रायगड जिल्ह्यातील कोर्लई जवळच्या समुद्रात रडारवर आढळून आलेल्या बोटीचे गूढ अखेर उकलले आहे. रडारवर आढळलेली ती बोट नसून तो पाकिस्तानी मासेमारी बोटीवरील जीपीएस प्रणाली असलेला एक बोया असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. मात्र घटनेमुळे कोकणातील सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एका चव्हाट्यावर आला आहे.

झाले काय?

मुरुड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यातील दीपगृहापासून सुमारे अडीच ते तीन सागरी मैल अंतरावर पाकिस्तानी मकदार ९९ नामक बोट संशयास्पद रित्या वावरत असल्याचा संदेश दिल्लीतील तटरक्षक दलाच्या मुख्यालयातून प्राप्त झाला. यानंतर रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. रायगड पोलीस, तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड, महसूल विभागाच्या यंत्रणानी थेरोंडा, कोर्लई परिसरात धाव घेतली. बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बोट कुठेच आढळून आली नाही. नौदल आणि तटरक्षक दलांची हेलिकॉप्टर पाठवली गेली. रायगडचा २१० किलोमीटरचा सागरी किनारा त्यांनी दोन ते तीन वेळा पालथा घातला. मात्र बोट काही आढळली नाही.

शोध मोहिमेनंतरचा निष्कर्ष काय?

पोलीस तसेच तटरक्षक दलाच्या गस्ती पथकांनी रडारवर दिसलेल्या बोटीच्या ठिकाणांची पाहणी केली. तेव्हा तपासणीनंतर ती बोट नसून जीपीएस प्रणाली असलेला मासेमारी जाळीला लावला जाणारा बोया असल्याचे निष्पन्न झाले. जीपीएस प्रणाली आणि एआयएस ट्रान्सपॉन्डर अससेला हा बोया, जाळी तुटून भरकटत भारतीय किनाऱ्यावर वाहून आला असावा असा निष्कर्ष काढला गेला. यापूर्वी ३ जानेवारी २०२५ रोजी गुजरात समुद्र किनाऱ्यावर अशीच घटना घडली होती. 

बोया म्हणजे काय?

बोया म्हणजे समुद्रात, जलाशयात, नदीत पाण्यावर तरंगणारी वस्तू अथवा चिन्ह, जी साधारणपणे धातू, प्लास्टिक अथवा फायबरपासून बनवलेली असते, या बोयांचा समुद्रात विविध कारणांसाठी वापर केला जातो. प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून, धोक्याची सूचना देण्यासाठी, सागरी सीमा दर्शवण्यासाठी, हवामान व सागरी हालचालींचा अभ्यास करण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि मासेमारी जाळ्यांसाठी या बोयांचा वापर केला जातो. मच्छीमार समुद्रात जाळी टाकून ठेवतात. काही दिवसांनी ही जाळी वर काढतात. जाळी टाकतांना ठिकाण लक्षात रहावे यासाठी जीपीएस प्रणाली आणि एआयएस ट्रान्सपॉन्डर बसवलेले असतात, ज्यामुळे मच्छिमारांना आपली जाळी नेमकी कुठल्या ठिकाणी टाकलेली आहे याची अचूक माहिती मिळू शकते.

यंत्रणांनी ही घटना गांभीर्याने का घेतली?

या घटनेमुळे सागरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पहलगाम दुर्घटना आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघितले गेले. घटनेची तात्काळ दखल घेऊन नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि मेरीटाईम बोर्ड आणि कस्टम्सच्या यंत्रणा सतर्क करण्यात आल्या, रात्रभर किनाऱ्याची कसून तपासणी करण्यात आली. सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले. सहाशेहून अधिक पोलिसांनी शोध मोहीम राबवून अलिबाग आणि मुरुड परिसरातील हॉटेल, लॉजेसची तपासणी केली. अठरा चेक नाके तयार करून वाहनांची तपासणी केली गेली. नौदल, तटरक्षक दलाच्या बोटींचा आणि हेलिकॉप्टरचा वापर केला गेला.

कोकणचा किनारा संवेदनशील का?

मुंबई जवळ असल्याने कोकणचा समुद्र किनारा हा कायमच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखला जातो. १९९३ च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी येथे उतरवली गेली होती. अजमल कसाबने केलेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हल्लेखोर सागरी मार्गानेच मुंबईत शिरले होते. या दोन्ही घटनांनंतर देशातील सागरी सुरक्षेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या होत्या. यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात तटरक्षक दलाच्या कायमस्वरूपी तळाची उभारणी केली गेली. तर कोकण किनारपट्टीवर ११ सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती केली गेली.

किनारे कितपत सुरक्षित?

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सागरी सुरक्षेसाठी गेल्या काही वर्षात व्यापक उपाययोजना केल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमुळे सागरी सुरक्षेतील त्रुटींचे निराकरण झाले नसल्याचे स्पष्ट आहे. २०२३ मध्ये रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर अमली पदार्थांची पाकिटे वाहून आल्याचे प्रकार दिसून आले होते. २०९ किलो वजनाची १७५ चरसची पाकिटे जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर वाहून आली. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, ही पाकिटे कुठून आणि कशी आली, कोणी टाकली, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेल नाही.  २०२२ मध्ये हरिहरेश्वर येथे एक परदेशी बोट बेवारस अवस्थेत भरकटून किनाऱ्याला लागली होती. या बोटीत, एका पेटीत अत्याधुनिक शस्त्रे आणि जिवंत काढतुसे आढळून आली होती. आता पाकिस्तानी बोटीचा बोया किनारपट्टीवर दाखल झाला.

सागरी सुरक्षेतील त्रुटी कोणत्या?

सागरी गस्तीसाठी रायगड पोलीसांना ९ गस्ती नौका देण्यात आल्या होत्या, ज्यापैकी ४ बोटीच कार्यरत आहेत. उर्वरित पाच वापराविना बंद आहेत. पावसाळ्यात या चार बोटीही बंद ठेवल्या जातात. दुसरीकडे किनाऱ्यावरील लॅन्डींग पॉईंट्सवर सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव आहे. समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक कार्यरत नसतात. या शिवाय कोकण किनारपट्टीवर नोंदणी न केलेल्या अनधिकृत मासेमारी बोटींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

harshad.kashalkar@expressindia.com