औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात धुतलेला कोळसा वापरल्याने केंद्राची निर्मिती क्षमता वाढते, असा दावा केला जातो. त्यासाठी महानिर्मिती राज्य खनिकर्म महामंडळामार्फत खासगी कोल वॉशरीजकडून हे काम करवून घेतले जाते. मात्र हे काम आरंभापासूनच वादग्रस्त ठरले आहे.

महानिर्मितीकडून धुतलेला कोळसा किती वापरला जातो?

राज्यात ‘महानिर्मिती’चे कोराडी, खापरखेडा, नाशिक पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ९ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करीत आहे. यासाठी दररोज जवळपास १.२५ लाख मेट्रिक टन ते १.३० लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. नियमानुसार महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये १५ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ४ ते १२ दिवस पुरेल एवढाच साठा विविध प्रकल्पांत उपलब्ध होता. दरम्यान, महानिर्मितीकडून सध्या ६६० मेगावाॅट वीजनिर्मिती प्रकल्पात १०० टक्के धुतलेलाच कोळसा वापरला जातो. त्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्ये कोल वाॅशरीजमध्ये उपलब्ध कोळशाच्या साठ्यानुसार धुतलेल्या कोळशाचा वापर वीजनिर्मितीचा दर्जा सुधारण्यासाठी होत असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – विश्लेषण : माथेरानच्या डोंगराखालून बोगदे कशासाठी काढले जात आहेत? मुंबई-बडोदा मार्ग कधी पूर्ण होणार?

वीजनिर्मितीसाठी कोळसा धुण्याची गरज का?

महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि), महानदी कोलफिल्ड लिमिटेड (एमसीएल) यांसह परदेशातूनही आयात कोळसा वापरला जातो. या कच्च्या कोळशासोबत दगड, माती, चिखल व अन्य काही घटक येतात. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पातील यंत्राच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. बऱ्याचदा महानिर्मितीला कमी उष्मांकाचा कोळसा उपलब्ध होतो. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी धुतलेला कोळसा वापरण्यावर भर दिला जातो. कारण कोळसा धुतल्यामुळे राखेचे प्रमाण कमी होते. कोळशातील उष्मांक सुमारे ५०० ते ६०० ने वाढून वीजनिर्मितीची क्षमता वाढते. कोराडीसह अन्य काही प्रकल्पांतील ६६० मेगावाॅट वीजनिर्मिती संच हे सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यासाठी धुतलेला कोळसा वापरणे बंधनकारक आहे.

धुतलेल्या कोळशामुळे निर्मिती क्षमता वाढते हा दावा खरा आहे का?

धुतलेला कोळसा वापरल्याने वीजनिर्मिती केंद्राची क्षमता वाढत असल्याचा दावा महानिर्मितीकडून केला जातो. मात्र या दाव्यावर आता आक्षेप घेतले जात आहेत. त्यासाठी सबळ पुरावे काही संघटनांनी सादर केले आहे. जय जवान जय किसान संघटनेने केलेल्या दाव्यानुसार खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात ५ नोव्हेंबर २०२१ रोजी २२ टक्के धुतलेला आणि ७८ टक्के कच्चा कोळसा एकत्र करून वापरला. प्रतिकिलोवॉट वीजनिर्मितीसाठी ०.८१ किलो कोळसा लागला. ६ नोव्हेंबरला १०० टक्के धुतलेला कोळसा वापरल्यावर प्रतिकिलोवॉट वीजनिर्मितीसाठी ०.७८ किलो कोळसा लागला. १५ नोव्हेंबरला ६२ टक्के धुतलेला आणि ३८ टक्के कच्चा कोळसा वापरल्यावर प्रतिकिलोवॉट विजेसाठी ०.६८ किलो, १७ नोव्हेंबरला ५९ टक्के धुतलेला आणि ४१ टक्के कच्चा कोळसा वापरल्यावर प्रतिकिलोवॉटसाठी  ०.७९ किलो, १९ नोव्हेंबरला १८ टक्के धुतलेला आणि ८२ टक्के कच्चा कोळसा वापरल्यावर प्रतिकिलोवॉट ०.७७ किलो कोळसा लागला. ५ ते १९ नोव्हेंबपर्यंत ५२ टक्के धुतलेला आणि ४८ टक्के कच्चा कोळसा वापरल्यावर प्रतिकिलोवॉट वीजनिर्मितीसाठी ०.७८ किलो कोळसा लागला. वरील आकडेवरून स्वच्छ कोळसा वापरल्यावर वीजनिर्मितीत विशेष फरक पडला नसल्याचे दिसून येते.

