Gold Rate In India: सोने हा मौल्यवान धातू अलीकडे खूपच महाग झाला आहे. भारतात एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव अलीकडेच १ लाख रुपयांवर पोहोचला. हा भाव वाढण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लावलेले जादा आयात शुल्क, व्यापारयुद्धाचा धोका, आंतरराष्ट्रीय तणाव आणि त्यामुळे वाढलेली महागाई तसेच या साऱ्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम ही मुख्य कारणे आहेत.

बाजारात अनिश्चितता आणि जोखीम वाढली की, गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतो.

२०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याने ३१% परतावा दिला आहे. जो शेअर आणि रोख्यांपेक्षा खूप जास्त आहे (११ ऑगस्ट २०२५ पर्यंत). दुसरीकडे, शुल्काच्या अनिश्चिततेमुळे कंपन्यांची कमाई कमी होऊन शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे. हा ताण वाढत राहिला तर सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. शिवाय, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह (केंद्रीय बँक) ट्रम्प यांच्या दबावाखाली व्याजदर कमी करत असेल, तर सोन्याला आणखी फायदा होईल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

ट्रम्प धोरण आणि अनिश्चितता

अनेक देशांच्या केंद्रीय बँका आपला परकीय चलनसाठा (foreign reserves) सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकन डॉलर वापरतात. कारण डॉलर हे जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासार्ह मानलं गेलेलं चलन आहे. तेच अलीकडे कमकुवत झाल्यामुळे केंद्रीय बँका जास्त प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. त्यामागची मुख्य कारणं म्हणजे वाढलेले कर, जागतिक राजकीय तणाव, महागाई, काही देशांवरील जास्त कर्ज आणि जागतिक मंदीची असलेली शक्यता. २०२४ मध्ये बँकांनी १,०५४ टन सोने खरेदी केले होते आणि या वर्षीही सुमारे १,००० टन सोने खरेदी होईल अशी अपेक्षा आहे. सलग चौथ्या वर्षी होत असलेली ही खरेदी सोन्याच्या भावाला आणखी उभारी देणारी आहे.

गुंतवणुकीतही सोन्याचे महत्त्व

२०१५, २०१६, २०१८ आणि २०२२ या वर्षी शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली नाही. त्या वेळीही सोन्याने गुंतवणूकदारांना तोटा होऊ दिला नाही आणि त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य टिकवून ठेवले. कोविड-१९ नंतर, रशिया-युक्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील तंटा आणि अलीकडे ट्रम्प यांनी लावलेले मोठे आयातशुल्क यामुळे पुन्हा सोन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटलं आहे की, पुढे आपल्याला ‘स्टॅगफ्लेशन’चा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच अर्थव्यवस्था मंदावेल, महागाई वाढेल आणि बेरोजगारीही वाढेल. अशा वेळी सोन्याचे दर साधारणपणे वर जातात. स्टॅगफ्लेशनच्या काळात सोन्याचं वर्चस्व स्पष्ट दिसतं.

सहज विक्रीयोग्य संपत्तीचं साधन

अलीकडे अमेरिकन डॉलर मजबूत झालेला असला तरी सोन्यावरील विश्वास कमी झालेला नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे सोने ही खरी मालमत्ता आहे. म्हणजेच त्यात कर्ज किंवा दुसऱ्या पक्षाची जोखीम नसते. हे उच्च दर्जाचं आणि सहज विक्रीयोग्य संपत्तीचं साधन आहे, ज्यात शेअर बाजाराच्या तुलनेत कमी चढ-उतार होतात.

दुसरीकडे, जागतिक आर्थिक जोखमींमुळे शेअर बाजाराचा मार्ग कठीण दिसतोय. कंपन्यांच्या कमाईवर होणारा परिणाम आणि वाढत्या किमतींबद्दलच्या चिंता यामुळे सोन्याच्या तुलनेत शेअर्सची स्थिती कमकुवत आहे. पण सोन्याचे भविष्य या अनिश्चित काळात उज्ज्वल दिसते आहे, असा तज्ज्ञांचा कयास आहे. थोडक्यात, सोन्याचे भाव वाढताना काही गुंतवणूकदार नफा काढून घेऊ शकतात किंवा जास्त भावामुळे काहीजण नवीन गुंतवणूक टाळू शकतात. तरीही, सध्याची जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता, सोन्यातच जास्त फायदा होणार आहे. एकूणच पाहता, सध्याची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती सोन्याच्या बाजूनेच आहे, असे गुंतवणूक विश्लेषकांना वाटते.

सोन्यात गुंतवणूक?

