Delhi Blast दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबरला मोठा स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण दिल्ली हादरली आहे. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती. दिल्ली कार स्फोटाचे प्रकरण पुढील तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एएनआय) सोपविण्यात आले आहे. स्फोट घडविण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा चालक हा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर उमर नबी होता. स्फोट झालेल्या ह्युंदाई आय२० वाहनाचा चालक डॉ. उमर नबीचा मृतांमध्ये समावेश असल्याचे मानले जात आहे.
या स्फोटात अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल (ANFO) वापरल्याचा संशय आहे. हे एक असे मिश्रण आहे जे खाणकाम, बांधकामात सामान्यतः वापरले जाते. परंतु, जगभरातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा शस्त्रासारखा वापर केला गेला आहे. दिल्लीतील या दुर्घटनेच्या काही तास आधी, जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा पोलिसांनी फरिदाबाद येथे संयुक्त कारवाई करून २,५०० किलोग्राम स्फोटक सामग्रीचा साठा उघडकीस आणला होता, ज्यात मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटचा समावेश होता. त्यामुळे खत म्हणून कायदेशीररित्या विकले जाणारे हे रासायान विनाशाचे शस्त्र म्हणून कसे वापरले जाऊ शकते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय आहे अमोनियम नायट्रेट? अमोनियम नायट्रेटचा वापर शस्त्रासाठी कसा केला जात आहे? हे रसायन किती घातक? जाणून घेऊयात.
अमोनियम नायट्रेट म्हणजे काय?
अमोनियम नायट्रेटचे रासायनिक सूत्र NH_4NO_3 आहे. याचा वापर प्रामुख्याने शेतीत खत म्हणून केला जातो. हा पांढऱ्या रंगाचा पावडर स्वरूपातील पदार्थ आहे. हे रसायन डिझेल, रॉकेल किंवा इतर हायड्रोकार्बनसारख्या इंधनाच्या स्रोतामध्ये मिसळले गेल्यास स्फोटाइतकी ऊर्जा निर्माण करू शकतात. या मिश्रणालाच ANFO म्हणजेच अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल म्हणून ओळखले जाते. अमोनियम नायट्रेट ऑक्सिडायझर म्हणून काम करते, तर इंधन तेल ज्वलनशील घटक म्हणून कार्य करते.
पेटल्यावर, या अभिक्रियेतून मोठ्या प्रमाणात उच्च-दाबाचा वायू आणि उष्णता बाहेर पडते, ज्यामुळे प्रचंड विनाश घडवणारा स्फोट होतो. त्याची कमी किंमत आणि सहज उपलब्धतेमुळे ते जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक स्फोटक घटकांपैकी एक आहे, विशेषतः खाणकाम, खडक उत्खनन आणि मोठ्या प्रमाणावरील बांधकामांमध्ये त्याचा वापर केला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या पबमेड सेंट्रलनुसार ANFO त्याच्या परवडणाऱ्या किमतीमुळे आणि हाताळण्यास सोपे असल्यामुळे व्यावसायिक उपयोगांसाठी लोकप्रिय आहे. स्फोट घडवून आणण्यासाठी त्याला डेटोनेटर किंवा बूस्टर चार्जची आवश्यकता असते.
दहशतवादी ANFO चा वापर का करत आहेत?
अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल स्वस्त, सहज उपलब्ध आणि कायदेशीररित्या मिळणारे असल्याने, हे संयुग दहशतवादी आणि बंडखोर गटांसाठी एक पसंतीचे साहित्य ठरत आहे. अमोनियम नायट्रेट शेतीच्या बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध आहे आणि त्याची वाहतूक संशयास्पद वाटत नाही. तसेच, पेट्रोल आणि डिझेलसारखी इंधने जगभरात सर्वत्र उपलब्ध आहेत आणि दैनंदिन वापराची उत्पादने आहेत, असे फॉरेन्सिक सायन्स इंटरनॅशनलच्या २०१९ मधील एका लेखात नमूद केले आहे. जेव्हा हे घटक एकत्र केले जातात तेव्हा ते सामूहिक विनाशाचे शस्त्र बनतात, हे गेल्या दशकांत झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये सिद्ध झाले आहे.
अमोनियम नायट्रेटशी संबंधित यापूर्वीही दहशतवादी घटना घडल्या आहेत का?