कोल वाॅशरीज वादग्रस्त का ठरत आहेत?

महानिर्मितीने महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून वेकोलि, एमसीएलसह इतर कोल कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या कोळसा धुण्याचे काम हिंद महामिनरल, एसीबी, रूक्माई, महावीर या चार खासगी कंपन्यांना दिले आहे. करारानुसार या कंपन्यांना कोल खाणीतून निश्चित वजनाचा कोळसा उचलून व तो धुवून महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांना पुरवायचा आहे. कोळशाच्या दर्जानुसार तो धुतल्यानंतर त्यातील जवळपास २० टक्के दगड, माती, चिखल निघून जातो. शिल्लक ८० टक्के कोळसा पुरवठा प्रकल्पांना करायचा आहे. या २० टक्क्यांमध्येच घोळ होतो. यात नाकारलेला कोळसाही असतो. तो वाॅशरीजला केवळ ४०० रुपये टन याप्रमाणे दिला जातो. तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात विकला जातो, अशा तक्रारी आहेत. प्रत्यक्षात हा कोळसा चांगल्या दर्जाचा असतो व यामुळे महानिर्मितीला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याचाही आरोप आहे.  

राजकीय हस्तक्षेप होत आहे का?

महानिर्मिती राज्य खनिकर्म महामंडळाकडून कोल वॉशरीजचे कंत्राट देते. या महामंडळाचे अध्यक्षपद राजकीय पक्षाच्या नेत्याकडे असते. अनेकदा कोल वॉशरीजचे कंत्राट देताना राजकीय प्रभावाचा वापर होताना दिसून येतो. तसेच महानिर्मितीने धुतलेल्या कोळशाच्या उष्मांकासदर्भात आक्षेप घेऊनही त्याची दखल घेतली जात नाही. कंत्राटदाराची पाठराखण करण्याचीच भूमिका महामंडळाकडून घेतली जाते, असा दावा आरोपकर्त्या संघटनांनी केला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : वाळवंटीकरणातून नापीक होणाऱ्या जमिनीची समस्या किती गंभीर? ‘ग्रेट ग्रीन वॉल’ काय आहे?

भ्रष्टाचारमुक्त वाॅशरीजसाठी पर्याय काय?

जगात आजही सर्वाधिक वीजनिर्मिती औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातूनच केली जाते. त्यासाठी कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. चीनमधील औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा धुण्याचे काम केंद्राकडूनच केले जाते. त्यासाठी तेथे स्वतंत्र वाॅशरीज आहेत. परंतु महाराष्ट्रात महानिर्मिती हे काम महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून खासगी वाॅशरीजकडून करते. या कामात खासगी कंपन्यांचा सहभाग वादग्रस्त ठरला आहे. हे टाळण्यासाठी कोळसा धुण्याचे काम महानिर्मितीने स्वत: करणे हा उत्तम पर्याय असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

महानिर्मितीचे म्हणणे काय?

कोराडीतील ६६० मेगावाॅटच्या तीन संचांची रचना ३ हजार ७३१ उष्मांकाच्या कोळशावर आधारित आहे. एवढ्या उष्मांकासाठी नोव्हेंबर २०२१पासून १०० टक्के धुतलेला कोळसा वापरला जातो. त्यामुळे येथील वीज उत्पादन क्षमता आणि मापदंडात सुधारणा झाली. कोळसा धुण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होत नसेल तर करारानुसार दंड आकारला जातो. त्यानुसार महानिर्मिती महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाला सूचना देते व खनिकर्म महामंडळाकडून संबंधित वाॅशरीजवर कारवाई केली जाते. ही प्रक्रिया पारदर्शी असून त्यात राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नसून कसलाही गैरप्रकार होत नाही, असे महानिर्मितीकडून सांगण्यात आले.

Story img Loader