Heart attack rising in youngsters गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हृदयविकाराचा धोका केवळ वयस्करांनाच नाही, तर तरुणांनाही आहे. भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना सातत्याने आपण वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर घडत असल्याचे पाहत आहोत. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढत आहे? त्याविषयी आरोग्यतज्ज्ञ डॉ. प्रभाकरन दोराईराज यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF)चे अध्यक्ष आणि सेंटर क्रॉनिक डिसीज कंट्रोल इन इंडिया (CCDC)चे कार्यकारी संचालक आहेत. हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांसाठी जीवनशैली कारणीभूत आहे की आनुवंशिकता? करोना लस आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटनांचा काही संबंध आहे का? त्याविषयी सविस्तर समजून घेऊया.
तज्ज्ञ हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांविषयी काय सांगतात?
भारतातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा हृदयरोग ही देशापुढील मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. जगात हृदयरोगामुळे २.०५ कोटी लोकांचे मृत्यू होतात आणि बहुतांश मृत्यू भारतात होतात. या मृत्यूंचा परिणाम केवळ कुटुंबांवरच होत नाही, तर त्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचेदेखील (GDP) नुकसान होते. हृदयरोग आनुवंशिक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे, मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. भारतीय लोकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण, वाढता लठ्ठपणा, एचडीएल-कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल)चे कमी प्रमाण आदी बाबी यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हृदयविकाराचा धोका आनुवंशिक आहे की जीवनशैलीशी संबंधित?
भारतीय आहारात शुद्ध (Refined) कर्बोदके, साखर आणि ट्रान्स फॅट्स जास्त प्रमाणात असतात; तर फळे, भाज्या व सुक्या मेव्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. शहरांमध्ये, प्रया केलेल्या अन्नाचे (Processed foods) सेवन जास्त प्रमाणात केले जाते. त्यामुळेच बहुतांश लोकांच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढत आहे आणि मिठाचे सेवन शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. या आहार पद्धतीमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह वाढत आहे, विशेषतः तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे.
दरम्यान, भारतात वायुप्रदूषण जागतिक सरासरीपेक्षा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका आणखी वाढतो आहे. कामाचे जास्त तास, ताण व अपुरी झोप ही समस्या अधिक वाढवतात, विशेषतः शहरी भागात. त्यामुळे हृदयरोग केवळ आनुवंशिक नसून, या वाढत्या प्रमाणासाठी जीवनशैलीही कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे.
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
आपण तिशीकडे जाताना आपला रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे. जीवनशैलीच्या दृष्टीने आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करणे, कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे व कमीत कमी प्रमाणात साखरेचे सेवन करणे हा आपला मंत्र असायला हवा, असे तज्ज्ञ सांगतात. त्याव्यतिरिक्त रोज किमान ३० मिनिटे वेगाने चालण्यासारखी शारीरिक हालचाल हृदयरोग कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका टाळता येतो.
करोना लस या वाढत्या मृत्यूंसाठी जबाबदार आहे का?
कोविडसह अनेक विषाणूजन्य संसर्ग (Viral infections), विशेषत: संसर्ग झाल्यानंतर लगेच हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा (Stroke) धोका तीन ते सहा पटींनीने वाढवता. परंतु, या विषाणूजन्य लसी संरक्षक ठरतात, विशेषतः मधुमेह, कर्करोग, पूर्वीचा हृदयरोग किंवा ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींसारख्या असुरक्षित लोकांसाठी. लसींमुळे अचानक मृत्यू वाढतात, ही एक गैरसमजूत आहे. तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याची इतरही कारणे असू शकतात.
भारतात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त का आहे?
तज्ज्ञ म्हणतात की, दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आहार, शारीरिक हालचाल व तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविणे आवश्यक आहे. उच्च प्रमाणात धोका असलेल्या गटांची तपासणी विशेषतः कौटुंबिक इतिहास, मधुमेह असलेल्यांची तपासणी नियमित व्हायला हवी. शाळा, कामाची ठिकाणे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सीपीआर प्रशिक्षण द्यावे, तसेच जिम, कार्यालये व मॉल्समध्ये डिफिब्रिलेटर यंत्रणा बसवावी. कॉर्पोरेट्स कंपन्यादेखील नियमित आरोग्य तपासणी आणि ‘workplace wellness programmes’द्वारे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
हा धोका कसा कमी होणार?
तज्ज्ञ म्हणतात दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आहार, शारीरिक हालचाल आणि तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहिम आवश्यक आहेत. उच्च-धोका असलेल्या गटांची तपासणी विशेषतः कौटुंबिक इतिहास, मधुमेह असलेल्यांची तपासणी नियमित व्हायला हवी. शाळा, कामाची ठिकाणे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सीपीआर प्रशिक्षण द्यावे, तसेच जिम, कार्यालये आणि मॉल्समध्ये डिफिब्रिलेटर यंत्रणा बसवावी. कॉर्पोरेट्स कंपन्यादेखील नियमित आरोग्य तपासणी आणि ‘workplace wellness programmes’द्वारे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
यापैकी कोणतेही बदल सोपे नाहीत; मात्र हृदयविकारामुळे वाढते संभाव्य मृत्यू थांबवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) इतर अत्यावश्यक कृतींसह देशांना उच्च रक्तदाबाविषयी जागरूकता आणि उपचार वाढविण्याचे आवाहन करीत आहे. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातासाठीचा सर्वांत मोठा धोकादायक घटक आहे.