भारत आणि पाकिस्तानातील तणावादरम्यान पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर करणे तुर्किये आणि अझरबैजानला भोवण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने लोक या देशांमध्ये फिरायला जाण्याचे त्यांचे बुकिंग रद्द करताना दिसत आहेत. भारतातील नागरिक तुर्किये आणि अझरबैजानच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. अनेक मोठ्या बुकिंग ट्रॅव्हल कंपन्यादेखील यात सामील झाल्या आहेत.

७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानविरोधात लोक आक्रमक झाले आहेत. भारतीयांनी त्यांच्या पाकिस्तान समर्थक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि या देशांच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. भारताच्या बहिष्कारामुळे तुर्किये आणि अझरबैजानला कसे नुकसान होणार? त्यांना पाकिस्तानला पाठिंबा देणे भोवणार का? जाणून घेऊयात.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दर्शविला. (छायाचित्र-रॉयटर्स)

भारतीयांचा तुर्किये आणि अझरबैजानवर बहिष्कार

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दर्शविला. तुर्कियेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यासाठी भारताचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने हेदेखील उघड केले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात पाठवलेले ३०० ते ४०० ड्रोन हे तुर्कियेमध्ये तयार करण्यात आलेले सोंगर ड्रोन होते. अझरबैजाननेदेखील भारताच्या लष्करी कारवाईचा निषेध केला. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानला पाठिंबा देणारे निवेदन जारी केले.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले, “पाकिस्तानमधील निष्पाप बळींच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. आम्ही दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक मार्गाने संघर्ष सोडवण्याचे आवाहन करतो.” तुर्किये आणि अझरबैजानने भारतविरोधी भूमिका घेतल्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. काहींनी या मुस्लीम देशांमधील पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्किये आणि अझरबैजानसाठी बुकिंग थांबवल्या आहेत.

ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ‘EaseMyTrip’ने एक सल्लागार जारी केला आहे, त्यामध्ये प्रवाशांना अत्यंत आवश्यक असल्यासच तुर्किये आणि अझरबैजानला भेट देण्यास सांगितले आहे. ‘EaseMyTrip’चे संस्थापक आणि अध्यक्ष निशांत पिट्टी म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर, प्रवाशांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला असल्याने, आम्ही लोकांना अत्यंत आवश्यक असल्यासच भेट देण्याची शिफारस करतो.” त्यांनी आवश्यक नसल्यास या देशांमध्ये प्रवास करू नका असा सल्ला दिला. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो,” असे ते पुढे म्हणाले.

इक्सिगोनेदेखील तुर्किये, अझरबैजान, चीनसाठी सर्व फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग निलंबित केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

इक्सिगोनेदेखील तुर्किये, अझरबैजान, चीनसाठी सर्व फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग निलंबित केले आहे. इक्सिगोचे सीईओ अलोक बाजपेयी यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, “सध्या सर्व भारतीयांच्या भावनांचा आदर करून आम्ही तुर्किये, अझरबैजान आणि चीनसाठी सर्व फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आहे. भारतीय प्रवाशांचा विश्वास, सुरक्षितता आणि हितांना प्राधान्य देताना आपल्या देशाच्या व्यापक हितसंबंधांशी सुसंगत राहण्याची ही आमची वचनबद्धता आहे.” डायरेक्ट-टू-कंझ्युमर ट्रॅव्हल-टेक्नॉलॉजी फर्म वँडरऑननेही दोन्ही देशांसाठी बुकिंग बंद केली आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक गोविंद गौर यांनी मनीकंट्रोलला सांगितले, “आम्ही तुर्किये, अझरबैजानसाठी बुकिंग बंद केली आहे आणि आम्ही कोणतेही नवीन बुकिंग करत नाही. दोन्ही ठिकाणांसाठी असलेल्या सध्याच्या बुकिंगबद्दल भारतीय म्हणत आहेत की, त्यांना प्रवास करायचा नाही आणि इतर ठिकाणी त्यांचा प्रवास पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यासाठी परतफेड मागत आहेत.” गेल्यावर्षी बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड व्हायरल झाला होता, तेव्हापासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका मालदीवला बसला होता. आता तशीच परिस्थिती तुर्किये आणि अझरबैजानवर ओढवण्याची वेळ आली आहे.

तुर्किये आणि अझरबैजानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या

गेल्या काही वर्षांत तुर्किये आणि अझरबैजानची राजधानी बाकू येथे पर्यटनाला जाण्याची मागणी वाढली आहे. तुर्कियेच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या मते गेल्या वर्षी ३,३०,००० भारतीयांनी तेथे भेट दिली. २०१४ पर्यंत हे प्रमाण केवळ १,१९,५०३ होते. त्यांच्या पर्यटन मंडळाने म्हटले आहे की, २०२४ मध्ये तुर्कियेचा पर्यटन महसूल ६१.१ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला. तुर्कियेच्या पर्यटन वाढीमध्ये भारतीयांचे योगदान आहे. २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षी पर्यटकांच्या संख्येत २०.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील मोठ्या संख्येने लोक लग्नासाठीदेखील तुर्कियेची निवड करत असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या वर्षांत अझरबैजाननेही भारतीय प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ मध्ये केवळ ४,८५३ भारतीयांनी अझरबैजानला भेट दिली होती, मात्र २०२४ मध्ये पर्यटकांची ही संख्या २,४३,५८९ वर पोहोचली आहे, असे वृत्त ‘लाइव्हमिंट’ने दिले आहे. २०२३ मध्ये सुमारे १.१७ लाख भारतीय देशात आले होते. रशिया, तुर्किये आणि इराणनंतर भारतातील सर्वाधिक नागरिक अझरबैजानला भेट देतात.

भारताच्या बहिष्काराचा तुर्किये आणि अझरबैजानवर कसा परिणाम होईल?

तुर्किये आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनांना वेग आला आहे. वँडरऑनचे कार्यकारी अधिकारी गौर यांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले की, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीय तुर्किये आणि अझरबैजानमधील त्यांचे बुकिंग रद्द करत आहेत. “भारताकडून तुर्किये आणि अझरबैजानमधील बुकिंगमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. या ठिकाणांसाठी चीननंतर भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे,” असे ते म्हणाले. काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल गेल्या वर्षी भारतीयांकडून मालदीववर बहिष्कार टाकला होता. त्यापेक्षा तुर्किये आणि अझरबैजानचे नुकसान जास्त असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याबद्दल भारतीय नेत्यांनीही तुर्कियेची निंदा केली आहे. शिवसेना (यूबीटी) नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तुर्कियेची पर्यटन विभागाच्या कथित विधानावर टीका केली आहे. हिमाचल प्रदेशातील काँग्रेस आमदार कुलदीप सिंह राठोड यांनी तुर्किये आयातीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी तुर्कियेवर राजनयिक विश्वासघात असल्याचा आरोप करत तुर्कियेला २०२३ च्या भूकंपात ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने दिलेल्या मदतीची आठवण करून दिली. “मी जोरदार मागणी करतो की, भारताने तुर्कीमधून सफरचंद आणि इतर वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घालावी. आपल्या देशवासीयांनी तुर्किये उत्पादने आणि पर्यटनावरही बहिष्कार टाकला पाहिजे,” असे राठोड म्हणाले.