भारतीय संघातील माजी सहकारी गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत यांच्यात लिजंड्स लीग क्रिकेटच्या सामन्यादरम्यान मैदानावरच मोठा वाद उद्भवला. यावेळी गंभीरने आपल्याला ‘फिक्सर’ म्हटल्याचा आरोप श्रीसंतने केला आहे. श्रीसंत आणि गंभीर हे दोघे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला यात आश्चर्य वाटण्याचे तसे कारण नाही. मात्र, तो इतका टोकाला का गेला आणि यापूर्वी हे दोघे कोणत्या वादांमध्ये अडकले होते याचा आढावा.
लिजंड्स लीगच्या सामन्यादरम्यान नक्की काय घडले?
लिजंड्स लीग क्रिकेटमध्ये बुधवारी (६ डिसेंबर) ‘एलिमिनेटर’चा सामना झाला, ज्यात गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडियन कॅपिटल्स आणि श्रीसंतचा समावेश असलेला गुजरात जायंट्स हे संघ समोरासमोर आले. या सामन्यातील दुसरे षटक वेगवान गोलंदाज श्रीसंतने टाकले. या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर डावखुऱ्या गंभीरने अनुक्रमे षटकार आणि चौकार मारला. मग श्रीसंतने निर्धाव चेंडू टाकल्यानंतर गंभीरकडे रागाने बघितले आणि इथेच वादाला सुरुवात झाली. हे षटक संपल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वेळी अन्य खेळाडू आणि पंचांना मध्यस्ती करून या दोघांना एकमेकांपासून दूर करावे लागले.
श्रीसंतने गंभीरवर काय आरोप केले?
गंभीरला राग यावा असे आपण काहीही म्हटले नाही, पण त्याने आपल्याला ‘फिक्सर’ म्हणून हिणवल्याचा आरोप सामन्यानंतर श्रीसंतने केला. त्याने बुधवार आणि गुरुवारी ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’ करत आपली बाजू मांडली. ‘‘गंभीरने मला ‘फिक्सर, फिक्सर’ म्हणून हिणवले. पंचांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही त्याने सुनावले. मी एकही अपशब्द वापरला नाही. तुम्ही (चाहत्यांनी) सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्याने अनेकांना अशा प्रकारची वागणूक दिली आहे. तो मला असे का बोलला हे ठाऊक नाही, पण हे सगळे षटकाच्या समाप्तीनंतर सुरू झाले.
हेही वाचा… विश्लेषण: दर एक हजारांमागे अवघ्या १.३ रुग्णखाटा, ०.९ डॉक्टर… देशातील आरोग्य व्यवस्थाच रुग्णशय्येवर?
गंभीरला समर्थन करणारे लोक तो ‘सिक्सर, सिक्सर’ बोलला असे म्हणत आहेत. मात्र, त्याने मला फिक्सर म्हणून संबोधले हे सत्य आहे. त्याने जे केले, ते अत्यंत चुकीचे होते,’’ असा दावा श्रीसंतने केला. तसेच त्याने गंभीरला ‘मिस्टर फायटर’ (भांडखोर) असेही संबोधले.
गंभीरने काय प्रत्युत्तर दिले?
श्रीसंतच्या ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’नंतर भाजपचा खासदार असलेल्या गंभीरने ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) आपले हसतानाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि त्याखाली ‘जग जेव्हा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा केवळ हसा,’ असे लिहिले.
लिजंड्स लीगच्या व्यवस्थापनाची भूमिका काय?
श्रीसंतने गंभीरवर केलेल्या आरोपांची अंतर्गत चौकशी केली जाणार आहे. हे आरोप खरे असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे लिजंड्स लीग क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी स्पष्ट केले. ‘‘लिजंड्स लीग क्रिकेटशी करारबद्ध असलेल्या सर्व खेळाडूंना नियम पाळावेच लागणार आहेत. कोणत्याही खेळाडूने नियमांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास आचारसंहितेनुसार आवश्यक कारवाई केली जाईल,’’ असे रहेजा म्हणाले.
गंभीरने श्रीसंतला ‘फिक्सर’ म्हटले असेल तर का?
श्रीसंतच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास गंभीरने २०१३च्या ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणाचा आधार घेत ‘फिक्सर’ हा शब्द वापरला. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या २०१३च्या हंगामात श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर ‘स्पॉट फिक्सिंग’चे आरोप लावण्यात आले होते. त्या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात श्रीसंतने आपल्या पॅण्टला टॉवेल लावला होता. आपण हे षटक ‘फिक्स’ केल्याची ही बुकींसाठी खुण होती असे पोलिसांचे म्हणणे होते. श्रीसंतने या षटकात १३ धावा खर्ची केल्या होत्या. त्या आधीच्या षटकात त्याने पॅण्टला टॉवेल लावला नव्हता. हे प्रकरण समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. मात्र, २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील ही बंदी केवळ सात वर्षांची केली. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, तो भारतीय संघ किंवा ‘आयपीएल’मध्ये संधी मिळण्याइतपत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने गेल्या वर्षी (२०२२) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच तो निवृत्त क्रिकेटपटूंच्या स्पर्धांमध्ये खेळत आहे.
श्रीसंत आणखी कोणत्या वादांमध्ये अडकला होता?
श्रीसंत आणि वाद हे एक समीकरणच आहे. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा अन्य गोष्टींसाठीच तो अधिक चर्चेत राहिला आहे. ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणातील सहभागामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. यासह ‘आयपीएल’मधील एका सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशिलात मारली होती आणि हे प्रकरणही खूप गाजले होते. श्रीसंतला त्या वेळी अश्रू अनावर झाले होते. तसेच त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला धक्का मारला होता, तर केव्हिन पीटरसनला जाणूनबूजून ‘बिमर’ (डोक्याच्या दिशेने टाकलेले फुल टॉस चेंडू) टाकला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथवर वैयक्तिक टिप्पणी केली होती. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आंद्रे नेल आणि श्रीसंत यांच्यातही वाद झाला होता. नेलच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर श्रीसंतने नाचत जल्लोष करत त्याला डिवचले होते.
गंभीरचा वादांचा इतिहास काय?
गंभीर स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक वृत्तीसाठी ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनीबाबत त्याने केलेली विधाने अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहेत. तसेच याच वर्षी गंभीर आणि विराट कोहली यांच्यात ‘आयपीएल’ सामन्यानंतर शाब्दिक चकमक झाली होती. कोहली बंगळूरु संघाचे प्रतिनिधित्व करत होता, तर गंभीर लखनऊ संघाच्या प्रेरकाची भूमिका बजावत होता. सुरुवातीला कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात वाद झाला. कोहली आणि काएल मेयर्स यांच्यातही चकमक झाली होती. त्यानंतर गंभीरने या वादात उडी घेतल्याने त्याच्यात आणि कोहलीमध्ये जुंपली होती. तसेच २०१३मध्ये गंभीर कोलकाता नाइट रायर्डसचा कर्णधार असतानाही त्याच्यात आणि कोहलीमध्ये वाद झाला होता. त्यापूर्वी भारताचे प्रतिनिधित्व करत असताना गंभीरचा पाकिस्तानचे माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि कमरान अकमल यांच्याबरोबरही वाद रंगला होता.