PM Modi to launch revamped manuscripts mission: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात विद्यमान राष्ट्रीय पांडुलिपी (हस्तलिखिते) मिशनसाठीच्या (National Manuscripts Mission – NMM) अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ यंदा करण्यात आली. पूर्वी या मिशनसाठी ३.५ कोटी मंजूर करण्यात आले होते. आता त्यात वाढ करून ६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुधारित राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा आरंभ ९ जून रोजी करणार आहेत. ‘ज्ञान भारतम् मिशन’ या नावाने हे मिशन ओळखले जाणार असून, यामार्फत देशातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खासगी संग्राहकांकडे असलेल्या एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि जतन करण्याचा हेतू आहे. २००३ साली या मिशनची स्थापना करण्यात आली होती. सध्या, राष्ट्रीय पांडुलिपी मिशन ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स’ ((हस्तलिखिते) IGNCA) या संस्थेचा एक भाग आहे.
आजतागायत राष्ट्रीय पांडुलिपी मिशनने (NMM) सुमारे ५२ लाख हस्तलिखितांचा मेटाडेटा तयार केला आहे. त्यापैकी केवळ एकतृतीयांशच (सुमारे १.३० लाख) हस्तलिखितं ऑनलाइन अपलोड करण्यात आली आहेत. त्याहीपैकी फक्त ७०,००० हस्तलिखितं सार्वजनिकरित्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती NMM च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिल्याचे ‘द हिंदू’च्या वृत्तात म्हटले आहे.
खासगी हस्तलिखित मालकांना त्यांच्या संग्रहातील हस्तलिखितं सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतंही विशेष प्रोत्साहन दिलं जात नाही. भारतातील सुमारे ८०% हस्तलिखितं ही खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहेत. गेल्या २१ वर्षांत NMM ने सुमारे ९ कोटी फोलिओंचं (पानांचं) प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक संवर्धन केल्याची माहितीही संस्थेने दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या हस्तलिखितांच्या डिजिटल दस्तऐवजीकरणासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात विद्यमान राष्ट्रीय पांडुलिपी मिशनसाठी अधिकचा निधी मंजूर करण्यात आला.
पांडुलिपी (हस्तलिखितं) म्हणजे भूतकाळाशी नातं जपणं (ENGAGING WITH THE PAST)
पांडुलिपी हा शब्द हिंदी भाषेत हस्तलिखितांसाठी वापरला जातो. हस्तलिखितांसाठी मातृकाग्रंथ हाही शब्द प्रचलित होता. हस्तलिखित म्हणजे एक किंवा अधिक व्यक्तींनी हाताने लिहिलेले दस्तऐवज. हस्तलिखितांचा मुख्य उद्देश भारतीय ज्ञानाची प्राचीन परंपरा जतन करणे आहे. भारतीय हस्तलिखितांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. सातव्या शतकात चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग भारतातून शेकडो हस्तलिखितं मायदेशी घेऊन गेला होता. इतकंच नाही तर १८ व्या शतकात अवधच्या नवाबाने इंग्लंडच्या जॉर्ज तिसऱ्याला चित्रलिपी असलेलं ‘पदशाहनामा’ हे हस्तलिखित भेट दिलं होतं. आज हे हस्तलिखित इंग्लंडच्या रॉयल कलेक्शनचा भाग आहे. हस्तलिखितांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्रसिद्ध ग्रंथ ताडपत्र, भोजपत्रावर आढळतात. ताडपत्राचा उपयोग दक्षिण भारतात आढळून येतो. समुद्रकिनाऱ्यावर तालवृक्ष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा उपयोग हस्तलिखितांसाठी करण्यात आला. भूर्जपत्राचा उपयोग उत्तरेकडे झाल्याचे आढळते. सिकंदराच्या स्वारीबरोबर आलेल्या कर्टिअस याने भारतीय लोक भूर्जपत्रांचा लेखनासाठी उपयोग करत असल्याचे नमूद केले आहे.
हस्तलिखितांचं प्रारंभीचं वर्गीकरण (THE EARLY PHASE OF CATALOGUING)
इंग्रजांनी भारतावर राज्य केलं असलं तरी भारतीय संस्कृती, इतिहास आणि त्याविषयी माहिती देणारे पुरावे संभाळण्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. १८०३ साली भारतीय प्राचीन ग्रंथ संपदेची यादी आणि त्या ग्रंथांचा सारांश तयार करावा, असा प्रस्ताव एशियाटिक सोसायटीसमोर ठेवण्यात आला होता. या संस्थेचे चौथे अध्यक्ष एच. टी. कोलब्रुक यांनी सरकारकडे वार्षिक पाच ते सहा हजार रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचीही मागणी केली होती. संस्कृत कॉलेज, तीन प्रेसीडेंसींतील विद्यापीठं आणि ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट्स यांसारख्या संस्थांची उभारणी याच काळात सुरु झाली.