सोन्याने दीर्घकाळात चांगली वाढ दाखवली आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत सोन्याला जागा देणं आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत सोन्याने सुमारे १५% वार्षिक परतावा दिला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून पाहिलं, तर सोन्याने जवळपास ९.४% वार्षिक परतावा दिला आहे (११ ऑगस्ट २०२५ पर्यंतचे आकडे). म्हणूनच गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमधील साधारण १० ते १५% हिस्सा सोन्यात दीर्घकालीन (५ ते १० वर्षे) गुंतवणुकीस योग्य ठरेल, असे द फायनान्शियल एक्स्प्रेसच्या विश्लेषणात म्हटले आहे.

सोन्यात कशी गुंतवणूक करावी?

  • सोन्यात गुंतवणूक करताना योग्य पद्धत निवडणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी गोल्ड ईटीएफ (Exchange Traded Funds) किंवा गोल्ड सेव्हिंग्स फंड्स (म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड्स) हे चांगले पर्याय मानले जातात.
  • गोल्ड ईटीएफ हे थेट सोन्यात गुंतवणूक करतात आणि त्याचे व्यवस्थापन आपोआप (passively) केले जाते.
  • तुम्ही घेतलेले गोल्ड ईटीएफ युनिट्स हे 0.995 शुद्धतेच्या प्रत्यक्ष सोन्याने सुरक्षित (backed) असतात.
  • १ युनिट गोल्ड ईटीएफ = १ ग्रॅम सोनं.
  • सोन्याचा भाव वाढला तर गोल्ड ईटीएफची किंमत (NAV) वाढते आणि भाव कमी झाला तर NAV देखील घटते.
  • जर तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असेल, तर गोल्ड ईटीएफ हा नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे.

डिमॅट अकाऊंट नसेल तर?

तुमच्याकडे डिमॅट अकाऊंट नसेल आणि तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करायची असेल, तर गोल्ड सेव्हिंग्स फंड्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे फंड्स प्रत्यक्षात फंड ऑफ फंड स्कीम प्रमाणे काम करतात. म्हणजेच ते थेट सोने खरेदी न करता, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात.

त्यामुळे गोल्ड सेव्हिंग्स फंडचं पोर्टफोलिओ = गोल्ड ईटीएफचं पोर्टफोलिओ असतं.

करप्रणाली (Taxation)

  • तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडमधून नफा कमावला आणि पैसे परत घेतले (redemption), तर त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.
  • शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG): कमी कालावधीसाठी गुंतवणूक ठेवल्यास होणारा नफा.
  • लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG): जास्त कालावधीसाठी गुंतवणूक ठेवल्यास होणारा नफा.
  • या दोन्ही प्रकारच्या नफ्यावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार (म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या पातळीप्रमाणे) कर आकारला जातो.

सोनं केवळ दागिना किंवा परंपरेचा भाग नाही, तर ते दीर्घकालीन सुरक्षिततेचं आणि मूल्य टिकवून ठेवण्याचं साधन आहे. जागतिक राजकीय तणाव, महागाई किंवा आर्थिक मंदी अशा कोणत्याही परिस्थितीत सोनं गुंतवणूकदारांसाठी नेहमीच सुरक्षित आसरा ठरलं आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

  • “सोन्याचे दर सध्या अत्यंत उंच पातळीवर आहेत. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की, सोनं अनिश्चिततेपासून संरक्षण (hedge) देतं, परंतु त्वरित परतावा देईलच याची हमी नाही.”- मयांक मिश्रा (Mayank Misra) प्रॉडक्ट विभाग, INDmoney (NDTV.com)
  • “केंद्रीय बँका आणि ETF गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने, भाव विक्रमी पातळीवर असतानाही सोन्याचे दर उच्चच राहतील.”- वंदना भारती (Vandana Bharti) हेड, कमॉडिटी रिसर्च; SMC Global Securities (Moneycontrol)
  • “सोन्याचे दर काही काळापासून वाढत आहेत आणि अजून काही काळ वाढत राहतील. सध्या नफा काढून घेण्याचा काळ नाही.”- श्रीधरन एस (Sridharan S) संस्थापक; Wealth Ladder Direct (LiveMint)
  • “उच्च दरावर खरेदी करून अल्पकालीन नफा मिळवण्याची अपेक्षा ठेवणे ही कठीण आणि जोखमीची रणनीती आहे.” डॅरेल फ्लेचर (Darrell Fletcher) मॅनेजिंग डायरेक्टर; Bannockburn Capital Markets (The Economic Times).
  • “सोनं हे एकटं गुंतवणुकीचं साधन नसून, संतुलित (balanced) पोर्टफोलिओचा भाग म्हणून ठेवले तर ते अधिक परिणामकारक ठरते.”
    स्वप्निल अग्रवाल (Swapnil Aggarwal) संचालक; VSRK Capital (LiveMint)