Haryana Nuh Violence : हरियाणातील नूह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै) दोन गटांत सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन हिंसाचार भडकला. या हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या घटनेवर बोलताना म्हणाले, “नूह जिल्ह्यात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. सर्व लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन मी करतो. जे दोषी आहेत, त्यांना बिलकूल सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल”. हिंसाचार उसळल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राम व फरिदाबाद येथील शाळा आणि महाविद्यालयांना १ ऑगस्ट रोजी सुट्टी देम्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुरुग्राम व नूह या जिल्ह्यांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

हा हिंसाचार उफाळण्याचे नेमके कारण काय? तसेच हिंसाचारामागे मोनू मानेसर नावाची व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती कोण आहे? हिंसाचारात त्याचा सहभाग होता का? याबद्दलची माहिती ‘फर्स्टपोस्ट’ने त्यांच्या लेखात दिली आहे.

नूह जिल्ह्यात सोमवारी काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी ‘ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा’ काढण्यात आली होती. गुरुग्राममधील सिव्हिल लाइन्स येथून भाजपाच्या जिल्हाध्यक्ष गार्गी कक्कर यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखविला होता. नूह जिल्ह्यात ज्या ठिकाणाहून यात्रा जात होती, तिथे काही जमावाने यात्रेवर हल्ला केला आणि यात्रेतील लोकांवर दगडफेक केली. यात्रेवर अचानक हल्ला झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यात्रेच्या मिरवणुकीत सहभागी असलेल्या लोकांनीही मागे हटण्यास नकार देत हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सांप्रदायिक संघर्ष सुरू झाला. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, अनेक खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना हिंसाचारात भस्मसात करण्यात आले.

अचानक उसळलेल्या हिंसाचारातून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकांनी नूह येथील शिव मंदिरात आसरा घेतला. पोलिसांनी या ठिकाणाहून जवळपास अडीच हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढले; ज्यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

हिंसाचारामध्ये बंदुकीचाही वापर करण्यात आला; ज्यामुळे दोन होमगार्ड जवानांसह तीन लोकांचा मृत्यू झाला. गुरुग्रामच्या पोलिस आयुक्त कला रामचंद्रन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गुरुग्राममधील दोन होमगार्ड जवानांचा नूहमधील हिंसाचारात मृत्यू झाला आहे: तर एकूण १० पोलिस जवान जखमी झाले आहेत. आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बंदुकीची गोळी लागून दोन होमगार्डचा मृत्यू झाला. एकाचे नाव नीरज; तर दुसऱ्याचे नाव गुरुसेवक होते. इतर आठ जखमी पोलिसांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. होडलचे पोलिस उपअधीक्षक सज्जन सिंह यांच्या डोक्यात; तर दुसऱ्या एका पोलिस निरीक्षकाच्या पोटात गोळी लागली असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाची अधिकची कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली असून, कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आवाहन केले की, सर्वच नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. तसेच ‘हरियाणा एक, हरियाणवी एक’ या तत्त्वाला जागून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याकडे भर द्यावा. नूहमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाची समाजाप्रति असलेली जबाबदारी आणखी वाढली असल्याचेही ते म्हणाले.

मोनू मानेसर कोण आहे?; त्याचा हिंसाचारात सहभाग कसा?

मिळालेल्या माहितीनुसार, या मिरवणुकीच्या आयोजनात बजरंग दलाचा कार्यकर्ता व गोरक्षक मोनू मानेसरचाही सहभाग होता आणि त्याच्यामुळे हिंसाचार भडकला, असा एक तर्क काढण्यात येत आहे. मोनू मानेसरचे खरे नाव मोहित यादव, असे आहे. तो स्वतः गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगतो. २०११ साली त्याने बजरंग दलात प्रवेश केला होता. मानेसर परिसरात मजुरांना खोल्या भाड्याने देऊन, त्याचा उदरनिर्वाह चालतो.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तो म्हणाला, “मी गाई-गुरांच्या अवतीभोवती लहानाचा मोठा झालो. गोमातेशी माझी आस्था जोडलेली आहे आणि त्यांचे रक्षण करणे माझा धर्म आहे. गाईंवरील अत्याचाराच्या बातम्या जेव्हा माझ्या कानावर येऊ लागल्या, तेव्हा मी त्यांच्या रक्षणासाठी काम करण्याचे ठरविले. नूह आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अवैधरीत्या होत असलेली गुरांची वाहतूक, तस्करी मी रोखली आहे.” याच महिन्यात मोनूची नियुक्ती जिल्हा गोरक्षक दलाच्या प्रमुखपदी करण्यात आली. मानेसर जिल्ह्याच्या नागरी संरक्षण पथकाचाही तो सदस्य आहे. तसेच ‘मोनू मानेसर बजरंग दल’ या नावाने त्याचे यूट्युबवर एक चॅनेलही आहे; ज्याचे दोन लाख सबस्क्रायबर आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये मोनू मानेसरचे नाव देशातील सर्व माध्यमांमध्ये झळकले होते. जुनैद व नासीर या दोन मुस्लिम युवकांचे अपहरण करून, त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मोनू प्रमुख आरोपींपैकी एक होता. हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यामध्ये जळालेल्या वाहनात जुनैद व नासीर यांचे मृतदेह आढळून आले होते. मानेसरने त्याच्यावर झालेले आरोप निराधार असल्याचे सांगून, या प्रकरणांशी संबंध नसल्याचे सांगितले.

वारिस खान या २२ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातही मानेसरचा सहभाग असल्याची तक्रार नूह पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये गुरुग्राम सेक्टर १२ येथे मानेसरने मुस्लिम समुदायाविरोधात चिथावणीखोर घोषणाबाजी केली होती, अशी बातमी ‘द वायर’ने दिलेली आढळली.

दरम्यान, मानेसर त्याच्या गोरक्षणाच्या कामात कधीही हिंसाचार झाला नसल्याचे सांगतो. मात्र, सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ आणि फोटोंमधून गोरक्षकांची हिंसा दिसून येते. नुकतेच काही दिवसांपूर्वी मानेसर याच्या संघटनेतील सदस्यांनी गुरे वाहून नेणाऱ्या एका आरोपीला मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गाईंची वाहतूक करणाऱ्या अनेक लोकांना जबर मारहाण केल्याचे फोटो याआधी व्हायरल झाले आहेत.

सोमवारी (३१ जुलै) पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मानेसरने सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने त्याला मिरवणुकीत सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या उपस्थितीमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ‘व्हीएचपी’ने सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुढे काय?

पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. हरियाणा प्रशासनाच्या विनंतीनंतर नूह जिल्ह्यात आठवडाभरासाठी शीघ्र कृती दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत; ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) टी. व्ही. एस. एन. प्रसाद यांनी केंद्रीय सचिवांना पत्र लिहून शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्याची मागणी केली होती. याशिवाय हिंसाचरप्रभावित क्षेत्रात अफवा पसरू नयेत यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.