तीन वर्षांपूर्वी करोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले होते. संपूर्ण जगावर या महामारीमुळे जणू बंधनच आले होते. लॉकडाउनचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो आणि अनेकांना ती आठवणदेखील नकोशी वाटते. भारताने करोना महामारीचा सर्वांत वाईट टप्पा पाहिला. मे २०२१ मध्ये या महामारीमुळे १.२ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत दररोज सरासरी तीन लाखांहून अधिक पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या. आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ६ मे २०२१ मध्ये ४.४ लाखांहून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली होती.

इतर अनेक देशांप्रमाणे भारताला कोविड-१९ लाटेचा सामना करावा लागला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृतांची संख्याही कमी होती. देशात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेल्या करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली; परंतु यामुळे कुणाचा मृत्यू झाला नाही. अजूनही करोना पूर्णपणे संपलेला नाही. दररोज करोना संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत ८५० करोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या विषाणूचा धोका पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. करोनाचे संकट खरेच संपले का? आणि करोना संक्रमितांची संख्या कशी घटली याबद्दल जाणून घेऊ या.

शुक्रवारपर्यंत ८५० करोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?

करोनाचे संकट खरेच संपले का?

५ मे २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड १९ ची साथ संपत आल्याचा निष्कर्ष काढला. याचा अर्थ असा होतो की, विषाणूचा अनियंत्रित प्रसार संपला, संक्रमित रुग्णांची संख्या घटली, मृतांच्या संख्येत घट झाली आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालीवरील ताणही कमी झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या या घोषणेकडे साथीच्या रोगाचा अंत म्हणून पाहिले गेले. भारताने ३१ मार्च २०२२ नंतर म्हणजेच ओमिक्रॉन लाट ओसरल्यानंतर लगेचच सर्व कोविड १९ संबंधित निर्बंध मागे घेतले होते. राज्य सरकारांनीदेखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याचे दिलेले आदेश काढून टाकले होते.

परंतु, कोविड १९ रोगास कारणीभूत असलेला ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू वेगाने संक्रमित होणार्‍या विषाणूंपैकी एक आहे. तो इतक्या लगेच पूर्णपणे नाहीसा होणे शक्य नाही. याच विषाणूचे व्हेरियंट अजूनही अस्तित्वात आहेत. सध्या संक्रमणाला सर्वांत जास्त कारणीभूत ठरत असलेला विषाणू म्हणजे जेएन १. जेएन १ हा ओमिक्रॉनचाच सबव्हेरियंट आहे. मात्र, ओमिक्रॉनप्रमाणेच या विषाणूचा धोका इतर विषाणूंच्या तुलनेत फार कमी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या महितीनुसार, १४ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीमध्ये जगभरात २.४२ लाखांहून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी दोन-तृतीयांश प्रकरणे रशिया व न्यूझीलंडमधील आहेत. यादरम्यान भारतात सुमारे तीन हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याच कालावधीत कोविड-१९ मुळे जगभरात ३,४०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यातील २,४०० प्रकरणे अमेरिकेतील व ५३ प्रकरणे भारतातील आहेत.

सध्या भारतातील करोना चाचणीचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सध्या भारतातील करोना चाचणीचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. गेल्या गुरुवारी भारतात करोनाची ५० प्रकरणे आढळून आली आणि केरळमध्ये एकाचा मृत्यूही झाला. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि फरिदाबादमधील ट्रान्स्लेशनल हेल्थ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यासह काही प्रयोगशाळा सांडपाणी आणि रुग्णालयांमधील नमुन्यांद्वारे विषाणूच्या प्रसाराचा मागोवा घेत आहेत. सांडपाणी निरीक्षणाने भारतातही जेएन-१ विषाणू असल्याचे उघड झाले आहे.

करोना विषाणूचा धोका कमी होऊन संक्रमितांची संख्या कशी घटली?

करोना चाचणीचे प्रमाण कमी असल्यामुळेही रुग्णांची आकडेवारी कमी असू शकते. गेल्या काही वर्षांत कोविड १९ ने जगभरात हाहाकार माजवला होता. त्यावेळी प्रत्येक देशाने करोनाशी लढा दिला आणि लसीकरणावर जोर दिला. २०२१ च्या अखेरीस उदयास आलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट इतर वेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरणारा होता. मात्र, याची गंभीर लक्षणे आढळली नाहीत. जगातील अनेकांना ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले. २०२२ च्या अखेरपर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पहिली किंवा दुसरी लस मिळाली होती; ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत झाली. याच कारणामुळे अनेकांना या विषाणूचा संसर्ग होऊनही कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. अनेकांना तर आपल्याला संसर्ग होऊन गेल्याचेदेखील कळले नाही, असे शास्त्रज्ञ सांगतात.

२०२२ च्या अखेरपर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पहिली किंवा दुसरी लस मिळाली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

परंतु, संसर्ग किंवा लस दोन्ही कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती प्रदान करीत नाहीत. २०२१ आणि २०२२ मध्ये घेतलेल्या लसींचा परिणाम बहुधा संपला आहे. नैसर्गिक प्रतिकारशक्तीदेखील काही काळानंतर कमी होते. संक्रमितांची संख्या घटण्याचे एकमेव कारण म्हणजे लोकांना वारंवार निरुपद्रवी विषाणूंचा संसर्ग होत आहे आणि त्यांची प्रतिकारशक्ती नव्या विषाणूंशी लढण्यासाठी तयार होत आहे.

अशोका विद्यापीठातील त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे बायोसायन्स आणि हेल्थ रिसर्चचे अधिष्ठाता अनुराग अग्रवाल म्हणाले, “मोठ्या संख्येने आजही लोकांना संसर्ग होत आहे. आपल्याला त्याबद्दल माहीत नाही. कारण- जास्त प्रमाणात चाचण्या केल्या जात नाहीत. परंतु, यामुळे त्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढत आहे.”

हेही वाचा : पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत या विषाणूचे धोकादायक प्रकारात रूपांतर झालेले नाही; ज्यामुळे अद्याप कोणत्याही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागलेले नाही. परंतु, ही परिस्थिती आणखी किती काळ टिकेल, याचा अंदाज लावता येणे कठीण आहे. शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांसाठी आता हा विषाणू परिचयाचा झाला आहे. त्यांना या विषाणूची चांगली समज आहे आणि याचा प्रसार कसा रोखावा हेदेखील माहीत आहे. असे असले तरीही याचे सतत निरीक्षण करणे आणि मागोवा घेणे आवश्यक आहे; जेणेकरून धोकादायक परिस्थिती उदभवल्यास तयार राहता येईल.