न्यू कॅटलॉगस कॅटलॉगोरम (NEW CATALOGUS CATALOGORUM)
दरम्यान, युरोपियन प्राच्यविद्या अभ्यासकांनी हस्तलिखितांवर आधारित अनेक महत्त्वाचे प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांचे अनुवाद केले. १८४९ साली एफ. मॅक्सम्युलर यांनी केलेला ऋग्वेदाचा अनुवाद एक महत्त्वाचा टप्पा होता. तसेच १८९१ ते १९०३ या काळात थियोडोर ऑफ्रेक्ट यांनी प्रचंड व्यक्तिगत मेहनत आणि खर्च करून संस्कृत हस्तलिखितांचं ‘कॅटलॉगस कॅटलॉगोरम’ (कॅटलॉगची यादी) प्रकाशित केलं. म्हैसूर इन्स्टिट्यूटचे ग्रंथपाल आर. शामा शास्त्री यांनी पुढे १९३७ साली मद्रास विद्यापीठातून New Catalogus Catalogorum प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली होती आणि ते ‘भ’ अक्षरापर्यंत पोहोचले होते. मात्र १४ व्या खंडांनंतर हा प्रकल्प थांबवण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या बौद्धिक वारशाची जाण होती. त्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन भारतातील सर्वात जुन्या, सहाव्या शतकातील गिलगिट हस्तलिखितं काश्मीरहून दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात आणण्यासाठी प्रयत्न केले.
राष्ट्रीय पांडुलिपी मिशन (The National Mission for Manuscripts)
भारत सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने २००३ साली राष्ट्रीय पांडुलिपी मिशन (National Mission for Manuscripts) सुरू केलं. या मिशनचा उद्देश देशभरातील हस्तलिखितांचा शोध घेणे, नोंद करणे, संवर्धन करणे आणि त्यातील ज्ञान प्रसारित करणे हा होता. हा एक अद्वितीय प्रकल्प असून यामार्फत भारतातील असंख्य हस्तलिखितांचं जतन करणं हा मुख्य हेतू आहे. या हस्तलिखितांमध्ये विविध विषय, लेखनशैली, भाषांतरित सामग्री, सुलेखन, चित्रलिपी आणि कलाकृती यांचा समावेश आहे. एकत्रितपणे या हस्तलिखिते भारताच्या इतिहास, परंपरा आणि विचारसरणीची स्मृती जपतात. New Catalogus Catalogorum या प्रकल्पाला २००३ साली मद्रास विद्यापीठाच्या माध्यमातून नव्याने सुरुवात झाली होती. आजपर्यंत या मालिकेचे ३६ खंड प्रकाशित झाले आहेत.
मिशनची कार्यप्रणाली (Working Model of the Mission)
Manuscript Resource Centres (MRCs) आणि Manuscript Conservation Centres (MCCs) यांच्या माध्यमातून मिशनने देशभरातील शैक्षणिक संस्था, ग्रंथालयं, मंदिरे, मठ, मदरसे, बौद्ध विहारं आणि खासगी संग्रहांकडून पांडुलिपींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केलं आहे.
हस्तलिखितं ही केवळ अक्षरांची मांडणी नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक स्मृतीची साक्ष आहेत. ‘ज्ञान भारतम् मिशन’च्या माध्यमातून केंद्र सरकार भारतातील ज्ञानसंपत्तीचं जतन, संवर्धन आणि प्रसारण करण्याचा व्यापक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ जून रोजी सुरू होणाऱ्या या सुधारित राष्ट्रीय पांडुलिपी मिशनमुळे देशभरात विखुरलेल्या लाखो हस्तलिखितांचा शोध घेण्याची, त्यांचं डिजिटायझेशन करण्याची आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्याची दिशा ठरणार आहे.
ही केवळ एक सांस्कृतिक मोहीम नसून ती भारताच्या बौद्धिक परंपरेला जागतिक स्तरावर पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याची तयारी आहे. हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेचा गाभा असलेल्या या हस्तलिखितांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा उजाळा देण्याचं ऐतिहासिक कार्य आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत आहे.