सत्ता महत्त्वाची असते, जगाच्या इतिहासात याच सत्तेच्या हव्यासाने महायुद्धे घडवली. इतिहासात राजे-राजवाड्यांनी सत्तेच्या प्राप्तीसाठी युद्धे केली तर आज निवडणूक लढवली जात आहे. कालपरत्त्वे याचे स्वरूप भिन्न असले तरी सत्तेसाठीची लढत आणि तीव्रता मात्र तेवढीच आहे. औरंगजेबाने याच सत्ताप्राप्तीसाठी आपल्या सख्या भावाचा शिरच्छेद केला होता. अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात, जी सत्ता आणि भावकी यांच्यातील ताणलेला बंध उघड करतात. आजच्या राजकारणातही हेच पाहायला मिळत आहे. किंबहुना २०२४ ची निवडणूक भावकी आणि फूट यासाठीच गाजते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी फूट, सुनेत्रा पवार यांचे ‘पतीला समर्थन हेच माझे कर्तव्य’ असे विधान यांसारखे मुद्दे विशेष चर्चेत आहेत. अशीच एक फूट इतिहासात गांधी-नेहरू कुटुंबातही पडली होती, त्या घटनेचा घेतलेला हा आढावा.
अधिक वाचा: विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?
संजय ठरणार होता उत्तराधिकारी…
१९८० साली काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उत्तराधिकारी संजय गांधीच ठरणार या चर्चेने जोर धरला होता. यासंदर्भात पुपुल जयकर ‘इंदिरा गांधी, १९९३’ मध्ये म्हणतात, ‘आता तो १९७५ मधील उद्धट, अननुभवी तरुण राहिला नव्हता. काही वर्षे सत्तेविना राहिल्याने जनता व परिस्थिती यांबद्दल सखोल समज त्याच्यात निर्माण झाली होती. डावपेचांची आखणी, लोकांवर प्रभाव पाडणं, निवडणुका जिंकणं हे तो आपल्या आईकडून शिकला होता.’ असं त्या नमूद करतात. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. २३ जून १९८० रोजी विमानाचा झालेला अपघात संजयच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
संजय गांधींचा मतदार संघ कोणाचा? हीच ठरली का वादाची ठिणगी?
संजयच्या मृत्यूनंतर १९८१ मध्ये अमेठी पोटनिवडणूक झाली आणि मोठा भाऊ राजीव विजयी झाला. आपल्या पतीनंतर त्याची राजकीय उत्तराधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मनेका गांधीना मात्र हे पसंतीस पडलं नाही. किंबहुना त्यांनी ही निवडणूक लढण्यापासून राजीव गांधींना परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला होता. आणि हीच ठिणगी या कुटुंबात फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.
अमेठीच्या लढाईने नेहरू- गांधी कुटुंब कसे तुटले
१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अमेठीत झालेल्या निवडणुकीने या कुटुंबात कायमस्वरूपी फूट पडली. या निवडणुकीतील ही लढत दोन पक्षांमधील नव्हे तर दोन भावांमधली ठरली. अमेठी म्हणजे गांधी घराण्याचा बालेकिल्ला, याच त्यांच्या बालेकिल्ल्याने एक कुटुंब विभक्त होताना पाहिले. संजय गांधी हे इंदिरा गांधींचे राजकीय उत्तराधिकारी होते यात शंका नाही. तर दुसऱ्या बाजूला राजकारणापासून दूर असलेले आणि इंडियन एअरलाइन्समधील उड्डाण कारकिर्दीत राजीव गांधी आनंदी होते. त्यामुळेच संजय गांधी यांना इंदिरा गांधींचा उजवा हात मानले जात होते. असे असले तरी, विमान अपघातात त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, इंदिरा गांधींनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला राजकारणात आणणे पसंत केले. त्यावेळी मनेका गांधी यांचे वय २५ वर्षांपेक्षाही कमी होते.
राजीव गांधींना रोखण्याचा प्रयत्न
मनेका गांधी या १९७० च्या दशकात त्यांच्या सक्रिय राजकीय मोहिमेदरम्यान त्यांच्या पतीसोबत अनेकदा दिसल्या होत्या. ‘२४ अकबर रोड: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द पीपल बिहाइंड द फॉल अँड राइज ऑफ द काँग्रेस’ या पुस्तकात राजकीय टीकाकार रशीद किडवई यांनी, ‘राजीव गांधीनी १९८१ साली अमेठी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर, मनेका गांधींनी “त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला” असे नमूद केले आहे.
सासू विरुद्ध सून
अकबर अहमद यांनी २८ मार्च १९८२ रोजी आयोजित केलेल्या लखनऊ अधिवेशनाला मनेका गांधींनी हजेरी लावल्याने इंदिरा गांधी संतापल्या होत्या. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांनी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राजीव गांधी यांना तयार केलं होतं. किडवई यांनी नमूद केल्याप्रमाणे भारतात निवडणूक लढवण्याचे किमान वय २५ वर्ष होते. मनेका गांधींचे त्यावेळी वय २५ वर्षांपेक्षाही कमी होते. यासंदर्भात इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करावी अशी मनेका गांधी यांची इच्छा होती, परंतु पंतप्रधानांनी नकार दिला. हा निर्णय आपल्या दिवंगत पतीचा राजकीय वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे असे मनेका गांधी यांचे मत झाले, त्यामुळे त्यांच्यात आणि इंदिराजींमध्ये कधीही भरून न येणारा दुरावा निर्माण झाला.
