Donald Trump YouTube settlement आणखी एका टेक कंपनीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगलच्या मालकीच्या यूट्यूबने (YouTube) न्यायालयातील प्रलंबित प्रकरण संपवण्यासाठी ट्रम्प यांना २४.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१८ कोटी रुपये) देण्याचे मान्य केले आहे. ट्रम्प यांनी यूट्यूब विरोधात अमेरिकन न्यायालयात खटला दाखल केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तडजोड करून त्यांना कोट्यवधी रुपये देणारी यूट्यूब ही तिसरी टेक कंपनी आहे. ही सर्व प्रकरणे सोशल मीडियावरील ट्रम्प यांचे अकाउंट सस्पेंड करण्याशी संबंधित आहे. ट्रम्प यांनी मेटा आणि एक्सवरही खटला दाखल केला होता. नेमके प्रकरण काय? टेक कंपन्यांकडून ट्रम्प का आकारत आहेत कोट्यवधी रुपये? जाणून घेऊयात…
यूट्यूबकडून आकारला जातोय कोटींचा दंड
२०२१ मध्ये अमेरिकेच्या कॅपिटलवर (US Capitol) झालेल्या ६ जानेवारीच्या दंगलीच्या नंतर यूट्यूबने ट्रम्प यांचे खाते ‘बॅन’ केले होते. त्यानंतर आता यूट्यूबने ट्रम्प यांना सेटलमेंटची रक्कम देण्याचे मान्य केले. २०२० च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये एक सभा आयोजित केली होती. या सभेने नंतर हिंसक स्वरूप घेतले. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना लढायला उद्युक्त केले होते आणि आपण त्यांच्याबरोबर कॅपिटलपर्यंत कूच करू, असा दावाही केला होता. २०२० च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्या विजयाचे प्रमाणीकरण थांबवण्यासाठी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यात १४० हून अधिक पोलिस अधिकारी जखमी झाले. या दंगलीनंतर शेकडो ट्रम्प समर्थकांना अटक करून दोषी ठरवण्यात आले. या घटनेनंतर यूट्यूबने ट्रम्प यांचे खाते ‘बॅन’ केले.

यूट्यूबने केलेली ही तडजोड कंपनीची मूळ फर्म असलेल्या अल्फाबेटने केली आहे. व्हाइट हाऊसमध्ये एक नवीन बॉलरूम तयार करण्यासाठी २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १,७७७ कोटी रुपये) उभारू पाहणाऱ्या ‘ट्रस्ट फॉर द नॅशनल मॉल’ला यूट्यूब २२.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २०० कोटी रुपये) देणार आहे. याव्यतिरिक्त, यूट्यूब लेखक नाओमी वुल्फ आणि अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह युनियन यांसारख्या ट्रम्प यांच्या खटल्यातील इतर पक्षांना २.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२ कोटी रुपये) देणार आहे.
कॅपिटल दंगलीपूर्वीचे आपले भाषण ‘पूर्णपणे योग्य’ होते, असा दावा करणारा व्हिडीओ ट्रम्प यांनी अपलोड केला होता. वाढत्या हिंसाचाराची चिंता व्यक्त करत यूट्यूबने १२ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांना प्लॅटफॉर्मवरून निलंबित केले होते. कंपनीने ट्रम्प यांना अनिश्चित काळासाठी प्लॅटफॉर्मवरून बॅन केले. याला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी यूट्यूब आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर खटला दाखल केला. ‘मीडिया मॅटर्स’ ने या तडजोडीला लाजिरवावाणे म्हटले आहे. मीडिया मॅटर्सचे अध्यक्ष अँजेलो कारुसोन म्हणाले, “यूट्यूबचे हे शरणागती पत्करणे लाजिरवाणे आहे. आता विनाकारण माघार घेतल्याने ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या मीडियाला आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना लक्ष्य करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल.”
