सोन्याच्या किंमतींमध्ये झपाट्याने झालेली वाढ, वाढता भूराजकीय तणाव, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी आणि आयात शुल्काशी संबंधित अनिश्चितता या सगळ्या घटकांमुळे गुंतवणूकदारांचा कल गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्सकडे (ETFs) वाढला आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात या मालमत्तेतील गुंतवणूक सहापट वाढून विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराची कमकुवत कामगिरी पाहता, सोनं आता अधिक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे. त्यामुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीचा ओघ सतत वाढताना दिसतो आहे.
भारतीय म्युच्युअल फंड संघटनेने (AMFI) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गोल्ड ETF मधील गुंतवणूक २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात तब्बल ५७८.२८ टक्क्यांनी म्हणजेच सुमारे सहापट वाढून ₹८,३६३.१३ कोटींवर पोहोचली आहे, हा दर मागील वर्षी याच कालावधीत केवळ ₹१,२३२.९९ कोटी होता.
गोल्ड ETF म्हणजे काय?
गोल्ड ETF (Gold Exchange Traded Fund) म्हणजे अशी गुंतवणूक (investment instrument) ज्यात सोनं हे मूलभूत मालमत्ता (underlying asset) असते. यात गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची गरज नसते. गुंतवणूकदार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (demat form) सोन्याचे मालक होतात. हे गोल्ड ETF शेअर बाजारात सूचीबद्ध (listed) असतात आणि शेअर्सप्रमाणेच त्याची खरेदी-विक्री करता येते. पारंपरिक सोन्याच्या विक्रीच्या तुलनेत हा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ पर्याय मानला जातो. कारण यात चोरीचा धोका नसतो आणि शुद्धतेबद्दल शंका राहत नाही आणि किंमती जागतिक बाजाराशी सुसंगत असतात.
गोल्ड ETF चे चार फायदे
ICRA Analytics चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मार्केट डेटा प्रमुख अश्विनी कुमार सांगतात, “वाढते भूराजकीय तणाव, जागतिक अनिश्चितता आणि बदलता आर्थिक दृष्टिकोन यामुळे सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक साधन’ (safe-haven asset) म्हणून अधिक आकर्षक ठरत आहे. गुंतवणूकदारांना तरलता (liquidity), पारदर्शकता (transparency), कमी खर्च (cost-effectiveness) आणि व्यापार सुलभता (ease of trading) यांसारख्या फायद्यांमुळे भौतिक सोन्यापेक्षा गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत आहे.”
सोयीस्कर गुंतवणूक
या गोल्ड ETF वर मिळणाऱ्या आकर्षक परताव्यांच्या दरामुळे (rate of returns) गुंतवणूकदारांचा त्याकडे असलेला ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ज्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वेगळेपण (portfolio diversification) आणायचे आहे, चलनफुगवट्यापासून संरक्षण (inflation protection) हवे आहे आणि कर-बचतीच्या (tax-efficient) पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा अत्यंत आकर्षक आणि सोयीस्कर गुंतवणुकीचा पर्याय ठरतो.
गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीची लाट
जागतिक घटक जसे की, मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी, भूराजकीय तणाव आणि अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षा यांमुळे सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान (safe-haven asset) म्हणून उदयास आले आहे. याच कारणामुळे अलीकडच्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत आणि ९९९ शुद्धतेचं १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,२५,००० पेक्षा अधिक झाला आहे.
शेअर बाजाराच्या कमकुवत कामगिरीचा परिणाम
खालील आकडेवारीतून दिसते की, सप्टेंबर 2025 मध्ये नेट इनफ्लो (Net Inflows) आणि नेट एयूएम (Net AUM) या दोन्हीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही वाढ जवळपास सहापटींपेक्षा अधिकची आहे.

Quantum AMC चे मुख्य गुंतवणूक अधिकारी चिराग मेहता सांगतात, “पूर्वी गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे प्रमाण खूपच कमी होते. परंतु आता वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आणि सोन्याच्या चांगल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोने समाविष्ट करत आहेत. त्यामुळेच गोल्ड ETF मध्ये मोठ्या प्रमाणात निधी येताना दिसत आहे.”
कर स्पष्टतेचा फायदा
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये दिलेल्या कर विषयक स्पष्टतेमुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढला आहे. पूर्वी गोल्ड ETF वर कर आकारणी व्यक्तीच्या कर श्रेणीप्रमाणे केली जात होती. मात्र, आता स्पष्ट करण्यात आले आहे की, १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या गोल्ड ETF वर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर लावला जाईल. या स्पष्टतेमुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणं गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरलं आहे.
भविष्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन
विश्लेषकांचे मत आहे की, अमेरिकन डॉलर कमकुवत होणे, सततचा भूराजकीय तणाव, शुल्कावरील अनिश्चितता आणि जागतिक बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी हे घटक पुढेही गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीला चालना देतील. एका बाजारतज्ज्ञाने सांगितले की, “सोन्यावर आणि गोल्ड ETF वर मध्यम कालावधीत सकारात्मक (bullish) दृष्टीकोन ठेवण्याचे ठोस कारण आहे.”