कुठल्याही विद्याशाखेचा इतिहास सहसा स्थानिक संस्कृतीच्या इतिहासाशी निगडित असतो. गणिताचेही तसेच झाले. मानवी संस्कृतीचा विविध भौगोलिक भागांत जसजसा विकास होत गेला, तसतसे गणित वेगवेगळ्या तऱ्हेने वाटचाल करत गेले. संस्कृतीला आकार देण्यात गणितानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात गणिती दृष्टिकोन, गणिताचे उपयोजन यांची मदत होत आलेली आहे.

गणन म्हणजेच मोजणे या क्रियेपासून गणिताचा प्रवास सुरू झाला. अंकज्ञानाला गणिताचा पाया असे म्हणता येते. बहुतेक संस्कृतींमध्ये गुरांची संख्या म्हणजे मालमत्तेची मोजणी करण्यासाठी अंकांची गरज प्रथम भासली. सर्वात लोकप्रिय संख्या दहा ठरली; याचे कारण माणसाला असणारी हाताची दहा आणि पायाची दहा बोटे! इतक्या प्राथमिक गरजेतून अंकशास्त्राचा विस्तार झाला. यात इजिप्त, बॅबीलोनिया, भारत, चीन, ग्रीस, दक्षिण अमेरिका आणि रोम या प्राचीन संस्कृतींनी उल्लेखनीय प्रगती केली. अंक, संख्या दर्शविण्यासाठी विशिष्ट चिन्हे उपयोगात आणली जाऊ लागली. पण मोठमोठय़ा संख्या दर्शविणे कठीण होत असे. भारतात उगम पावलेली दशमान पद्धती जगाने स्वीकारली, ज्यामुळे गणिताचे अध्ययन, अध्यापन तसेच वापर हे सर्व सुलभ झाले.

मानवी संस्कृतीच्या प्रारंभीच्या काळातच भूमिती ही दुसरी शाखा जन्माला आली. विशेषत: भूखंडांचे मापन करण्यासाठी तिचा उपयोग होत असल्याने तिचे नाव ‘भूमिती (जिऑमेट्री)’ असे पडले. भारतासह अनेक संस्कृतींनी क्षेत्रमापन, बांधकामे, वस्तूंची निर्मिती यांसाठी भूमितीचे ज्ञान उपयोगात आणले असले, तरी ग्रीकांनी भूमितीला सैद्धांतिक बैठक दिली. प्रत्येक प्रमेयाला तर्कशुद्ध सिद्धता देण्याची पद्धत रूढ केली.

अंकगणित, भूमिती यांच्यापाठोपाठ बीजगणित, त्रिकोणमिती अशा सशक्त शाखाही निर्माण होऊन भौतिकशास्त्राच्या प्रगतीला वेगाने चालना मिळाली. लॉगरिथम कोष्टकांच्या शोधामुळे आकडेमोड सुलभ झाली. बीजभूमिती, कलनशास्त्र, त्रिमितीय भूमितीचे ज्ञान आदींमुळे गणिताची वाटचाल अधिक वेगाने झाली. विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत, त्याशिवाय वाणिज्य, कला, स्थापत्य अशा सर्वच अंगांच्या विकासात गणिताचे साहाय्य अपरिहार्य बनले. आज असंख्य उपशाखांनी गणिताचा प्रचंड विस्तार झाला आहे. या अफाट गणितविश्वाचा प्राचीन इतिहास पुढील काही लेखांतून जाणून घेऊ या!

– डॉ. मेधा लिमये
मराठी विज्ञान परिषद,
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
ईमेल : office@mavipamumbai.org