फेसबुक आणि एक्सनेही केली तडजोड
जानेवारीमध्ये फेसबुकची मालकी असलेल्या मेटाने ट्रम्प यांना सेटलमेंट म्हणून २५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२२ कोटी रुपये) देण्याचे मान्य केले. २०२१ मध्ये कॅपिटल दंगलीच्या पार्श्वभूमीवर, मेटाने ट्रम्प यांना फेसबुकवरून निलंबित केले होते. हे निलंबन किमान दोन वर्षांसाठी असेल असे सांगण्यात आले होते. ट्रम्प यांनी त्यावेळी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावरही अशाच प्रकारे खटला दाखल केला होता. २०२४ च्या निवडणुकीच्या आधी मेटाने ट्रम्प यांची फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट्स पुन्हा सुरू केली.
मेटाने ट्रम्प यांच्या अध्यक्षीय लायब्ररीसाठी २२ दशलक्ष (सुमारे १९५ कोटी रुपये) आणि खटल्यात सामील झालेल्या इतर फिर्यादींना आणखी ३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २७ कोटी रुपये) देण्याचे सांगितले. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांचे मित्र एलन मस्क यांनी २०२२ मध्ये विकत घेतलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने ट्रम्प यांना १० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८९ कोटी रुपये) दिले. मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइटवर मत घेऊन ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित केले होते.
हे तिन्ही खटले सुरुवातीला ट्रम्प यांचे वकील जॉन कोएल यांनी दाखल केले होते, जे सध्या युक्रेन आणि बेलारूससाठी राष्ट्राध्यक्षांचे उप-विशेष दूत आहेत. कोएल यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला सांगितले की, २०२४ मध्ये ट्रम्प यांचा विजय ही तडजोड होण्याचे मुख्य कारण होते. कोएल पुढे म्हणाले, “ते पुन्हा निवडून आले नसते तर आम्हाला १,००० वर्षे न्यायालयात लढत राहावे लागले असते.”
अल्फाबेटचे सीईओ पिचाई, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि एक्सचे सीईओ एलन मस्क हे तिघेही ट्रम्प यांच्या २०२४ च्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मेटाने ट्रम्प यांच्या शपथविधी निधीसाठी एक दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९ कोटी रुपये) देणगीही दिली होती. रिपब्लिकन आणि बड्या टेक कंपन्या यांच्यातील संबंधातही मोठे बदल झाले आहेत. या कंपन्यांवर रिपब्लिकनने कोविड-१९ महामारी आणि २०२० व पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्या विरोधात पुराणमतवादी आवाजांना ‘सेन्सॉर’ केल्याचा आरोप केला होता.
माध्यम समूहांनीदेखील केली कोट्यवधींची तडजोड
ट्रम्प यांना खूश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केवळ टेक कंपन्याच नाहीत. माध्यम कंपन्यादेखील त्यांच्यावर सुरू असलेले खटले बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जुलैमध्ये पॅरामाउंटने ट्रम्प यांना १६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १४२ कोटी रुपये) दिले. ट्रम्प यांचे मित्र लॅरी एलिसन (Larry Ellison) यांच्या मालकीच्या स्कायडान्स स्टुडिओ आणि प्रतिष्ठित मीडिया कंपनी पॅरामाउंट यांच्यातील विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली. आता पॅरामाउंट वॉर्नर ब्रदर्स-डिस्कव्हरी (Warner Brothers-Discovery) बरोबर आणखी एका विलीनीकरणाच्या विचारात आहे, अशा चर्चा आहेत; यामुळे डिझ्नी आणि नेटफ्लिक्सला टक्कर देणारी एक मोठी मीडिया कॉर्पोरेशन तयार होईल असे सांगितले जात आहे.
डिसेंबरमध्ये एबीसी नेटवर्क आणि त्यांच्या जॉर्ज स्टेफानोपौलोस (George Stephanopoulos) नावाच्या अँकरविरुद्ध ट्रम्प यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला मिटवण्यासाठी एबीसीनेही ट्रम्प यांना १५ डॉलर्स दशलक्ष (सुमारे १३३ कोटी रुपये) देण्याचे मान्य केले. ‘ट्रम्प-विरोधी’ असलेल्या मीडिया कंपन्यांचे परवाने रद्द करण्याबद्दल ट्रम्प यांनी उघडपणे विचार व्यक्त केले आहेत.