ती दुर्दैवी रात्र…
स्पॅनिश लेखक जेवियर मोरो यांच्या ‘द रेड सारी’ या पुस्तकात ज्या दिवशी मनेका गांधी यांनी वरुण गांधींसह घर सोडले त्या रात्रीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. २८ मार्च १९८२ च्या दुर्दैवी रात्री, पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांसमोर, मनेका गांधी त्यांचा मुलगा वरुण यांच्यासह दिल्लीतील पंतप्रधानांच्या १, सफदरजंग रोडवरील निवासस्थानातून बाहेर पडल्या. वरुण दोन वर्षांचा होता. मोरो नोंदवतात की, इंदिरा गांधी यांच्या परवानगीशिवाय मेनका लखनौ अधिवेशनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्या नाराज होत्या. लखनऊ अधिवेशनातील मनेका गांधी यांची उपस्थिती प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारी होती. इंदिरा गांधींच्या व्यक्त इच्छेविरुद्ध अकबर अहमद यांनी आयोजित केलेल्या अधिवेशनाला थेट पंतप्रधानांचा अपमान म्हणून पाहिले जात होते. हा एक असा मेळावा होता, ज्याने संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचे धाडस केले. या अधिवेशनाला ८,००० ते १०,००० समर्थक उपस्थित होते. मनेका गांधीचे भाषण मुख्य नसले तरी भविष्यातील अनेक प्रसंगांना ते कारणीभूत ठरले.
इंदिरा गांधींनी मनेकाला सांगितले ‘घरातून बाहेर जा’
२८ मार्च १९८२ रोजी सकाळी इंदिरा गांधी घरी आल्या. मनेकाच्या अभिवादनाला इंदिराजींनी ‘नंतर बोलू’ असा प्रतिसाद दिला. दुपारच्या जेवणाचेही ताट मनेका यांच्या खोलीतच पाठवण्यात आले. ज्यावेळी मनेका आणि इंदिरा गांधी यांची नजरानजर झाली त्यावेळी मात्र इंदिरा गांधींच्या संयमाचा बांध तुटला. प्रत्यक्षदर्शी धीरेंद्र ब्रह्मचारी आणि सचिव धवन होते. मोरो लिहितात की, इंदिरा गांधींनी मनेकाकडे बोट दाखवले आणि ओरडल्या, “या घरातून ताबडतोब निघून जा!” मोरो पुढे लिहितात, “मी तुला लखनऊमध्ये बोलू नकोस असे सांगितले होते, पण तुला पाहिजे तेच केले आणि तू माझी आज्ञा मोडलीस! तुझ्या प्रत्येक शब्दात विष होते. मी ते पाहू शकत नाही असे तुम्हाला वाटते का? निघून जा इथून! आत्ताच हे घर सोड!” त्या किंचाळल्या. “तू तुझ्या आईच्या घरी परत जा!”
मनेका गांधींनी या घटनेची माहिती बहीण अंबिका हिला दिली आणि बोलावून घेतले असे मोरोने नमूद केले आहे. अंबिका मनेकाचे सामान बांधत असताना, इंदिरा खोलीत आल्या आणि मनेकाला म्हणाल्या “आता बाहेर जा! मी तुला सांगितले आहे की तुझ्याबरोबर काहीही घेऊ नकोस.” त्यावर अंबिकाने हस्तक्षेप केला: “ती जाणार नाही! हे तिचे घर आहे!” त्यावर “हे तिचं घर नाही,” इंदिराजी रागाने डोळे मिटून ओरडल्या, “हे भारताच्या पंतप्रधानांचे घर आहे!”
मोरोच्या म्हणण्यानुसार, “रात्री अकरा वाजल्यानंतर, गोंधळलेल्या, अर्ध्या झोपेत असलेल्या फिरोज वरुणला हातात घेऊन, मनेका शेवटी घरातून बाहेर पडली आणि तिच्या बहिणीबरोबर गाडीत बसली. पत्रकार बाहेरच होते, त्यांनी जाणाऱ्या मनेकाचे फोटो काढले, जे दुसऱ्या दिवशीच्या बातम्यांच्या मथळ्याचे ठळक वैशिष्ट्य होते.