भारतात अमोनियम नायट्रेटवर आधारित स्फोटांचा एक दुःखद इतिहास आहे. संसदेत सादर केलेल्या सरकारी नोंदींनी अनेक मोठ्या दहशतवादी प्रकरणांमध्ये या संयुगांचा वापर झाल्याचे दर्शवले आहे. २०१० च्या पुणे जर्मन बेकरी स्फोटात तपासणी अधिकाऱ्यांना स्फोटक उपकरणामध्ये RDX आणि ANFO चे मिश्रण असल्याचे आढळून आले होते. या हल्ल्यात १८ लोकांचा मृत्यू झाला होता. एका वर्षानंतर, २०११ च्या मुंबईतील तिहेरी स्फोटांमध्ये (ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर) पुन्हा अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला. यात दोन डझनाहून अधिक लोकांचा बळी गेला. यापूर्वी, २००६ च्या मुंबई लोकल ट्रेन स्फोटात याचा वापर झाला होता, ज्यात २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नंतरच्या तपासणीत असे दिसून आले की, स्फोटाची क्षमता वाढवण्यासाठी बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट आणि RDX दोन्ही भरलेले होते आणि ते प्रेशर कुकरमध्ये पॅक केले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ANFO चा वापर सर्वांत प्राणघातक हल्ल्यांमध्ये झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी दहशतवादी घटनांपैकी एक म्हणून १९९५ चा ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट ओळखला जातो. टिमोथी मॅकव्हे आणि टेरी निकोल्स यांनी आल्फ्रेड पी. मुर्रा फेडरल बिल्डिंगच्या बाहेर भाड्याच्या ट्रकमध्ये सुमारे २,३०० किलोग्राम ANFO भरले होते, या हल्ल्यात १६८ लोकांचा मृत्यू झाला आणि ९०० हून अधिक जखमी झाले. या स्फोटात ३०० हून अधिक इमारती नष्ट झाल्या आणि अंदाजे ६५२ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
२०११ मध्ये नॉर्वेजियन अतिरेकी अँडर्स बेहरिंग ब्रेविकने ओस्लोमधील पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर ९५० किलोग्राम ANFO चा वापर करून स्फोट घडवला. त्यात आठ लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याने उटोया बेटावर अंदाधूंद गोळीबार केला. अमोनियम नायट्रेटच्या अयोग्य साठवणुकीमुळे झालेल्या अपघातांमुळेही मोठा विध्वंस झाला आहे. २०२० मध्ये बेरुत बंदरावर अनेक वर्षांपासून साठवलेल्या २,७५० टन संयुगाला आग लागल्याने मोठा स्फोट झाला होता. यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक विस्थापित झाले.
भारतात अमोनियम नायट्रेट सहज उपलब्ध आहे?
भारतात, १८८४ च्या स्फोटक कायद्यांतर्गत (Explosives Act), अमोनियम नायट्रेट आणि वजनाने ४५ टक्क्यांहून अधिक हे संयुग असलेली कोणतीही मिश्रणे ‘स्फोटक’ म्हणून वर्गीकृत केली जातात. २०१२ मध्ये अधिसूचित केलेल्या आणि २०२१ मध्ये सुधारित केलेल्या नियमांतर्गत याच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक आणि साठवणुकीसाठी कडक अटी आहेत. या नियमांनुसार, केवळ परवानाधारक उत्पादक किंवा हँडलरच विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट बाळगू किंवा विकू शकतात. लोकवस्तीच्या किंवा गैर-औद्योगिक भागांमध्ये साठवणूक निषिब्ध आहे. अमोनियम नायट्रेटचा कोणत्याही स्वरूपात वापर करण्यासाठी पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेची (PESO) मंजुरी आवश्यक आहे.
या रसायनाचा वापर औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात जास्त असल्याने नियमांची अंमलबजावणी करणे कठीण आहे. अमोनियम नायट्रेटवर संपूर्ण बंदी घातल्यास त्यावर अवलंबून असलेले कृषी आणि खाणकाम क्षेत्र ठप्प होतील. भारत आणि इतर ठिकाणचे अधिकारी कठोर परवाना प्रणाली, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि विक्री तसेच साठवणुकीच्या सुधारित ट्रॅकिंगद्वारे याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. लाल किल्ल्यावरील स्फोटाच्या काही तास आधीच फरिदाबाद येथील दोन घरांतून शेकडो किलोग्राम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले, त्यामुळे ही घटना या आव्हानावर प्रकाश टाकते.
