु रुग्णालयातील बेडवर बसून ते ब्राझील-द. कोरिया सामना बघणार, असे त्यांच्या कुटुंबियांनी जाहीर केल्यामुळे जणू ब्राझिलियन संघात वेगळेच बळ संचारले. त्यामुळेच सामन्यानंतर पेलेंना शुभेच्छा देणारे बॅनर ब्राझीलच्या संघाने मैदानातून फिरवले. पेलेंना आता करोना झाल्याचेही वृत्त आहे. ब्राझीलच्या सुरुवातीच्या तीनही विश्वविजेत्या संघाकडून (१९५८, १९६२, १९७०) पेले खेळले. फुटबॉल इतिहासातील सर्वांत महान असे त्यांचे रास्त वर्णन केले जाते.

विश्लेषण : पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकात महिला क्रांती? जर्मनी-कोस्टारिका सामन्यात तीनही रेफरी महिला!

सहाव्या जगज्जेतेपदाच्या शोधात ब्राझील…

१९३० पासून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. या प्रत्येक स्पर्धेत सहभागी झालेला ब्राझील हा एकमेव देश. त्यांनी सर्वाधिक ५ वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे. परंतु २००२नंतर त्यांना तो जिंकता आलेला नाही. यावेळी त्यांच्यासमोर फ्रान्स आणि अर्जेंटिनाचे कडवे आव्हान आहे. परंतु ज्या प्रकारे त्यांनी कोरियाविरुद्ध खेळ केला, तो पाहता ब्राझीलही यंदा तगडे दावेदार ठरतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa football world cup 2022 brazil beats south korea supports pele print exp pmw
First published on: 06-12-2022 at 13:26 IST