अमेठीसाठी गांधी विरुद्ध गांधी लढा
सासूचे घर सोडल्यानंतर मनेका गांधी यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या. अमेठीमध्ये राजीव गांधींच्या पोटनिवडणुकीत विजयानंतर एक वर्षानंतर, मनेका गांधींनी मतदारसंघाला भेट दिली. त्यांनी अकबर अहमद बरोबर राष्ट्रीय संजय मंचची स्थापना केली आणि १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात अमेठीतून सार्वत्रिक निवडणूक लढवली. सुरुवातीस मनेका डोईजड होणार नाही अशीच काँग्रेसची भावना होती, परंतु अमेठीच्या लोकसंख्येमध्ये महिला मतदारांचा समावेश अधिक होता. या महिला निवडणुकीचे चित्र बदलू शकतात, हे स्पष्ट झाल्यावर या निवडणुकीत राजीव गांधींच्या बाजूने सोनिया गांधींना उतरविण्यात आले. त्यांनी आपल्या पतीला आधार देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
भारतीय वेशात सोनिया
इंडिया टुडे साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या डिसेंबर १९८४ च्या लेखानुसार , राजीव गांधी त्यांच्या देशव्यापी दौऱ्यावर असताना सोनियांनी अमेठीमध्ये तळ ठोकला होता. राजीव गांधी ज्या वेळेस अमेठीत पोहचले त्यावेळेस सोनिया त्यांच्या प्रत्येक सभेत उपस्थित होत्या. हातमागावरची साडी, कपाळावर लाल कुंकू आणि डोक्यावर पदर, हातात लाल बांगड्या एकूणच भारतीय पत्नीला शोभेल अशी वेशभूषा. सोनियाने कोणतेही भाषण केलेले नसले तरी कार्यकर्त्यांशी हिंदीतून संवाद, स्वतंत्रपणे महिला मतदारांना भेट देणे यातून त्यांनी आपले अस्तित्त्व दर्शवून दिले.
परंतु २१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येने परिस्थिती नाट्यमयरित्या बदलली. यामुळे राजीव गांधी अंतरिम पंतप्रधान झाले आणि जनमत राजीव गांधींच्या बाजूने होते. परंतु मनेका मात्र यामुळे खचल्या नाहीत. आता लढत एका खासदाराबरोबर नसून पंतप्रधानांशी होती, हे त्यांना ठावूक होते. मनेका गांधींनी एका सभेत राजीव गांधींना अमेठी त्यांच्या जीवावर सोडून देशातील इतर भागांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. देश चालवण्यारे प्रभारी पंतप्रधान या नात्याने राजीव गांधींना अमेठीसाठी वेळ मिळणार नाही, असे सांगून तिने याला आपला प्रचाराचा मुद्दा केला.
“श्रीमती गांधींना आठवते का? त्या विधवा झाल्या तेव्हा त्या रायबरेलीतील आपल्या पतीच्या मतदारसंघातील लोकांकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यांना मतदान केले आणि रायबरेलीने मोठी प्रगती पाहिली. पण त्या पंतप्रधान झाल्या आणि रायबरेलीला उतरती कळा लागली. इथेही असेच राहा. म्हणून मी म्हणते, राजीवजी तुम्ही बाकीच्या देशाची काळजी घ्या, पण तुम्ही अमेठीला मनेकाच्या काळजीवर सोडा, असे मनेका यांनी अमेठीतील एका सभेत म्हटल्याचा उल्लेख इंडिया टुडेच्या लेखात आहे. परंतु मेनका गांधी यांचा ३.१४ लाख मतांनी पराभव झाला. यश काँग्रेसच्या पदरात पडले. यात मनेका गांधी यांचे बरेच आर्थिक नुकसानही झाले. त्यानंतर त्यांनी अमेठीतून पुन्हा कधीही निवडणूक लढवली नाही.
अमेठीचा किल्ला पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसची बोली
१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. त्यांच्या मृत्यूनंतर, गांधी परिवाराचे निष्ठावंत सतीश शर्मा १९९१ आणि १९९६ मध्ये दोनदा या जागेवरून निवडून आले. सोनिया गांधी यांनी ही १९९९ मध्ये अमेठीमधून राजकारणात पदार्पण केले होते. २००४ मध्ये, सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठी सोडले. २०१९ पर्यंत राहुल गांधींनी १५ वर्षं अमेठीचे प्रतिनिधित्व केले. परंतु त्यांना भाजपच्या स्मृती इराणींकडून हार पत्करावी लागली. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षासोबतच्या जागावाटप कराराचा भाग म्हणून अमेठीची जागा काँग्रेसला मिळाली आहे. सध्या केरळमधील वायनाडमधून खासदार असलेले राहुल गांधी सत्ताधारी भाजपकडून कौटुंबिक बालेकिल्ला परत मिळवण्याच्या प्रयत्नात अमेठीत परतण्याची शक्यता आहे.
मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरूण हे अनुक्रमे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि पिलभीतमधून भाजपाचे खासदार झाले आहेत. गेल्या वर्षी, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांबद्दल बोलणारे वरुण गांधी पक्ष सोडून समाजवादी पक्षात सामील होऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांच्या मतदारसंघातून अमेठीतून तिकीट मिळू शकते, अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र, वरुण गांधी सध्या तरी तिकीट नाकारल्यानंतरही भाजपमध्येच आहेत, तर काँग्रेसने राहुल गांधींना अमेठीत आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.