Independent India’s first Govt-led art exhibitions १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतासाठी कलाकार आधुनिकतेच्या वाटा धुंडाळत असताना, स्वतंत्र भारताच्या पहिल्या वहिल्या सरकारने भारतातील कला आणि परंपरा साजरी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या भारत सरकारने भरवलेल्या या प्रदर्शनाचे नाव 'Exhibition of Indian Art' (भारतीय कलेचे प्रदर्शन) असे होते. या प्रदर्शनात ४,५००० वर्ष सिंधू कालीन कांस्य प्रतिमांपासून ते मध्ययुगीन राजस्थानी-मुघल लघुचित्रांपर्यंत वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन शासकीय भवनाच्या भव्य सभागृहात ६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर १९४८ या कालखंडात आयोजित करण्यात आले होते. शासकीय भवन आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाते. या प्रदर्शनाने भारतीय कलेतील दिग्गजांना आकर्षित केले, ज्यात एफ.एन सुझा आणि एम.एफ हुसैन यांचा समावेश होता. एम. एफ. हुसैन यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात लेखक के. बिक्रम सिंग यांनी या प्रदर्शनासंदर्भातील हुसैन यांचे मत दिले आहे. त्यावेळेस हुसैन म्हणाले होते की, हे प्रदर्शन आनंद देणारे होते. एखाद्या पर्वताची उंची मोजायला जावे आणि नव्या पर्वत रांगेचा शोध लागावा असे हे प्रदर्शन. गुप्त शिल्प, भारतीय लोककलेतील निरागसता, आणि पहाडी तसेच बसौली चित्रांमधील रंग संगती पाहून मी काहीतरी मौल्यवान पाहत आहे याची मला खात्री झाली. अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा? संकल्पनेचे मूळ लंडनमधील रॉयल ॲकॅडमी ऑफ आर्ट्सने भारत सरकारच्या मदतीने आयोजित केलेले हे प्रदर्शन पहिल्यांदा लंडनमधील बर्लिंग्टन हाऊस येथे २९ नोव्हेंबर १९४७ ते २९ फेब्रुवारी १९४८ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. भारतातील सत्तेच्या हस्तांतरणाची नोंद करून या प्रदर्शनात सरकारी आणि खाजगी संग्रहांमधील कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. “२००० वर्षांहून अधिक काळ भारताने शिल्पकला, चित्रकला, वस्त्र, धातू-कास्टिंग आणि इतर कलांच्या क्षेत्रात प्रगती केली. हा समृद्ध वारसा हळूहळू पाश्चिमात्य देशांमध्ये आणि भारतातही पुन्हा शोधला जात आहे. त्यासाठी रॉयल ॲकॅडमी ऑफ आर्ट्सने भारतीय कलेचे वैशिष्ट्यपूर्ण उत्कृष्ट नमुने पश्चिमेकडील लोकांसमोर प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्याची कल्पना हाती घेतली,” असे प्रदर्शनासाठी प्रकाशित केलेल्या कॅटलॉगच्या प्रस्तावनेत नमूद करण्यात आले आहे. लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या वस्तू जून-ऑगस्ट १९४८ साली भारतात आणल्या. या वस्तू देशभर विखुरल्या जाण्यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने त्याचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. यामागे भारतीय कला वारशाचे संवर्धन हा मुख्य हेतू होता. अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते? या प्रदर्शनात तीन मुख्य गोष्टी होत्या: शिल्पकला, चित्र आणि कापड… या प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आलेल्या शिल्पांमध्ये हडप्पा किंवा सिंधुकालीन ब्राँझच्या डान्सिंग गर्लचा समावेश करण्यात आला होता. हडप्पा संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व ४,५०० इतका जुना आहे. याशिवाय बिहारमधील रामपुरवा येथे एकेकाळी उंच अशोकस्तंभावर आरूढ झालेला मौर्य काळाचे प्रतिनिधित्व करणारा एक विशाल दगडी बैल प्रदर्शित करण्यात आला होता. तो आजही राष्ट्रपती भवनात आहे. गुप्त काळातील (इ.स. चौथे-पाचवे शतक) सारनाथ आणि बोधगया येथील बुद्ध मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. मृण्मय मूर्ती ते कांस्य अशा विविध माध्यमातील शिल्प सादर करण्यात आली होती. अजिंठा येथील भित्तिचित्रांवरील अवलोकितेश्वर, पद्मपाणी यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. प्रदर्शनात असलेल्या १६व्या-१७व्या शतकातील राजपुतानाच्या चित्रांमध्ये प्रसिद्ध रागमाला लघुचित्रांचा समावेश होता. पहाडी स्कूल आणि दख्खनच्या लघुचित्रांचाही प्रदर्शनात समावेश होता. मुघल कालीन अकबराला आवडणारे प्रणय कथांचे पुस्तक, हमजानमाची चित्र देखील होती. अजिंठा चित्र (विकिमिडिया) भारतीय वस्त्रोउद्योगालाही गेल्या २००० वर्षांची परंपरा आहे. या प्रदर्शनात कलकत्ता आणि ढाक्याहून आणलेल्या मलमल कापडाचे प्रदर्शन करण्यात आले होते. गुजरातमधील पटोला डिझाईन्स, भारतभरातील सोन्याचे किमखाब ब्रोकेड, सांगानेर आणि गुजरातमधील टाय-अँड-डाय फॅब्रिक्स, काठियावाडमधील चेन-स्टिच एम्ब्रॉयडरी, लखनौचे चिकन वर्क, पंजाबमधील फुलकरी चादर आणि काश्मीरमधील भरतकाम केलेल्या शाली यांचाही समावेश होता. राष्ट्रपती भवनाच्या मजल्याचा आराखडा (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) प्रदर्शनाची व्यवस्था कशी होती? प्रदर्शनाच्या कॅटलॉगनुसार, भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल सी राजगोपालाचारी होते, ज्यांनी प्रदर्शनासाठी गव्हर्नमेंट हाऊसमधील स्टेट रूम्स दिल्या होत्या. मोकळ्या जागेत प्राचीन आणि मध्ययुगीन वजनदार शिल्प प्रदर्शित करण्यात आली होती. वेस्टिबुलमध्ये सिंधू खोऱ्यातील पुरावस्तू, मौर्य, शुंग शिल्प आणि मुघल गालिचे ठेवण्यात आले होते. प्रतिष्ठित दरबार हॉलमध्ये कुशाण आणि गुप्त शिल्प तसेच अमरावती स्तूपावरील आणि तक्षशिला येथील शिल्प प्रदर्शित करण्यात आली होती.